आजपासून नाशिकमध्ये साहित्याचा महाकुंभ!

कुसुमाग्रज नगरीत ९४वे अखिल भारतीय संमेलन
नाशिक – अवघ्या मराठी मनाचे वैश्विक सांस्कृतिक संचित असलेल्या ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास येथील गोदाकाठी शुक्रवार (३ डिसेंबर)पासून प्रारंभ होत आहे. भुजबळ नॉलेज सिटीच्या प्रांगणातील कुसुमाग्रज नगरीत सारस्वतांच्या मंगल पर्वाचे ध्वजारोहण ग्रंथ दिंडीने होणार असून, सलग तीन दिवसांच्या या पर्वणीमध्ये साहित्यप्रेमींना वैचारिक शाहीस्नान घडणार आहे. या साहित्य महाकुंभासाठी येणाऱ्या लेखक, रसिकांच्या स्वागतासाठी नाशिक नगरी सज्ज झाली असून, गुरुवारपासूनच मान्यवर साहित्यिकांचा पायरव कुसुमाग्रज नगरीत गुंजू लागला आहे.
१९४२ मध्ये नाशिकला आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या अध्यक्षतेखाली झालेले २७वे संमेलन, २००५ मध्ये मविप्रच्या मैदानात पार पडलेले. यानंतर आता तिसऱ्यांदा नाशिकला साहित्य संमेलन आयोजनाचा मान मिळाला आहे. थोर विज्ञान साहित्यिक आणि संशोधक डॉ. जयंत नारळीकर यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या हस्ते या साहित्य संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सुप्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
पालकमंत्री छगन भुजबळ या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली भुजबळ नॉलेज सिटीतील कुसुमाग्रज नगरी संमेलनासाठी सज्ज झाली आहे. शुक्रवारी सकाळी ८ वाजता कुसुमाग्रज यांच्या निवासस्थानापासून ग्रंथ दिंडी काढण्यात येणार आहे. शालेय विद्यार्थी आपले कलाविष्कार सादर करीत या ग्रंथ दिंडीत सहभागी होणार आहेत. या ग्रंथ दिंडीत विविध विषयांवरील चित्ररथांची शोभायात्रा आणि नाशिकमधील लेखकांच्या पुस्तकांवर आधारित चित्ररथ हे आकर्षण असणार आहे.
कुसुमाग्रज निवासस्थानापासून निघालेली ही ग्रंथ दिंडी रामायण बंगला, शरणपूर रोड, जुने सीबीएस, शिवाजी रोड, शालिमार चौकमार्गे जिमखाना येथे येणार आहे. तेथून पुढे वाहनांनी हे सर्व विद्यार्थी आणि साहित्यिक भुजबळ नॉलेज सिटी मैदानात दाखल होतील. त्यानंतर सकाळी ११ वाजता साहित्य संमेलनानिमित्त ध्वजारोहण होणार आहे. यावेळी संमेलनाध्यक्ष आणि उद्घाटक उपस्थित राहणार असून, सायंकाळी ५ वाजता संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. साहित्य संमेलनाची सर्व तयारी पूर्ण झाली असून, सारस्वतांचे नाशिक क्षेत्री आगमन झाले आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील आणि महामंडळाचे सर्व पदाधिकारी, तसेच माजी संमेलनाध्यक्ष यांचे कुसुमाग्रज नगरीत आगमन झाले आहे. राज्यभरातील ग्रंथ विक्रेते आणि प्रकाशकही नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. शहर, जिल्ह्यासह राज्यभरातून १०-१५ हजार साहित्य रसिक या तीन दिवसांच्या साहित्य महाकुंभमेळ्यात सहभागी होण्याची शक्यता आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता आयोजकांनी संमेलन स्थळावर मास्क, सॅनिटायझर आणि वेळप्रसंगी लागल्यास वैद्यकीय मदतही सज्ज ठेवली आहे. संमेलनासाठी पोलीस बंदोबस्तही चोख ठेवण्यात आला आहे. यासाठी जिल्ह्याबाहेरूनही पोलीस कुमक मागविण्यात आली आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …