उल्हासनगर – फ्री फायर अॅप या मोबाइल गेमच्या माध्यमातून एका २२ वर्षीय इसमाची एका अल्पवयीन मुलीशी ओळख झाल्यानंतर तिचे अपहरण करून पळून गेलेल्या आरोपीला उल्हासनगर गुन्हे शाखा पथकाने अटक केली आहे. पोलिसांनी अपहृत मुलीचीही सुखरूप सुटका केली आहे.
बदलापूर येथे एक १५ वर्षांची मुलगी अनिता (नावात बदल) तिच्या नातेवाईकांसोबत राहते, अनिताला फ्री फायर हा मोबाइल अॅपचा गेम खेळण्याचे व्यसन लागले होते. हा गेम खेळत असताना तिची ओळख २२ वर्षीय एस. के. बुद्ध या इसमाशी दोन वर्षांपूर्वी झाली होती. एस. के. हा मूळचा पश्चिम बंगाल राज्यातील मिरदादपूर चौकी, मालदा येथील राहणारा असून, दोन वर्षांपूर्वी तो केरळ येथील एका खाजगी कंपनीमध्ये कामाला होता.
एस. के. याने अनिताला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला लग्नाचे आमिष दाखविले व तिचे अपहरण करण्याचा कट रचला. ८ फेब्रुवारीला तो कल्याण रेल्वे स्टेशनला आला व त्याने अनिताला तेथे बोलावून घेतले. अनिता तेथे आल्यानंतर दोघेही रात्री कर्मभूमी एक्स्प्रेस गाडी क्र. २२५११ हिने पश्चिम बंगाल येथे निघून गेले होते.
अनिता व एस. के. यांना ताब्यात घेण्याकरिता युनिट ४ कार्यालयातील पोलीस हवालदार ज्ञानेश्वर महाजन, पोलीस शिपाई संजय शेरमाळे यांना अपहृत अनिताचे नातेवाईक यांच्यासोबत तात्काळ कोलकाता राज्यातील हावडा येथील डानकुणी रेल्वे स्थानक येथे पाठविले होते. डानकुणी रेल्वे स्थानक येथील आरपीएफ पोलिसांच्या मदतीने आरोपी एस. के. व अनिताला ताब्यात घेतल्यानंतर आरोपीकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस करण्यात आली. अशाप्रकारे आरोपी एस. के. याला अटक करून अनिताला सुखरूप ताब्यात घेऊन गंभीर स्वरूपाचा गुन्हा कमी वेळेत पोलिसांनी उघडकीस आणला आहे.