ठळक बातम्या

अजितदादांनी आमदारांना शिकवला शिष्टाचार

मुंबई – अध्यक्ष महोदय, आमदार होऊन इतकी वर्षे झाली. आम्हालाही काही गोष्टी समजत नाहीत. मात्र, काही जण आमदार झाल्यावर सगळे समजतेय असे वागतात, अशा शब्दांत संतप्त झालेले उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विधिमंडळात आमदारांची खरडपट्टी काढली. अजित पवार म्हणाले की, दोन्ही बाजूंच्या आमदारांकडून आदर्श वर्तन झाले पाहिजे. लोक प्रतिनिधींच्या वर्तनामध्ये सुधारणा झाली पाहिजे. आता सभागृहातील कामकाजाचे थेट प्रक्षेपण केले जाते. लाखो लोक मतदान करतात, त्यावेळी आपण येथे येतो. आपण कुत्री, मांजरे, कोंबड्या यांचे प्रतिनिधीत्व करीत नाही, याचे भान राखले पाहिजे. आपण प्राण्यांचे प्रतिनिधीत्व करीत नाही, हे लक्षात ठेवले पाहिजे. अध्यक्ष महोदय, शिस्त पाळली गेली पाहिजे, अशा शब्दांत अजितदादांनी आमदारांना सुनावले.
अजित पवार म्हणाले की, सभागृहाच्या आवारात आणि आपल्या सार्वजनिक जीवनातील वर्तनाबद्दल अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे. सकाळी बैठक झाली. या बैठकीला सत्ताधारी आणि विरोधक होते. सगळ्यांनीच सभागृहातील सदस्यांच्या वर्तनात सुधारणा झाली पाहिजे यावर मत व्यक्त केले. सर्वांनी पक्षीय जोडे बाजूला ठेवून चिंता व्यक्त केली. सदस्यांना वर्तनाची जाणीव करून देण्यावरही सहमती दर्शवली. आम्ही ३० वर्षांपूर्वी आलो. बाळासाहेब थोरात ३५ वर्षांपूर्वी आले, तेव्हाची गोष्ट वेगळी होती. तेव्हा लाइव्ह जात नव्हते. आता लाइव्ह जात आहे. त्यामुळे सदस्यांचे वर्तन चांगले पाहिजे. कुणाचा अपमान होणार नाही, कुणाचा उपमर्द होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. संसदीय सदाचार आणि शिष्टाचाराची आचारसंहिता हे पुस्तक सर्वांना दिले. ते सर्वांनी वाचले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.
अजित पवार म्हणाले की, सुरुवातीला मधुकरराव चौधरी अध्यक्ष असताना आम्ही आमदार होतो, तेव्हा केवढा दरारा असायचा. ते उभे असतील, तर आम्ही क्रॉस करायचो नाही. कॅ बिनेटमंत्री पुढे बसायचे. आम्ही पाठी बसून त्यांच्याशी बोलायचो. त्यांना सभागृहात डिस्टर्ब करायचो नाही. आता अध्यक्षांकडे पाठ असते. अध्यक्षांना पाठ दाखवायची नसते. आल्यावर त्यांना नमस्कार करून बसायचे असते. जातानाही नमस्कार करायचा असतो, असा डोसही अजितदादांनी पाजला.

आमदारांच्या निलंबनावर भाजपसोबत?
कुणी जर चुकले, तर त्याला ४ तास बाहेर ठेवा. ४ तास कमी वाटत असतील, तर एखादा दिवस बाहेर ठेवा. त्याचाही विचार करा, पण एकदम १२-१२ महिने कुणाला बाहेर पाठवू नका, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी विधिमंडळ अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांना केले. यापूर्वी भाजपच्या १२ आमदारांचे वर्षभरासाठी निलंबन झाले आहे. हे निलंबन मागे घ्यावे, अशी भाजपची मागणी आहे. या अनुषंगाने अजित पवारांनी सभागृहात भाजपच्या सुरात सूर मिसळला. त्यामुळे सभागृहातील अनेकांच्या भुवया उंचावल्या.
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ओबीसी आरक्षणासंदर्भातील ठरावावरून झालेल्या गदारोळानंतर भाजपच्या १२ आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन करण्यात आले आहे. विधानसभा अध्यक्षांसमोरील हौदात उतरून सत्ताधारी आणि भाजपच्या आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली. तसेच विधानसभा अध्यक्षांच्या दालनात आपल्याला धक्काबुक्की आणि शिवीगाळ झाल्याचा आरोप तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी केला आहे. या प्रकारानंतर भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन करण्यात आले आहे. मात्र, आता या निलंबनावरून अजित पवार हे निलंबन मागे घेण्याच्या म्हणजेच भाजपच्या बाजूने असल्याचे दिसत आहेत.
आमदार निलंबनावर अजित पवार म्हणाले की, कधी कधी काही प्रसंग घडतात. ते तेवढ्या पुरते घ्यायचे असतात. त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्यकर्त्यांनी आणि विरोधकांनी चर्चा करून त्यातून मार्ग काढायचा असतो आणि वेळ मारून न्यायची असते. त्याबद्दलही दुमत नाही. जोपर्यंत कुणी जर चुकीचे असेल, तुम्ही नियम करत नाही, तोपर्यंत चुकायचे थांबणार नाही. माझी विनंती आहे की, कुणी जर चुकले तर त्याला नियम करा आणि चार तास बाहेर ठेवा. तर त्याला त्याची चूक कळेल. चार तास कमी वाटत असेल, तर एखादा दिवस बाहेर ठेवा. त्याचाही विचार करा, पण एकदम बारा-बारा महिने कुणाला बाहेर पाठवू नका, असे म्हणत त्यांनी याप्रश्नी आपण भाजपसोबत असल्याचेच दाखवून दिले.

मुख्यमंत्र्यांची खुर्ची तरी राहू दे…

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी विधानसभेत बेशिस्त आमदारांना चांगलेच चिमटे काढले. आपण कसे वागतो याचे सदस्यांना जराही भान राहिलेले नाही. सभागृहात येताना जाताना नमस्कार करायचा, याचेही सदस्यांना भान राहिलेले नाही. काही सदस्य तर एकदा निवेदन दिल्यानंतर पुन्हा दहा मिनिटांनी निवेदन द्यायला येतात, असे सांगतानाच एक सदस्य तर थेट मुख्यमंत्र्यांच्याच खुर्चीवर येऊन बसला. शेवटी त्याला अरे बाबा, ही मुख्यमंत्र्यांची खुर्ची आहे, तेवढी तरी राहू दे असे म्हणण्याची वेळ आली, असे अजित पवार यांनी सांगितले. अजित पवार यांनी शिस्तपालनावरून विधानसभेत सदस्यांचे कान टोचले. आता तर आमच्या सीटवर कोणीही येऊन बसतो. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवरही येऊन बसतात. त्यांना म्हटले तेवढी तरी राहू दे. तुला १४५ आमदारांचा पाठिंबा मिळाला, तर बस. पण सदस्य ऐकत नाहीत, असे पवार म्हणाले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …