ठळक बातम्या

राज्यात अनेक ठिकाणी शाळेची घंटा वाजली

मुंबई – कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जवळपास दोन वर्ष शाळा बंद होत्या. या काळात विद्यार्थांचे ऑनलाइन शिक्षण सुरू झाले होते. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, पण दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर राज्याने सावध पवित्रा घेतला आहे. मुंबई, पुण्यासह काही जिल्ह्यांतील शाळा १५ डिसेंबरपर्यंत बंद राहणार आहेत. पण महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील शाळा बुधवारपासून सुरू झाल्या आहेत.
शाळांमध्ये विद्यार्थांना कोरोना नियमांचे पालन सक्तीचे करण्यात आले आहे. मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग यांसारख्या नियमांचे पालन करणे विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना करावे लागणार आहे. राज्यातील ग्रामीण भागातील शाळांमध्ये विद्यार्थांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. पालक आपल्या पाल्यांना घेऊन शाळेत आले होते. काही ठिकाणी ढोल ताश्यांमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले, तर काही ठिकाणी फुगे-चॉकलेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले होते. नंदूरबार जिल्ह्यातील प्राथमिक शाळांचाही श्री गणेशा झाला. शाळा सुरू होणार असल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये समाधान होते. सकाळीच विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचवण्यासाठी पालकांची लगबग दिसून आली, तर शाळा प्रशासनाकडूनही विद्यार्थ्यांचा स्वागताची तयारी करण्यात आली होती. जिल्ह्यातील १८५५ शाळांमधील सुमारे १ लाख ८८ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी दोन वर्षांच्या खंडानंतर आपल्या शिक्षणाला सुरुवात केली.
चंद्रपूर जिल्ह्यातील शाळांतही पुन्हा एकदा किलबिलाट सुरू झाला. जिल्ह्यात कोविड खबरदारी घेत वर्ग पहिली ते चौथीच्या २४१७ शाळा सुरू करण्यात आल्या. रत्नागिरी जिल्ह्यातही पहिली ते चौथीच्या शाळा उघडल्या. जिल्ह्यातील २ हजार ५२२ शाळांमध्ये घंटा वाजली. जळगाव जिल्ह्यातही शाळा सुरू झाल्या. धुळे जिल्ह्यात देखील शाळांना सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांसह पालकांचा उत्तम प्रतिसाद दिसून आला. अहमदनगरमध्येही तब्ब्ल पावणेदोन वर्षांनंतर पहिले ते चौथीचे वर्ग सुरू झाले. गोंदियातील ग्रामीण भागातील पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या आहेत. पहिल्याच दिवशी शाळेत विद्यार्थ्यांचे फूल देऊन स्वागत करण्यात आले. मुलांना चॉकलेटही देण्यात आले. राज्याच्या इतर भागांतही शाळा गजबजून गेल्या.

About Sub-Editor

अवश्य वाचा

गडचिरोलीत पुन्हा वाघिणीची शिकार?

 नखे, शीर काढून वाघिणीला जमिनीत पुरले गडचिरोली – गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली वनविभागात वाघिणीची शिकार झाल्याचे …