लवचिक अभिनेत्री नयना आपटे

मराठी रंगभूमीवर आणि चित्रपट या दोनही माध्यमांत गेली साठ वर्षे सातत्याने आपले दर्शन देणारी आणि अभिनयात विविधता असलेली अभिनेत्री म्हणजे नयना आपटे. अत्यंत लवचिक किंवा आजच्या भाषेत ज्याला वर्सटाईल अभिनेत्री म्हणता येईल, अशा अभिनेत्री म्हणजे नयना आपटे. कोणतीही भूमिका समजून आणि उमजून करताना त्या भूमिकेचा खºया अर्थाने आनंद घेणारी मनस्वी कलाकार म्हणून नयना आपटे यांचा उल्लेख करावा लागेल.

नयना आपटे यांच्या रक्तात अभिनयाचे गुण आले असावेत ते त्यांची आई शांता आपटे यांच्याकडून. कृष्ण धवलचा आणि मूकपटांचा जमाना गाजवणाºया, प्रभात, व्ही शांताराम यांच्या युगात आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरलेल्या शांता आपटे यांची कन्या म्हटल्यावर नयना आपटे यांच्यावर तशी फार मोठी जबाबदारी होती. ते म्हणजे आईप्रमाणेच आपलेही नाव मोठे होणे. पण शांता आपटेंनी कृष्ण धवलचा काळ सोनेरी केला, तर नयना आपटे यांनी रंगभूमी, छोटा पडदा आणि रूपेरी पडद्यावर आपली रंगीत छाप उमटवली. ते आव्हान त्यांनी पेलले.
नयना आपटे यांनी आपली आई शांता आपटे, इंदिराबाई केळकर, यशवंतबुवा जोशी यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले आहे. याशिवाय गोविंदराव पटवर्धन, अण्णा पेंढारकर, नारायण बोडस आणि अरविंद पिळगावकर यांच्याकडूनही नयना आपटे यांनी नाट्यसंगीताचे शिक्षण घेतले आहे, परंतु केवळ संगीत नाटकात अडकून न राहता कौटुंबिक, सामाजिक, विनोदी आणि फार्सिकल नाटकांतही त्यांनी आपली छाप उमटवली आहे. त्यामुळे एकाचवेळी एकच प्यालातील सिंधू चित्तरंजन कोल्हटकर यांच्या बरोबर तर सौजन्याची ऐशी तैशी सारखा फार्सराजा गोसावींबरोबर करण्याचे काम त्यांनी केले होते. त्यांच्या अभिनयाची खºया अर्थाने जुगलबंदी दोन-तीन वर्षांपूर्वी प्रेक्षकांनी पाहिली ती चूकभूल द्यावी घ्यावी या मालिकेत. दिलीप प्रभावळकर यांच्या आईची भूमिका त्यांनी ज्याप्रकारे केलेली होती. त्यातून त्यांच्या अभिनयाची ताकद सर्वदूर पोहोचली.

अभिनयासाठी केवळ सुंदर रूपच असून चालत नाही, तर संगीत आणि नृत्याची आवड लागते. निसर्गाने या अभिनेत्रीला सौदर्याचे वरदान तर दिले होतेच. आपल्या कष्टाने त्यांनी शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत शिकून घेतले. त्याचप्रमाणे नृत्यशिक्षणही त्यांनी घेतले होते. त्यांनी रोहिणी भाटे यांच्याकडे पाच वर्षे कथ्थकचे शिक्षण घेतले आहे. त्यामुळे त्यांच्या अभिनयात एक प्रकारची परिपक्वता दिसून येते. अभिनय विनोदी असो, खलनायकी असो वा खाष्ट असो, सोजवळ असो वा आक्रमक असो. नयना आपटेंनी त्यात जान आणलेली दिसते.
वयाच्या चौथ्या वर्षापासून नयना आपटे मराठी, हिंदी आणि गुजराती चित्रपटांतून कामे करीत आहेत. वयाच्या ७ व्या वर्षी शांता आपटे यांच्या चंडीपूजा या चित्रपटात त्यांनी एक महत्त्वाची भूमिका केली होती. १९६५ सालापासून नयना आपटे यांची व्यावसायिक अभिनेत्री म्हणून कारकीर्द सुरू झाली. नयना आपटे यांनी आजवर ६० हून अधिक विनोदी, पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक, संगीत आणि काही गुजराती नाटकांतून भूमिका केल्या आहेत. त्यांचे २५ मराठी, ४ हिंदी आणि ६ गुजराती चित्रपट आहेत. आजही त्या २०२२ मध्ये नव्यानेच रंगभूमीवर आलेल्या आनंद म्हसवेकर यांच्या फॅमिली नंबर वन या वेगळ्या नाटकात तितक्याच ताकदीने उभ्या आहेत. त्यांच्यातला हा उत्साह खरोखरच वाखाणण्यासारखा आहे. त्यामुळेच त्या अत्यंत लवचिक अशा अभिनेत्री आहेत.

नयना आपटे यांनी १६ हिंदी-मराठी दूरचित्रवाणी मालिकांत कामे केली आहेत. शांती, वक्त की रफ्तार, ‘एक चुटकी आसमान’ आणि डोन्ट वरी हो जायेगा या त्यांच्या हिंदीतल्या गाजलेल्या मालिका आहेत. तसेच चूकभूल द्यावी घ्यावी, सुखाच्या सरींनी, हे मन बावरे या मराठी मालिकाही गाजलेल्या आहेत. रंगभूमीवर नवोदित कलाकारांना त्यांची भूमिका नेहमीच मार्गदर्शकाची राहिली आहे. त्यांच्या अनेक रेडिओ मुलाखती आणि भाषणे झाली आहेत. त्या नवोदित कलावंतांना संगीत शिकण्यास मदत करतात. सामाजिक कार्यातही त्यांचा गरीब आणि होतकरू लोकांना मदतीचा हात असतो.
चित्तरंजन कोल्हटकर यांच्याबरोबर एकच प्यालामध्ये सिंधूची भूमिका कान्होपात्रा, मधुवंती दांडेकर अशा अनेकांनी केली आहे. पण नयना आपटे यांनी केलेली सिंधू अधिक उठावदार होती. कारण गायन आणि अभिनय, रंगभूमीची जाण हे त्यांच्यात सर्वश्रेष्ठ गुण होते. त्यामुळे फक्त गळा किंवा आवाज बोलत नव्हता, तर त्यांच्या चेहºयातील भाव, डोळे या भूमिकेतून सिंधूच्या व्यथा मांडताना दिसायच्या.

विनोदी नाटकांमध्ये राजा गोसावींबरोबर त्यांची केमिस्ट्री भरपूर जमली होती. करायला गेलो एक या बाबुराव गोखले यांच्या नाटकात त्यांनी धमाल केली होती. राजा गोसावी, शरद तळवलकर, बाबुराव गोखले या सर्वांबरोबरीने नूतनच्या भूमिकेतून त्यांनी धमाल केली होती. राजा गोसावी आणि नयना आपटे यांच्यातील आणखी गाजलेले एक नाटक म्हणजे नवरा माझ्या मुठीत गं. या नाटकाचे त्यांनी भरपूर प्रयोग केले आणि १९७०चे दशक गाजवले. त्यानंतर हेच नाटक त्या निर्मात्याने पती, पत्नी आणि ती या नावाने आणले आणि त्याचेही भरपूर प्रयोग या जोडीने केले. याशिवाय डार्लिंग डार्लिंग, हा स्वर्ग सात पावलांचा या नाटकातही त्यांनी राजा गोसावींबरोबर काम केले होते. दोघांनी विनोदाचा टायमिंग चांगला जपला होता. दोघांची जुगलबंदी जबरदस्त होती. इतकी मराठी रंगभूमीवर त्या काळात राजा गोसावी आणि नयना आपटे ही सुपरहिट जोडी होती.
देव नाही देव्हाºयात या नाटकातील सोज्वळ जानकी त्यांनी तितकीच सुंदर साकारली होती. याशिवाय संगीत नाटकात त्यांनी पुण्यप्रभाव, मानापमान, शारदा, स्वयंवर या नाटकात अप्रतिम भूमिका करून आपल्या गोड गळ्याने प्रेक्षकांना आपलेसे केले होते. त्याचवेळी दुसरीकडे राजा गोसावींबरोबर फार्सिकल विनोदी नाटकेही त्या करत होत्या. हा प्रेक्षकांच्या दृष्टीने चमत्कार होता. म्हणून त्या खºया अर्थाने लवचिक अभिनेत्री आहेत.

चित्रपटांमधून त्यांच्या वाट्याला खाष्ट आणि खलनायकी थाटाच्या भूमिकाच जास्त आल्या आहेत. पण त्या त्यांनी उत्तमपणे साकारल्या आहेत. विशेषत: लक्षात राहील अशी त्यांची भूमिका म्हणजे शेजारी शेजारी या चित्रपटातील भूमिका. म्हणजे एकीकडे अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, वर्षा उसगांवकर आणि निशिगंधा वाड तर दुसरी बाजू एकट्या नयना आपटे यांनी पेललेली होती. हे त्यांच्यातील कलाकाराचे यश होते.
त्यांच्या या कारकिर्दीसाठी आजवर त्यांना मराठी नाट्य परिषदेचे चार पुरस्कार मिळाले आहेत. पण खºया अर्थाने रंगभूमी गाजवणाºया या अभिनेत्रीला नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळणे आवश्यक आहे. कारण खºया अर्थाने रंगभूमीवर मेहनतीने आणि उत्साहने काम करणाºया त्या अभिनेत्री आहेत. बदलत्या काळाप्रमाणे बदल स्वीकारत सर्व माध्यमांमध्ये टिकून राहण्याचे त्यांचे कौशल्य हे वााखाणण्याजोगे आहे.

– प्रफुल्ल फडके/ तिसरी घंटा
9152448055\\

About Editor

अवश्य वाचा

उखाणा

सवाष्णीने आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पारंपरिक शैली ही महाराष्ट्राची ओळख आहे. लग्नात किंवा सण-समारंभात …