२०२१ची परत पाठवणी

खरंतर माणसाचे आयुष्य हे किमान ६० ते ७० वर्षांचे असते; यामध्ये एक वर्ष म्हणजे फार काही मोठा कालखंड नाही; पण प्रत्यक्षात मनुष्याचे आयुष्य बदलायला केवळ एक क्षण देखील पुरेसा असतो. त्याचमुळे की काय १ वर्ष म्हणजे दैवाला मनुष्याच्या आयुष्यात उलथापालथ करायला प्रचंड अवधी देते. जे वैयक्तिकआयुष्यात तेच सामाजिक आयुष्यात, देशाच्या भविष्यासाठी देखील अ‍ॅप्लिकेबल आहे.
२०२१ हे वर्षदेखील असेच खट्टे मिठे गेले. देशासाठी व अनेकांच्या वैयक्तिक आयुष्यासाठी. अत्यंत उत्कृष्टपणे क्रिकेट खेळणारा क्रिकेटपटू जेव्हा ध्यानीमनी नसताना ९९ धावांवर दुर्दैवीरित्या बाद होतो; तेव्हा जे फिलिंग किंवा दु:ख मनात दाटते तशीच अनुभूती शिवशाहीर बाबासाहेबांच्या जाण्याने देशातील प्रत्येक शिवप्रेमीने अनुभवली.

चीफ आॅफ डिफेन्स स्टाफ रावत यांच्या अपघाती जाण्याने तर देशाने एक उत्कृष्ट रणनीतीकार गमावला. चीनसाठी ‘आयबॉल टू आयबॉल’ प्रकारचे टशन देणारा हा वीर होता. औरंगजेबाला जेरीस आणणाºया राणी तारामतीला आदर्श मानणारा, आपल्या सैनिकांमध्ये प्रिय असलेल्या या बहादुराला २०२१ ने आपल्यासोबत नेऊन चूकच केली आहे.
भारत-पाकिस्तान क्रिकेट युद्ध म्हटले की, ‘मौका मौका’ ही जाहिरात आठवणे स्वाभाविकच आहे. इतके वर्षे पाकिस्तानला कसलाही मौका न देणाºया दैवाला २०२१ मध्ये मात्र पाकिस्तानच्या झोळीत दान टाकण्याची बुद्धी झाली. आता बघूया येणाºया वर्षांमध्ये ‘मौका मौका’ची जागा कोणती नवीन जाहिरात घेते ते!

निमित्त होते टोकियो आॅलिम्पिक २०२०चे; पण कोरोनाच्या कृपेमुळे ते प्रत्यक्षात झाले २०२१ मध्ये व त्यामध्ये भालाफेकीमध्ये भारताच्या नीरज चोप्राने सर्व देशवासीयांना राष्ट्रगीत ऐकण्याची सुसंधी प्राप्त करून दिली. सुवर्णवेध घेणाºया नीरजला ज्येष्ठ पांडव युधिष्ठीरची उपमा देण्यात आली, कारण हा पांडवदेखील भालाफेकीमध्ये नावाजलेला योद्धा होता.
वर्षाच्या सुरुवातीला प्रवाहात वाहणाºया अनेक प्रेतांमुळे (कोरोना महामारी) मैली झालेली गंगा २०२१ अखेर येता-येता परत पावन झाली. काशी विश्वनाथ कॉरिडॉरमुळे गंगा व भोलेनाथ अजून जवळ आले. यवनी आक्रमणामुळे वेळोवेळी खंडित झालेल्या मंदिराला परत एकदा सुवर्णवैभव प्राप्त झाले. नरेंद्र मोदी यांनी हिंदू अस्मितेला जागृत करताना मराठमोळ्या अहिल्या होळकरांना काशी जीर्णोद्धारात त्यांच्या असलेल्या योगदानाबद्दल मानवंदना दिली.

किसान आंदोलनामुळे भारताचे राजकीय विश्व मोठ्या प्रमाणावर ढवळून निघाले होते. पेट्रोल, डिझेलने शंभरी गाठली ते याच वर्षामध्ये. ‘कुंपणच शेत खात आहे का?’, अशी शंका आर्यन खान, समीर वानखेडे व अनिल देशमुख, सचिन वाझे, परमबीर सिंग या दोन प्रकरणांमुळे या वर्षाने उपस्थित केली.
जागतिक स्तरावर, अफगाणिस्तानमधील अमेरिकेची माघार व त्यानंतर आलेले तालिबानी सरकार यांची बरीच चर्चा झाली. आपला जीव वाचविण्यासाठी चालत्या विमानावर स्वार होणाºया अगतिक माणसांची व हवेत झेपावल्यावर त्या विमानातून खाली पडून प्राण गमाविणाºया माणसांमुळे अवघ्या मानवजातीची मान शरमेने झुकली.

२०२१ आपल्या हातातील कोरोनाचा बॅटन ओमिक्रोनच्या रूपामध्ये २०२२ च्या हातामध्ये देण्यास सज्ज झाल्यामुळे सर्व जग परत एकदा चिंताग्रस्त होत आहे.
२०२१ ने क्रिकेटमधील ‘विराट युग’ समाप्त होण्याचे संकेत दिले आहेत, तर आर्थिक जगतामध्ये ‘आभासी चलन’ आपली हुकूमत येत्या काळामध्ये प्रस्थापित करेलच याचे संकेत देखील या वर्षाने दिले आहे; म्हणूनच भारताने देखील या दृष्टीने विचार करण्यास सुरुवात केली आहे.

अंतरिक्ष पर्यटनाचे स्वप्न प्रत्यक्षात साकार जाहले ते याच वर्षामध्ये. महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास मालवणी माणसाला त्यांचे हक्काचे चिपी विमानतळ मिळाले ते याच वर्षी. एअर इंडिया व तिचे मूळ मालक टाटा यांची जी ताटातूट झाली होती; त्यांची पुन्हा गळाभेट करून दिली ती याच वर्षाने.
जागतिक वारसा म्हणून युनेस्कोने बंगालमधील दुर्गा पूजेला स्थान देऊन भारतीय संस्कृतीचा यथोचित सन्मान केला आहे, ते याच वर्षामध्ये.

२०२१ हे अनेक दृष्ट्या माइल स्टोन वर्ष आहे, कारण भारतीय स्वातंत्र्याची ७५ वर्षे, बांगलादेश मुक्ती संग्रामाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष, गोवा मुक्ती संग्रामाचे हिरक महोत्सवी वर्ष असा त्रिवेणी योग यावर्षी जुळून आला.
माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाल्यास माझी दुसरी आई म्हणजे पार्ले टिळक विद्यालय (मराठी माध्यम) १०० वर्षांची झाली व त्यामुळे एक वेगळीच भावना मनामध्ये जागृत झाली; शाळेच्या स्मरणिकेमध्ये यानिमित्ताने माझ्या लेखाचा अंतर्भाव झाला.

थोडक्यात काय, तर कॅलेंडरचे पान जसे उलटले जाते तसे आपल्या मनाच्या कप्प्यामध्ये अजून काही आठवणींना जागा करून द्यावी लागते. नववर्षाच्या आगाऊ शुभेच्छा देत मी २०२१ ला ‘बॅक टू पॅव्हेलियन’चा इशारा करत आहे.
– प्रशांत दांडेकर/9821947457 \\

About Editor

अवश्य वाचा

उखाणा

सवाष्णीने आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पारंपरिक शैली ही महाराष्ट्राची ओळख आहे. लग्नात किंवा सण-समारंभात …