हे तर काहीच नाही

झी मराठी वाहिनी आता थोडी-थोडी सुधारत आहे. गेल्या वर्षभरात घसरलेला टीआरपी सुधारण्यासाठी काहीतरी प्रयत्न होत आहेत, ही चांगली बाब आहे. त्यामुळेच नवनवीन प्रयोग करताना आता शुक्रवारी, शनिवारी ‘हे तर काहीच नाही’ हा नवा कार्यक्रम मागच्या आठवड्यात सुरू झाला आहे.
सोनी मराठीने दर्जेदार मालिका दिल्याने आणि सन टीव्हीची मराठी वाहिनी सुरू झाल्यानंतर आपल्याला आता मालिकांचा आणि कार्यक्रमांचा दर्जा सुधारला नाही तर वाईट दिवस येतील हे या वाहिनीच्या लक्षात आले आणि काही चांगले कार्यक्रम सुरू केले. मागच्या आठवड्यात सारेगमप लिटील चॅम्सचा दुसरा सीझन संपल्यानंतर प्रेक्षकांना खेचून आणतील, असे कार्यक्रम झी मराठीकडे नव्हते. त्यामुळे ‘हे तर काहीच नाही’ हा कार्यक्रम तातडीने आणून वाहिनीला संजीवनी देण्याचा प्रयत्न केला, असे म्हणावे लागेल. आता हा कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाला स्पर्धा करेल असे दिसते, कारण हवा येऊ द्याची हवा इतकी गेली आहे की, आजकाल कोणत्याही विनोदाला हसायला येत नाही. ते फुसके बार ऐकून स्वप्नील जोशी बिचारा जोरजोरात हसत असतो, पण त्याला त्याचे पैसे मिळतात, प्रेक्षकांचे काय? त्यामुळे हसवण्यासाठी आता ‘हे तर काहीच नाही ’ हा कार्यक्रम सुरू केला हे जरा बरे झाले.
तसे ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेने झी मराठीला सध्या तारले होते. रात्री ११ ला ही मालिका ठेवूनही प्रेक्षक रात्री अकराची वाट पाहात असतात, कारण त्या भुतांचा रात्रीचा खेळ बघण्यात मजा येते. शेवंताला लागलेली लग्नाची ओढ आणि त्यासाठी कावेरी आणि सयाजीच्या शरीरांची आवश्यकता यातून निर्माण होत असलेले नाट्य हे रंजक आहे. कावेरीने घटकेत शेवंता आणि घटकेत कावेरी करताना कावेरी असताना दाक्षिणात्य भाषेत बोलणे आणि शेवंता असताना अस्सल मराठी भाषेत बोलणे हे फार मजा आणते. विशेषत: मागच्या आठवड्यात जेवता-जेवता तिच्या अंगात संचारलेली शेवंता लांबलचक उखाणा घेते आणि अण्णांचे नाव घेण्यापूर्वीच वच्छीने माधवला पाठवून पुढचा अनुचीत प्रकार थांबवणे हे पण भारी होते. छोट्या-छोट्या प्रसंगांना फुलवण्याची कसब या मालिकेची रंजकता वाढवते. हळदीचा डबा सांडल्यावर त्यातून शेवंताला लग्नाची हळद करण्याचा संचार होणे, त्यातच सगळी भांडी घासण्यासाठी अभिराम आणि कावेरीची धडपड यातून थोडे रोमँटीक होणे हे छान बांधले आहे, पण रात्री अकराची वाट पाहणाºया प्रेक्षकांनी त्यापूर्वी अन्य वाहिन्यांकडे वळू नये, यासाठी काही तरी मसाला आणणे या वाहिनीला आवश्यक होते. त्यामुळे हे तर काहीच नाहीने चांगली सुरुवात केली असे म्हणावे लागेल.
त्यातच आता १९ पासून पुन्हा देवमाणूस ही मालिका सुरू होणार आहे. १५ आॅगस्टला बंद झालेली ही मालिका आपले दुसरे पर्व घेऊन चार महिन्यांत पुनरागमन करत आहे हे विशेष. रात्रीस खेळ चाले एक पेक्षा दोन आणि दोन पेक्षा तीन रंगतदार बनत गेली. त्याचप्रमाणे देवमाणूस २ हे पर्वही रंजक असेल अशी अपेक्षा आहे. किमान सरूआजीच्या शिव्या आणि उखाणे, म्हणी ऐकून तरी प्रेक्षक खूश असतात, पण त्यापूर्वीच हे तर काहीच नाही हा कार्यक्रम सुरू केला हे बरे झाले.
माणसांना किस्से ऐकायला आवडतात. त्यातून ते जर नामांकीत कलाकारांचे असले तर अधिक बरे. या कार्यक्रमात अक्षया देवधर आणि सिद्धार्थ जाधव हे प्रमुख आहेत. तर प्रत्येक आठवड्याला आपल्या आयुष्यातील मजेदार किस्से सांगायला विविध कलाकार येणार आहेत. त्याचा प्रोमो हा अत्यंत वाईट झाला होता. सोनाली कुलकर्णी, पुष्कर श्रोत्री आणि पूजा सावंतचे सुमार किस्से या प्रोमोत दाखवले होते, त्यामुळे हा कार्यक्रम बघावा की नये असे वाटत असतानाच त्याची सुरुवात बरी झाली. अर्थात सुरुवातीलाच संदीप पाठकचा चेहरा बघितल्यावर आणि त्याचा पहिला किस्सा फारसा खास नसल्याने प्रेक्षक वैतागले. पण नंतर सुशांत शेलार, वंदना गुप्ते, केदार शिंदे आणि विजय कदम यांनी चांगली रंगत आणली. दुसºया टप्पात मात्र संदीप पाठकने जयंत तारेंचा सांगितलेला किस्सा चांगला होता. त्यामुळे इथून पुढे जर चांगले चांगले किस्से नामवंतांकडून ऐकायला मिळाले, तर फू बाई फूच्या दर्जाचा हा कार्यक्रम होईल आणि झी मराठीला जीवदान मिळेल, यात शंका नाही. कारण सध्या स्वीटू ओमकारची येऊ कशी तशी मी नांदायला ही मालिका का चालवली जात आहे, असा प्रश्न प्रेक्षकांना पडत आहे. तुरुंगात गेल्यावरही मालविका सुधारली नाही. स्वीटूने कोकणात जाऊन बस्थान बसवले आहे, तर सहा महिन्यांत यूकेतून परत आलेला ओम स्वीटूला भेटायला आणि तिच्या पुन्हा प्रेमात पडायला कोकणात गेला आहे, हे जरा अतीच होते. या रटाळ मालिकांमधून जरा थोडा तरी आनंद देण्यासाठी हे तर काहीच नाही हा कार्यक्रम सुरू झाला आहे. आता या कार्यक्रमानंतर झी मराठीने म्हटले पाहिजे की, हे तर काहीच नाही, आम्ही आणखी चांगले कार्यक्रम देणार आहोत.
प्रफुल्ल फडके/ छोटा पडदा
9152448055\

About Editor

अवश्य वाचा

उखाणा

सवाष्णीने आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पारंपरिक शैली ही महाराष्ट्राची ओळख आहे. लग्नात किंवा सण-समारंभात …