ठळक बातम्या

हृदयराणी ‘रातराणी’

‘अंधारल्या राती गंधाळल्या दाही दिशा’ हे वाक्य रातराणीसाठी अचूक लागू पडते. रातराणीचा रुबाब काय सांगू?, अतिशय नाजूक फुले, पांढºया रंगाची, सडपातळ बांध्याची, परंतु सुगंध… अहाहा! तिच्या सुगंधाची धुंदी मनावर चढतच जाते. तिन्ही सांजा झाल्या की, तिची फुलण्याची आणि मुक्त सुगंध उधळण्यासाठी लगबग सुरू होते आणि मिट्ट काळोख झाला की, तिचा सुगंध आसमंत दरवळून टाकतो.
रातराणी फुलली की, तिचा शोध घ्यावाच लागत नाही. त्या सुगंधाने आपणच तिच्याजवळ जातो. रातराणीच्या सुगंधाने मन अजूनच तिच्याकडे आकर्षित होते. इथे जर आपल्या प्रिय व्यक्तीचा सहवास असेल, तर फुलांचा हा मादक सुगंध आणि श्वासही गंधाळलेले होऊन जातात.

माझ्याबाबतीत घडलेली घटना सांगते. मी रोज रात्री १० ते १५ मिनिटे शतपावली करण्यासाठी आमच्या सोसायटीमध्ये उतरते. एक दिवस असे वाटले की, सोसायटीसमोरून जो रस्ता जातो तेथे जाऊया. जरासा बदल काहीतरी. त्याप्रमाणे मी त्या रस्त्यावर शतपावली करताना मला रातराणीचा सुगंध जाणवला. माझ्यापासून एक १० पावले ते झाड होते. इतके छान वाटले सांगू. इतक्या जवळ झाड होते आणि आपल्याला इतके दिवस ठाऊक कसे झाले नाही या विचाराने मन हळहळले. पण मग काय त्यानंतर तो रस्ता, ते झाड आणि मी यांची जणू घट्ट मैत्रीच झाली. आता माझी शतपावली अर्धा तास चालते. तो रातराणीचा सुगंध मला त्याच्याकडे खेचून नेतो. रातराणी माझ्यावरच जणू सौंदर्याचे फवारे उधळते असे वाटते हे कमी म्हणून की, काय माझ्या अत्तराच्या खजिन्यात रातराणीचे अत्तर कायम हजेरी लावून असते.
रातराणीची फुले ओंजळीत धरली की, ओंजळीला सुंदर सुगंधाचे दान प्रदान करते, परंतु अतिशय निर्गवी, कोणताही माज नाही. रातराणीच्या सुगंधात व सौंदर्यात एक प्रकारचा आदब दिसतो. तिचे सरळ असे देठ आणि त्यावरील टपोरे फूल रात्रीच्या मिट्ट काळोखातही नजरेत भरतात.

‘रातराणी’ रात्रीची राणी, रात्रीला आपल्याला सुगंधात चिंब भिजवून टाकणारी. आभाळातून लाखो चंद्र, चांदण्याही तिच्याकडे पाहत असतील असे वाटते. या रातराणीपुढे या चंद्र-चांदण्याही फिक्या पडतात.
रातराणीकडून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे की, स्वत:च्या धुंदीत, मस्तीत मस्त जगावे, पण ते करताना दुसºयालाही आनंद द्यावा. तेही निखळ मनाने, एखाद्याला आपल्यामुळे आनंद मिळतोय, पण त्याला त्याची जाणीव न होऊ देता आपण आपले कर्म करून तेथून बाजूला व्हावे ही मोलाची शिकवण रातराणी सहज शिकवून जाते.

– प्राची वैद्य
९७६७६१३१४२\\

About Editor

अवश्य वाचा

शिक्षक भरती घोटाळा

इंग्रजी माध्यमाच्या शाळेत विद्यार्थ्यांचे प्रवेश वाढायला लागल्यानंतर पालकांनी मराठी व इतर भाषिक शाळांकडे पाठ फिरवली. …