कमी वजनाच्या आणि हलक्या-फुलक्या नाजूक गोष्टींचे आकर्षण माणसाला असते. भावनाप्रधानतेनुसार सरलता, नाजूक फुलं, कापसाच्या म्हाताºया, कापसाची बोंडे, कमी वजनाची नाजूकशी चवळीच्या शेंगेसारखी स्त्री, लहान बालक लोकप्रिय ठरतात.
कोरीव काम केलेल्या छोट्या-छोट्या वस्तूंची ओढ माणसाला असते. सोनं वजनाने मोजले जात असलं आणि अधिक वजन असेल तितका अधिक मौल्यवान असलं, तरीही हलक्या-फुलक्या आणि नाजूक काम केलेल्या कलाकुसरीच्या शैलीच्या सोन्याच्या दागिन्यांची किंमत अधिक असते.
कमी वजनाची व्यक्ती ही अधिक तरुण मानली जाते. कमी वजनी; पण अधिक किमतीची व्यक्तिमत्व वजनदार ठरत आहेत. अधिक आकर्षक मानली जात आहेत. त्यामुळे वजन घटवा. हलके सुखी राहा. असं मानलं जातं.
आमच्या इथे व्यायाम केल्यावर हलकं-फु लकं वाटेल. आमचं अमुक-अमुक औषध घेतल्यावर वजन कमी होऊन हलका-फुलका देह होईल. अशा जाहिराती आहेत. वजन घटवता येईल, म्हणून तर जिम गाजतात. वजन कमी करून हलकं-फुलकं होण्याच्या धंद्याची भरभराट आपल्याला हेच सांगते की, हलक्या-फुलक्या, वजनाने कमी असलेल्या देहाचं पण माणसाला वेड असतं.
प्रवासी सामान बॅग फुल वस्तू मोबाइल, लॅपटॉप हे कमी वजनाचे हलके-फुलके असतील, तर त्यांची किंमत अधिक ठरत असते. जास्त ओझे टाळण्याकडे समाजाचा कल हल्ली दिसतो. या हलक्या-फुलक्या गोष्टींचे आकर्षण माणसाच्या मनात कायमच असतं.
हलका आहार घ्या सांगतात, तो आरोग्याला चांगला मानला गेला आहे. दु:खद मनावर ताण येईल असा चित्रपट, नाटक पाहिल्यावर असं वाचन केल्यावर आपल्या मनावर जणू काही भार येतो. त्यामुळे माणसांना हलकं-फुलकं वाचायलादेखील आवडते.
नको बाबा आयुष्यात फार प्रॉब्लेम असेही आहेत, त्यात अजून काहीतरी जड बघायला नको. विनोदी बघावं. डोकं वापरायला लागणार नाही, असं वाचावं-ऐकावं आणि हलक्या-फुलक्यात रमावं, अशी मानसिकता असते.
यात सत्यसुद्धा असतं. उदास गोष्टी बघितल्या की, ती नकारात्मकता, ते भाव मनात रुतून बसतात. हलक्या कथा त्या विनोदी मालिका आणि त्या घटना गोष्टी चित्तवृत्ती प्रसन्न करून जातात. (अगदी प्रसन्न करत नसतील, तर निदान अधिक दु:खी तरी करत नाहीत.)
दु:खद लिहिणाºया लेखकापेक्षाही हलकं-फु लकं लिहता येणारे लेखक हे अधिक लोकप्रिय होतात. दु:खद मालिका आणि चित्रपटांपेक्षाही विनोदी, हलके-फुलके कार्यक्रम लोकप्रियतेत अव्वल नंबर वर असतात.
हलका-फुलका लेख, सरळ लिखाण मनाला हलकं करून जातं. पचनी पडतं. लेख हलका-फुलका आहे, आवडेल.
– शुभांगी पासेबंद \