हनुमान चालिसा कुठून आली?

गुढीपाडवा मेळाव्याच्या भाषणात मशिदींवरील भोंग्यांना विरोध करण्यासाठी ‘हनुमान चालिसा पठण करा ’असा आदेश राज ठाकरे यांनी काढला. त्यानंतर एकदम संपूर्ण महाराष्ट्रात हनुमान चालिसाचा गवगवा सुरू झाला. त्यावरून राजकारण पेटू लागले; पण यात सर्वात मोठा प्रश्न पडतो तो म्हणजे मशिदीतून नमाजच्या वेळी दिली जाणारी बांग यासाठी हनुमान चालिसा हा पर्याय आला कुठून? कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी त्याला पर्याय देताना तो पर्याय कशासाठी आहे, त्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे.

नमाजावेळी मशिदींवरून भोंगे वाजतात ही तक्रार वर्षानुवर्षे आहे; पण ते नेमके काय आहे हे समजून घेतले पाहिजे. नमाजाला अझान किंवा अदान म्हटले जाते. इस्लाममध्ये, मुस्लीम समुदाय त्यांच्या दिवसाच्या पाच नमाजांसाठी जो शब्द मोठ्याने म्हणतो त्याला अजान म्हणतात. म्हणजे जो अजान म्हणत लोकांना [मशिदीत] आमंत्रित करतो, त्याला मुएझिन म्हणतात.

जेव्हा मदिना तैबामध्ये बझमत प्रार्थनेसाठी मशीद बांधली गेली, तेव्हा जमातची (नमाज जमवण्याची) वेळ जवळ आली आहे, हे लोकांना कळवण्याचा मार्ग काढण्याची गरज भासू लागली. जेव्हा रसूलल्लाह यांनी सहाबा इकराम (मोहम्मदचे अनुयायी) यांचा सल्ला घेतला तेव्हा चार प्रस्ताव समोर आले. त्यापैकी पहिला होता प्रार्थनेच्या वेळी ध्वज उभारावा. दुसरा होता की, उंच ठिकाणी आग लावावी. तिसरा होता की, ज्यूंप्रमाणे कर्णा वाजवला पाहिजे आणि चौथा होता तो ख्रिश्चनप्रमाणे घंटा वाजवा.

हे सर्व प्रस्ताव हजरत मोहम्मद सलल्लाहू अलैही वा सल्लम यांना त्यांच्या गैर-मुस्लिमांशी साम्य असल्यामुळे त्यांना आवडले नाही. या समस्येत हजरत मोहम्मद सलल्लाहू अलैही व सल्लम आणि सहाबा इकराम चिंतेत होते की, त्याच रात्री एक अन्सारी साहाबी हजरत अब्दुल्ला बिन जैद यांना स्वप्नात दिसले की, एका देवदूताने त्यांना अजान आणि इकामतचे शब्द शिकवले आहेत. हजरत मोहम्मद सलल्लाहू अलैही वसल्लम यांच्या सेवेत हजर राहून त्यांनी पहाटे आपले स्वप्न सांगितले, नंतर हजरत मोहम्मद सलल्लाहू अलैही वसल्लम यांना ते आवडले आणि ते स्वप्न अल्लाहचे खरे स्वप्न असल्याचे सांगितले.

हजरत अब्दुल्ला बिन जैद यांना सांगितले की, तुम्ही हजरत बिलाल यांना या शब्दांत अजान वाचण्यास सांगा, त्यांचा आवाज मोठा आहे, त्यामुळे तो प्रत्येक प्रार्थनेसाठी असाच मार्ग देईल. त्यामुळे त्या दिवसापासून अजानची पद्धत प्रस्थापित झाली आणि अशा प्रकारे हजरत बिलाल रजिअल्लाहू अनहू इस्लामचे पहिले अजान देणारे म्हणून प्रसिद्ध झाले.

या अजानमध्ये ‘अल्लाह सबसे महान हैं, मैं गवाही देता हूँ की, अल्लाह के सिंवा कोई दुसरा इबादत के काबिल नहीं हैं। मैं गवाही देता हूँ की, मोहम्मद सल अल्लाह के रसूल हैं। आओ इबादत की ओर। आओ सफलता की ओर। नमाज नींद से बेहतर हैं। अल्लाह सबसे महान हैं। अल्लाह के सिंवा कोई इबादत के काबील नहीं हैं।’ अशी प्रार्थना करून नमाजसाठी सर्व समाजाला आमंत्रित केले जाते. ते एक प्रकारचे एकजुटीचे आणि संघटीत करण्याचे तंत्र आहे. हे सांगितले ते फक्त सकाळच्या किंवा पहाटेच्या नमाजला एकत्रित करण्यासाठी आहे. वेगवेगळ्या वेळच्या आमंत्रणाचे तंत्र वेगळे आहेत.

पण आपण नेमके काय करत आहोत? आपण आपल्या बांधवांना एकत्रित करणारे आवाहन करा. अजान किंवा मशिदीवरील भोंग्यांना हनुमान चालिसा हा पर्याय नाही. हनुमान चालिसापेक्षाही संघटीत करण्यासाठी, मंदिरांकडे भक्तांना खेचण्यासाठी आवाहन करणारे तंत्र विकसीत केले, तर ते योग्य ठरेल. मोठे कर्णे लावून हनुमान चालिसा पठण केल्याने लोक मारुती मंदिराकडे वळणार आहेत का?, लोकांना मंदिरांकडे वळवण्यासाठी काय केले पाहिजे याचा विचार करायला नको का?, हनुमान चालिसाचा वापर हा शस्त्र केल्याप्रमाणे वार करण्यासाठी कसा काय केला जाऊ शकतो?

मुळात हनुमान चालिसा हा भक्तीचा मार्ग आहे. सर्वांनी चांगले वागावे, रामाची कृपा प्राप्त करावी यासाठी हनुमानाची ती स्तुती आहे. गोस्वामी तुलसीदासांनी रचलेले ते स्तुती काव्य आहे. हनुमानाचा पराक्रम त्यात वर्णन केलेला आहे. यातून प्रेमभाव निर्माण केला जातो. आत्मिक शांती लाभते; पण ते मोठमोठ्याने म्हणून माणसांना संघटीत करण्याचे स्तोत्र नाही. माणसांना संघटीत करण्यासाठी, आमंत्रित करण्यासाठी घंटानाद, शंखनाद केले तर चालतील; पण हनुमान चालिसा हा पर्याय होऊ शकत नाही. त्यामुळे कारण नसताना श्री हनुमानाला वेठीस धरल्यासारखे होते.

आपल्याकडे असंख्य देव आहेत, प्रत्येकाची मंदिरे अनेक आहेत. प्रत्येकाची स्तोत्र अनेक आहेत. नेमके म्हणायचे तरी काय? पण कोणतेही स्तोत्र, पठणाचे श्लोक हे आत्मशांती, वातावरण प्रसन्न करण्यासाठी आहेत. वातावरण गढूळ करण्यासाठी नाही. लोकांची झोप उडवण्यासाठी नाही. शांततेचा संदेश देणाºया या सगळ्या प्रार्थना आहेत. संघटीत करण्यासाठी या स्तोत्र, मंत्र, श्लोकांचा उपयोग नाही आणि करूही नये.

समर्थ रामदासांनी ‘सामर्थ्य आहे चळवळीचे, जो-जो करील तयाचे’ असे म्हणून प्रत्येक मनाला साद घातली आहे. समर्थ, बलवान होण्यासाठी ‘समर्थाचीया सेवका वक्र पाहे, असा सर्वभूमंडळी कोण आहे’ असे आव्हान देण्याची कोणाची हिंमत असेल, तर ती हिंमत करण्याची गरज आहे. पण हनुमान चालिसा हा संघटीत करण्याचा, आमंत्रित करण्याचा पर्याय नाही. समस्त हिंदू बांधवांना एकत्र करण्याची राज ठाकरे यांची इच्छा असलीच, तर त्यांनी नेमके काय पठण केले पाहिजे याचा विचार केला पाहिजे.

प्रफुल्ल फडके/ बिटवीन द लाईन्स

9152448055\\

About Editor

अवश्य वाचा

उखाणा

सवाष्णीने आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पारंपरिक शैली ही महाराष्ट्राची ओळख आहे. लग्नात किंवा सण-समारंभात …