ठळक बातम्या

स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी!

‘आई’ या शब्दामध्येच ईश्वराचे रूप लपलेले आहे. ‘आ’ म्हणजे ‘आत्मा’ आणि ‘ई’ म्हणजे ‘ईश्वर’. असे म्हटले जाते की, देवाने या जगाची काळजी घेण्यासाठी आई ही अशी एक महान असलेली विभूती या धरतीवर पाठवली असेल की, जी सर्वांची नि:स्वार्थ भावनेने काळजी घेऊ शकते.
कवी यशवंतांनी आईची थोरवी गाताना म्हटले आहे की, ‘स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी!’ अगदी खरे आहे ते. मातेचे प्रेम अतुलनीय आहे. सत्ता, मत्ता, विद्वत्ता हे सारे या जन्मदातेपुढे कस्पटा समान आहेत. म्हणून तर कुणापुढेही न वाकलेला जगज्जेता सिकंदर आपल्या मातेसमोर नतमस्तक होत असे. महाराष्ट्राचे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हेही श्रेष्ठ मातृभक्त होते. मातेच्या वात्सल्याचे स्वरूप सर्वत्र सारखेच आढळते. मातेच्या वात्सल्याची अनेक उदाहरणे आपल्या सर्वांच्या परिचयाची आहेत. चार घरी हिंडून भाकर-तुकडा गोळा करून आणणारी भिकारीण स्वत: उपाशी राहते, पण आपल्या लेकराला तो ओला-कोरडा तुकडा आधी भरवते. प्रसंगी अपत्याच्या वात्सल्यापोटी माता आपल्या प्राणांचीही बाजी लावते. इतिहासातील याचे जिवंत स्मारक म्हणजे रायगडावरील हिरकणी बुरूज! माता आपल्या लेकरासाठी काय करीत नाही? ती त्याला जन्म देते. लालन-पालन करते. एवढेच नव्हे, तर सर्वस्वी परावलंबी असलेल्या आपल्या बाळाला ती डोळ्यांचा दिवा व तळहातांचा पाळणा करून सर्वतोपरी सांभाळते. ती त्याचे संगोपन करते, त्याला नीतिकथा, चातुर्यकथा सांगून ती त्याचे कोमल मन फुलवते. त्यावर सुसंस्कार घडवते. शिवबा, विनोबा, बापूजी यांसारख्या थोर व्यक्‍तींनी आपल्या यशाचे सारे श्रेय आपल्या मातेलाच दिले आहे.

बापूजी तर आपल्या आत्मवृत्तात सांगतात, ‘एक माता ही सहस्त्र शिक्षकांपेक्षा श्रेष्ठ आहे.’ मातेचे हे उपकार आपण कधीही फेडू शकत नाही. आपल्या वृद्ध माता-पित्यांची सेवा करणे, ही काही अंशाने त्या ऋणाची फेड म्हणता येईल. खरेतर तो आपल्या कर्तव्याचाच एक भाग असतो. मुले किती ही वाईट वागली, तरी आई त्यांच्यावरच माया करते. एका मुलाने आपल्या आईचे काळीज कापून हातात घेतले व तो रस्त्याने पळत जाऊ लागला. पळता-पळता ठेच लागून तो पडला व ते काळीज त्याच्या हातून खाली पडले. त्या काळजातून आवाज आला ‘बाळा पडलास का रे?, फार लागले नाही ना तुला!’ ही गोष्ट आपल्या सर्वांना माहीत असेलच.
आईची आपल्या मुलांवर प्राणापलीकडे माया असते हेच या गोष्टीतून सिद्ध होते. ज्याला आई नाही ज्याला मातृसुख नाही. तो खरोखर दुर्दैवी आहे. एखादा जगातील सर्व संपतीचा मालक असून, त्याला आई नसेल, तर तो कमनशिबीच असतो. मात्र एखाद्या गरीब मजूर असूनही ज्याला आई आहे तो श्रीमंत आहे. कारण ‘मातृ प्रेमाच्या सुखाचे धन हेच सर्व श्रेष्ठ धन आहे.’ ते ज्याला आहे तोच खरा धनवान! नाहीतर तो महान आणि श्रेष्ठ असला, तरी तो आईविना भिकारीच. बाजारात पैशांनी आई-वडील सोडून सर्व काही विकत मिळते.

आई-वडील इतके पवित्र की, त्यांच्या पायाचे घ्यावे तीर्थ. सदा असावे त्यांच्या सेवेशी, मग कशाला हवे तीर्थक्षेत्र काशी. आईचे ऋण फिटणे अशक्यच आहे.
े बाळासाहेब हांडे / ९५९४४४५२२२\\

About Editor

अवश्य वाचा

शिक्षक भरती घोटाळा

इंग्रजी माध्यमाच्या शाळेत विद्यार्थ्यांचे प्रवेश वाढायला लागल्यानंतर पालकांनी मराठी व इतर भाषिक शाळांकडे पाठ फिरवली. …