ठळक बातम्या

स्वागत करूया नववर्षाचे!

जुने वर्ष जाते, नवीन वर्ष येते. हे चक्र पूर्वापार चालत आलेले आहे. तसं पाहायला गेलं, तर भिंतीवरील जुने कॅलेंडर बदलून त्या ठिकाणी नवीन कॅलेंडर लावणे एवढाच काय तो ठळकपणे लक्षात येणारा फरक. बाकी सूर्य तोच, चंद्र तोच, आकाश तेच आणि पृथ्वीही तीच. पण तरीही आपण नवीन वर्षाचे स्वागत थोड्या फार फरकाने करतोच. मागच्या वर्षाप्रमाणेच यंदाही कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे नववर्ष स्वागताच्या कार्यक्रमांवर बंधने असणार आहेत.
खरं पाहता जगभरात वेगवेगळ्या कॅलेंडरप्रमाणे वेगवेगळ्या दिवशी नववर्षाची सुरुवात होते. जवळजवळ ७५हून जास्त वेगवेगळे दिवस नववर्षाची सुरुवात म्हणून पाळले जातात. गुढीपाडवा हा बहुसंख्य हिंदूंचा नववर्ष दिन. अशाच प्रकारे इतर धर्मीय आपापल्या परीने नववर्षाची सुरुवात करत असतात, परंतु जगभरात सर्वमान्य दिवस म्हणून १ जानेवारी याच दिवसाला नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. साहजिकच ३१ डिसेंबर हा दिवस थर्टीफर्स्ट डिसेंबर ही वेगळी ओळख मिळवून आहे आणि तो साजरा करणे म्हणजे काय हे वेगळे सांगायला नको. या एकाच दिवसात मद्य, मांस, मासे यांची भरमसाठ विक्री होते आणि त्यावर आडवातिडवा हात मारला जातो. पर्यटनस्थळे, रिसॉर्ट, समुद्रकिनारे, धार्मिकस्थळे सगळीकडेच गर्दीचा महापूर उसळलेला असतो. या काळात वाहतूक कोंडी ही ठरलेलीच असते. बहुसंख्य पर्यटक एकाचवेळी बाहेर निघाले, तर याहून दुसरे काय होणार?

याचबरोबर नववर्षाचे स्वागत करताना मनोरंजनाचा पर्याय म्हणून दूरचित्रवाहिन्यांवरील कार्यक्रम पाहणारेही आहेत. किंबहुना होते असेच म्हणावे लागेल. दूरदर्शन ही एकमेव वाहिनी असण्याच्या काळात ३१ डिसेंबरचे कार्यक्रम आवडीने पाहिले जात. काही कार्यक्रम मनोरंजन करत असले, तरी बरेचसे कार्यक्रम भ्रमनिरास करत असत. दुसºया दिवशी वर्तमानपत्रातून त्या कार्यक्रमांवर टीका ही ठरलेलीच असे. आता चॅनेल्स वाढले तसे पर्यायही वाढले. अजूनही ३१ डिसेंबरला असे कार्यक्रम पाहणाºयांची विविध वाहिन्यांमुळे सोय झाली आहे. लहानपणी दूरदर्शनचे कार्यक्रम आवर्जून पाहिल्याचे अजूनही आठवतेय.
३१ डिसेंबरच्या मध्यरात्री बरोबर बारा वाजताचा ठोका जुने वर्ष संपून नवीन वर्ष सुरू झाल्याची जाणीव करून देतो आणि सगळीकडेच एकच जल्लोष होतो. एकमेकांना हॅप्पी न्यू इअर करून शुभेच्छा, तर दिल्या जातातच पण यानिमित्ताने फटाक्याची आतषबाजीही केली जाते. नाविन्याची ओढ सर्वांनाच असते. त्या ओढीनेच जुन्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत दणक्यात केले जाते. सरत्या वर्षात काही मनासारखे झाले नसेल, तर येणाºया वर्षात काही तरी सकारात्मक नक्कीच घडेल हा आशावादच माणसाला नव्या वर्षाची आतुरतेने वाट पाहायला लावतो.

वर्ष संपत असताना वर्षभरात काय घडले याची उजळणी करणे कधीही चांगलेच. प्रसंग बरेवाईट कसेही असू शकतात. वाईट आठवणींना शक्यतो उजाळा दिला जात नाही. त्यांची पुसटशी आठवण काढली जाते. चांगले प्रसंग मात्र आवर्जून लक्षात ठेवले जातात. खरंतर हेच प्रसंग पुढील जीवनातील वाटचाल सुसह्य करत असतात. ब‍ºयावाईट घडामोडींचा आढावा घेताना आपले काय चुकले, कोणता धडा शिकलो हेही पाहणे तितकेच महत्त्वाचे ठरते, कारण तसे केले तरच चुकांची पुनरावृत्ती टाळू शकतो आणि पुढची दिशा ठरवू शकतो.
व्हॉट्सअ‍ॅपवर नववर्षाच्या शुभेच्छांचा ओघ सुरू झालाय. फेसबुकवर सुद्धा तशा पोस्टची सुरुवात होईल. हे होत असताना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देण्यात एक वेगळाच आनंद असतो, हे जरी खरे असले, तरी सामाजिक अंतराच्या नियमावलीमुळे यंदाही तशा भेटी टाळायला हव्यात. येणाºया नववर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

About Editor

अवश्य वाचा

शिक्षक भरती घोटाळा

इंग्रजी माध्यमाच्या शाळेत विद्यार्थ्यांचे प्रवेश वाढायला लागल्यानंतर पालकांनी मराठी व इतर भाषिक शाळांकडे पाठ फिरवली. …