स्वप्नांचे प्रवासी बना!

वाटेवर चाललेल्या उद्याच्या नक्षीकांत यशस्वी तेजोमय योद्धांना सर्वप्रथम नववर्षाच्या खूप-खूप शुभेच्छा! खरेतर, स्वप्न पाहणे आणि स्वप्नाळू असणे, यात जमीन अस्मानाचे अंतर आहे. आपल्या स्वप्नाला जेव्हा धडपडीची, कर्तृत्वाची जोड नसते, तेव्हा तो स्वप्नाळूपणा असतो. सगळे इमले मनातल्या मनात. जमीन खणून, पाया खणल्याशिवाय इमारत उभी राहणार कशी? त्यामुळे मृगाचे वारे वाहू लागले, तरीही जमिनीची नांगरणी न करता फक्त सुगीची आशा करणे हे झाले स्वप्नाळूपण. पण मनातले स्वप्न साकार व्हावे, म्हणून जो प्रत्यक्ष कृतीला लागतो तो खरा तरुण.
खरेतर, तरुण हा उद्याच्या क्रांतीचा निर्माता असतो, तो मनात आणेल ते करू शकतो.

आकाशाशी हातमिळवणी सुद्धा करू शकतो आणि शेवटी सर्व ऋतूत फिरून काही दिवसांनी स्वत:ला समाजापुढे महावृक्ष म्हणूनदेखील सिद्ध करू शकतो.
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम साहेबांचे प्रसिद्ध वाक्य आपणा सर्वांनाच माहिती आहे, ‘झोपेत पडतात ती स्वप्ने नव्हेत, जी झोपू देत नाहीत ती खरी स्वप्ने!’

आज नावाभोवती अमाप प्रसिद्धीचे गारूढ असणाºयांपैकी अमिताभ बच्चन, लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर, शरद पवार त्यांच्या क्षेत्रात अफाटपणे यशस्वी आहेत, पण यांनी देखील त्यांच्या आयुष्यात कधीतरी स्वप्ने पाहिलीच होती ना, पण ते कधी स्वप्न पाहून झोपले नाहीत, तर स्वप्नांनी त्यांना ताडकन जागे केले आणि यशाच्या उत्तुंग शिखरावर नांदायला भाग पाडले.
खरेतर, शिखरावर निघालेल्यांनाच तर अडचणी येतात ना! पण त्यातून पार होणाºयांना जो आनंद होतो, त्या आनंदाशी कुठल्याही आनंदाची तुलना होत नाही. अंथरुणात सुस्तावलेल्या आळशी माणसालाही घाम येतो नि किल्ला सर करणाºया मर्द मावळ्यांनाही घाम येतो, या दोन ‘घामा’त फरक आहे की नाही?

तरुण मित्रांनो, आता निवड तुम्हाला करायची आहे, आपल्याला कोणत्या प्रकारचा आनंद हवा आहे!
खरंतर, जिद्द हा ध्येयाचा प्राणवायू आहे. जिद्दीशिवाय नुसते ध्येय जगू शकत नाही. ध्येय म्हणजे जर स्वप्न असेल, तर ध्येयपूर्तीसाठी सतत जिद्दीचा, ध्यासाचा श्वास जिवंत ठेवायलाच पाहिजे. खरंतर, तुम्ही सर्वच बुद्धिमान तर आहेत. या क्षणी एकाग्रही आहेत थोडा विचार करा. अगदी सामान्यांतूनच तर असमान्य माणसे जगाला मिळाली ना? मग स्वत:ला सामान्य, गरीब, आमच्या हातून काय घडणार? असे नकारात्मक स्वत:ला हिणवू नका. तुम्हाला सांगतो, जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती हा एकसारखा नसतो, तो पूर्णत: वेगळा असतो. त्याच्यासारखे अगदी कुणीही नसते. शेवटी एकच सत्य आहे. जग कितीही मोठे असो, जगात कोट्यवधी माणसे असोत, पण एकच गोष्ट काळ्या दगडावरची रेघ आहे, तुमच्यासारखे या जगात दुसरे कुणीही नाही.

कशावरून तुम्हीही जगासाठी ‘उदाहरण’ होणार नाही? काय अशक्य आहे! शक्य आहे! अट एकच आहे. स्वप्ने नुसती बघू नका, त्या स्वप्नांसोबत सत्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू करा.
एक दिवस, तुम्हालाच आश्चर्य वाटेल, बघितलेल्या एका स्वप्नाला आपण चक्क हात लावू शकलो.

– आकाश दीपक महालपुरे/युवाशक्ती
7588397772\\

About Editor

अवश्य वाचा

उखाणा

सवाष्णीने आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पारंपरिक शैली ही महाराष्ट्राची ओळख आहे. लग्नात किंवा सण-समारंभात …