मोठमोठ्या लोकांच्या ओळखी सांगणारे तुम्हाला अनेक जण भेटतील, मात्र स्वत:ची ओळख असणारे फार कमी लोकं असतात. होय अगदी लाखात एकच सत्य. जे पण माझे प्रिय, अनोळखी, मित्र-मैत्रिणी असतील माझा पहिला उपदेश असा आहे की, सर्वप्रथम स्वत:ला ओळखा. स्वत:ची ओळख जीवनात यशस्वी होण्याचा राजमार्ग आहे. स्वत:ची शक्ती सर्वांनीच जाणून घेतली पाहिजे. समाजात वावरताना अनेक लोक जी काही आपल्याला ओळख देत असतील, मग ते तुम्ही ‘ढ’, ‘हुशार’, अशी असेल, अथवा मग मित्र परिवार तुम्हाला जी ओळख देत असेल ती जिगरी, वैरी, गैरी अथवा मग जी ओळख तुम्हाला घरची मंडळी देत असतील, प्रेमळ, खडूस, चांगला. ही सगळी विशेषणे म्हणजे त्यांच्या नजरेत आपण कळत-नकळत निर्माण केलेली आपलीच ओळख असते; पण मग स्वत:च्या नजरेत तुम्ही कसे आहात? आपल्या सर्व कर्मकांडाचे साक्षीदार आपण स्वत:च असतो. त्यावरून जर तुम्ही स्वत:ची ओळख समजून घेत असाल, तर मात्र तुम्ही स्वत:ला फक्त असंच एखादं दुसरं विशेषण लावून घ्याल. मी चांगला आहे, मी वाईट आहे, मी अभ्यासात ‘ढ’ आहे, मी अतिहुशार आहे वगैरे वगैरे. ही चूक लाखभर लोकं करतात. ती चूक तुम्ही करू नका. तुमचे चांगले गुण, क्षमता तुम्हाला माहीत असल्यास तुमचा आत्मविश्वास वाढेल.
माझ्यात कोणत्या कमतरता आहेत, हे आपल्याला ओळखता आले पाहिजे. ज्या प्रकारे एखाद्या मजबूत साखळीतील एक कडी कमजोर असल्यास साखळी तुटू शकते. त्याच प्रकारे तुमच्यात असलेल्या एखाद्या कमतरतेवर जर तुम्ही मात केली नाही, तर तुमचं चांगलं नाव खराब होऊ शकतं. माझी ध्येयं कोणती आहेत, हेही मला माहीत असणे आवश्यक आहे. गाडीत बसून ड्रायव्हरला पेट्रोल संपेपर्यंत, नुसतंच एका इमारतीच्या भोवती गोल-गोल फिरायला सांगू का? अर्थात आपले उत्तर असेल नाही. जीवनात ध्येयं असतील, तर आपल्याला दिशा मिळेल आणि आपण उगाच फिरत राहणार नाही, कारण आपल्याला जीवनात काय करायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला कशी योजना करायला पाहिजे, हे आपल्याला माहीत पाहिजे.
आपली ओळख काय आहे?, हे जेव्हा तुम्हाला पक्कं माहीत असतं, तेव्हा तुम्ही जणू एका झाडासारखे असता. ज्याची मुळं खोलवर रुजलेली असतात. ते खूप मोठ्या वादळातदेखील टिकून राहतात. तुमची मतं ठाम नसतील, तर तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकणार नाही. सरडा सहसा आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीप्रमाणे रंग बदलतो. त्याचप्रमाणे तुम्हीही सोबत्यांमध्ये मिसळण्यासाठी त्यांच्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला, तर याचा अर्थ तुम्ही स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करू शकणार नाही.
पण याउलट जेव्हा तुमचं वागणं तुमच्या ठाम मतांवर आधारित असतं, तेव्हा इतरांचा तुमच्यावर प्रभाव पडत नाही, म्हणजे तुम्ही तुमची ओळख टिकवून ठेवता. तुम्ही आज ठरवलंत, तर कोणत्याही क्षेत्रात कोणत्याही व्यक्तीच्या नजरेत कित्येक पट आजच्यापेक्षा चांगले बनू शकता अथवा वाईट सुद्धा, मात्र त्यासाठी तुम्ही स्वत:ला ओळखणं अतिशय गरजेचं असते. स्वत:ची ओळख जेव्हा आणि जितकी प्रामाणिकपणे तुम्ही करून घ्याल, तेव्हा आणि तितक्याच प्रमाणात तुम्ही तुम्हाला हवी तशी, हवी असेल तेव्हा तुमची ओळख बनवू शकता. यासाठी प्रथम स्वत:ला ओळखायला शिका. देशाचे चांगले नागरिक बनण्यासाठी चांगल्यांच्या संगतीत राहा. चांगले विचार ऐका. निश्चितच तुमच्यामध्ये परिवर्तन होईल.
– बाळासाहेब हांडे / ९५९४४४५२२२\\