स्वत:चे हित पाहण्यासाठी

नुकतीच राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीतून बाहेर पडल्याचे त्यांनी जाहीर केले. अर्थात त्यांची ताकद किती होती आणि ते बाहेर पडल्याने आघाडीला काय परिणाम होणार आहे हे सर्वांना माहिती आहे. नगण्य अशी ताकद असलेल्या राजू शेट्टी यांच्या संघटनेने फक्त स्वत:चे हित पाहण्यासाठी कधी या आघाडीशी, तर कधी त्या आघाडीशी हात मिळवणी केली. त्यामुळे शेतकºयांचे हित न साधता त्यांचे नुकसान करणारी ही विचारसरणी बाहेर पडल्याने काही फरक पडत नाही. ते शेतकरी हितासाठी सरकारबरोबर आले नव्हते, तर कोणाच्या हितासाठी आले होते हे सर्वांनाच माहिती असल्याने त्यांच्या बाहेर पडण्याची फारशी कोणी दखलही घेतली नाही.

कधीकाळी एनडीएबरोबर असणारे राजू शेट्टी वेळ आल्यावर त्यातून बाहेर पडले आणि महाविकास आघाडीबरोबर गेले. त्यामुळे त्यांनी विश्वासार्हता केव्हाच गमावलेली आहे. शेतकरी हितासाठी त्यांना कार्य करायचे होते तर शेतमाला, भाजीपाला आंदोलनात नासाडी करण्याचे त्यांनी काम केले नसते. त्यांनी ते गरीबांना वाटून टाकले असते. शेतकरी कधीही आपला निर्माण केलेला माल नास होताना पाहू शकत नाही. पण शेतकºयांचे खरे कैवारी नसल्यानेच कोणत्याही आंदोलनात मालाची नासाडी करायची, दुधाचे टँकर फोडायचे असले प्रकार केले जातात. त्यामुळे सर्वसामान्य जनतेने नेत्यांना नाकारले आहे. त्यातून आलेल्या वैफल्याने आता कुठलीच संधी मिळण्याची शक्यता नसल्याने महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यांना शेतकरी हित वाटले असते, तर त्यांनी शेतकºयांना सधन करणाºया कृषी कायद्यांना विरोध केला नसता.

सोयीचे राजकारण हाच यातून हेतू दिसून येतो. राज्यात हे सरकार आले, तेव्हा राजू शेट्टी आघाडीसोबत गेले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेत गंभीर मतभेद होऊन आधीच फूट पडली होती. राजू शेट्टी यांचे एकेकाळचे घनिष्ठ सहकारी सदाभाऊ खोत भारतीय जनता पक्षाबरोबर गेले आणि यापूर्वीच्या भाजप-शिवसेना मंत्रिमंडळात मंत्री झाले. आता आघाडी सरकारमध्येही स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मंत्रिपद मिळू शकले असते; पण संघटनेचे एकमेव आमदार देवेंद्र भुयार शेवटपर्यंत मंत्री होऊ शकले नाहीत. शेवटी त्यांनी संघटना सोडली. संघटनेनेही त्यांना काढून टाकले.त्यामुळे स्वाभिमानीचे अस्तित्वच संपुष्टात आल्याचे चित्र तयार झाले.

याच काळात विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त आमदारांच्या प्रस्तावित यादीत राजू शेट्टी यांचेही नाव होते, असे सांगण्यात आले. एकदा विधान परिषदेवर आल्यावर राजू शेट्टी यांना मंत्रीपद मिळू शकलेही असते; मात्र राज्यपालांनी आजतागायत ही यादीच मंजूर केलेली नाही. आता शेट्टी स्वत:च राज्यपालांना भेटून, आपले नाव यादीत असेल तर काढून टाका, अशी विनंती करणार आहेत, असे म्हणतात. पण राज्यपाल नियुक्त आमदार हे कलाकार, क्रीडापटू अशा क्षेत्रातले निवडायचे आहेत. यापैकी कोणत्या खेळाचे ते खेळाडू आहेत? राजकारण हा खेळ यात पकडतात का हे माहिती नाही, पण एकूणच राजू शेट्टी यांची विचारसरणी कोणाशीही जमवून घ्यायचे नाही अशीच आहे. एकेकाळी आपले गुरू आहेत असे सांगून शेतकरी नेते शरद जोशी यांच्याबरोबर ते होते. कालांतराने शरद जोशींनाही त्यांनी सोडले. त्यामुळे धरसोड प्रवृत्तीच्या नेत्यांकडून कोणतेही विधायक काम होऊ शकत नाही हे जनता आता जाणत आहे. किंबहुना शेतकºयांनाही आपले नेतृत्व यांनी करू नये असेच वाटत असावे.

खरंतर राज्यातील सर्वच शेतकरी संघटना आणि त्यांचे नेते राजकीय पक्षांच्या वळचणीला जाऊन बसले असून, आपली मूळ ताकद व आवाज हरवून बसले आहेत. अर्थात, हे दुखणे आजचे नाही. एकेकाळी मते मागायला तुमच्या दारात आलो, तर जोड्याने मारा, असे जाहीरपणे म्हणणाºया शरद जोशी हे पण भाजपच्या कृपेने खासदार झाले. अर्थात शरद जोशी हे द्रष्टे आणि शेतकºयांच्या हितावर नितांत निष्ठा असणारे नेते होते. राजू शेट्टी यांची त्यांच्याशी तुलना होऊ शकत नाही. आज शरद जोशी असते तर त्यांनी केंद्राने आणलेल्या तीनही कृषी कायद्यांचा अभ्यास केला असता आणि शेतकºयांना हे कायदे तुमच्या हिताचे आहेत हे समजावून सांगितले असते. पण दुर्दैवाने तसे झाले नाही. कारण आताच्या शेतकरी नेत्यांना शेतकºयांनी कर्जमुक्त व्हावे, असे वाटतच नाही.

राजू शेट्टी आघाडीतून बाहेर पडताना, शेतकºयांच्या अनेक मागण्यांचा उल्लेख करीत आहेत. किमान समान कार्यक्रम आघाडी राबवत नाही, असेही ते म्हणतात. हे कळायला त्यांच्यासारख्या चाणाक्ष नेत्याला अडीच वर्षे का लागली हे अनालकनीय आहे. महाविकास आघाडीत गेल्यावर राजू शेट्टी भाजपला लाखोली वाहत होते. आता मात्र त्यांच्या स्वागतासाठी पायघड्या अंथरण्यासाठी त्या पक्षातील नेते पुढे सरसावत आहेत. हे एक गलिच्छ राजकारण होताना दिसत आहे.

खरंतर शरद जोशी यांचा वारसा सांगणाºया किंवा नाकारणाºया अशा दोन्ही प्रकारच्या शेतकरी संघटना आज महाराष्ट्रातला आपला सगळा प्रभाव हरवून बसल्या आहेत. कारण आपल्या ताकदीचा वापर यांनी केवळ स्वहितासाठी केला. शक्तिप्रदर्शन करून स्वत:च्या पदरात कुठले तरी पद पाडून घ्यायचे हा विचार केला. शेतकºयांचे हित कोणीच पाहिले नाही. त्यामुळे ते ना कधी शरद जोशींच्या विचारांचे झाले ना होऊ शकतील. फक्त शेतकºयांना भडकवून आंदोलनात उतरवायचे आणि शेतमालाची नासाडी करायची. या प्रवृत्तीना सर्वसामान्य माणूस कंटाळला आहे. शेतकरीही वैतागला आहे. अशा परिस्थितीत जनमत गमावलेले हे नेते आपल्याला बाहेर काढून टाकतील या भीतीनेही बाहेर पडले असावेत असे वाटते.

About Editor

अवश्य वाचा

उखाणा

सवाष्णीने आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पारंपरिक शैली ही महाराष्ट्राची ओळख आहे. लग्नात किंवा सण-समारंभात …