ठळक बातम्या

सुख म्हणजे नक्की काय असते

खरे म्हटले, तर सुखासाठी सर्वांचीच धडपड चालू असते. सुख नको असे म्हणणारा माणूस या जगात शोधून सापडणार नाही. जगात शाश्वत सुख आणि अशाश्वत सुख असे दोन प्रकार सांगितले आहेत. परमेश्वराचे चिंतन, मनन हे आध्यात्मिक जरी असले, तरी ते शाश्वत सुख मानले आहे. या उलट विविध भौतिक गोष्टींपासून मिळणारे सुख हे कालांतराने सुखच असेल असे नाही. म्हणून याला अशाश्वत सुख म्हटले आहे. सुख हे ज्याच्या त्याच्या मानसिकतेवर अवलंबून असते, असे मला वाटते. प्रत्येकाची सुखाची व्याख्या वेगळी असते.
कोणी मोठा बंगला असून देखील सुखी नसतो, तर कुणी छोट्या झोपडीत राहून देखील सुखी असतो. याच्यामुळे सुख नक्की काय असते, असा प्रश्न पडतो. खरे म्हणजे सुख हे आपल्याला देवाने दिलेले मोठे वरदान आहे, पण आपण ते समजून घेत नाही. किंबहुना आपण दु:ख जास्त कवटाळतो. म्हणजे आपणाकडे जे नाही, त्याची कारणे शोधत आपण मनाला दु:खी करतो. जे आपल्याकडे आहे, त्याचा उपभोग न घेता आपण सुख गमावतो. जेव्हा आपण सकारात्मक विचार करतो, तेव्हा आपले मन शांत होते आणि नसलेल्या गोष्टींपेक्षा असलेल्या गोष्टींचा विचार करू लागते. मग समजते की, आपल्याकडे तर भरपूर काही आहे. आपण विनाकारण धावत्या गोष्टींमागे पळत होतो.

मन जर आनंदी असेल, तर कोणतेही शारीरिक किंवा मानसिक कष्ट जाणवत नाहीत. लहान सहान गोष्टीतही सुख शोधले, तर नक्की सापडते. थोड्या बहुत प्रमाणात सर्वांच्याच वाटेला कष्ट, दु:ख येत असतात. ते जीवनाचे अविभाज्य घटक आहेत. अशावेळी मन प्रसन्न, आनंदी ठेवले की, सुख आपोआप आपल्याला शोधत येते. सुखी होण्यासाठी आधी समाधानी व्हायला पाहिजे. आहे त्यात समाधानी असणे महत्त्वाचे आहे.
माणूस समाधानी तेव्हाच होतो, जेव्हा जी काही परिस्थिती त्याच्या वाट्याला आली असेल, ती विनातक्रार निमुटपणे तो स्वीकारतो. दुसºयाबरोबरची तुलना सोडतो. आहे त्यात आनंद शोधतो. असे समाधान आपल्याला सुखाच्या वाटेवर घेऊन जाते. सुख हे भोगण्यापेक्षा समजण्यात अधिक शहाणपण असते. एखादी गोष्ट आपल्याकडे नसली की, आपण दु:खी होऊन ती मिळवण्याच्या मागे लागतो. ज्या क्षणी ती मिळते, तो सुखाचा क्षण असतो, पण परत पुढल्या क्षणी त्या गोष्टीची ओढ संपते व नवीन एखाद्या गोष्टीची ओढ लागून ती मिळवण्याकरिता परत आपण दु:खी होतो. अर्धा ग्लास रिकामा आहे म्हणून दु:ख करत बसण्यापेक्षा अर्धा ग्लास भरलेला आहे हे बघून सुख का मानू नये.

मराठी लिपीमध्ये सुख हा शब्द ‍ºहस्व व सहज बोलायला सोपा केला आहे, पण दु:ख हा शब्द बोलतानाही जरा जड व दुच्या (दु:खा) पुढे दोन टिंबरूपी अश्रुंचे थेंब दिले आहेत. सुख म्हणजे फुलपाखरासारखे मोहक, चंचल आणि निसटतच हातात येते, पण पकडताना बोटातून उडाले म्हणून आपण दु:खी झालो, तर बोटांना त्याच्या लागलेल्या रंगाकडे, त्या सुखाकडे आपण लक्षच दिले नाही व नुसते नशिबाला दोष देत राहिल्यास जीवनाला काय अर्थ.
म्हणून सुख हे भोगण्यापेक्षा ते समजण्यात अधिक असते हे लक्षात घेणे आवश्यक आहे. सुख प्रत्येकाला हवे, तर दु:ख कोणालाच नको असते. सुखाचा लंबक जेवढा वर जातो, तितक्याच गतीने तो खाली येऊन पुन्हा दु:खाच्या दिशेने वर जातो, याचेही भान ठेवले पाहिजे. जेवढे सुख तुम्ही मिळवता, तितके दु:खही तुम्हाला मिळणार आहे, असे जणू तो काळ घोषित करत असतो. सुख कधीच कायम राहत नाही, तसेच दु:खही कधीच कायम राहत नाही, हे लक्षात घेऊन समोर आलेला क्षण आनंदाने जगणे आणि त्याला धीटपणे सामोरे जाणे म्हणजेच खºया अर्थाने जगणे होय. शेवटी सुख, दु:खाचे मिश्रण हेच जीवन आहे, हे आपण लक्षात घेणे गरजेचे आहे. नसलेल्या गोष्टींचा विचार केला नाही आणि अशक्य गोष्टींच्या पाठीमागे लागले नाही, तर दु:ख आपल्या वाट्याला जात नाही.

े बाळासाहेब हांडे े/ ९५९४४४५२२२\\

About Editor

अवश्य वाचा

शिक्षक भरती घोटाळा

इंग्रजी माध्यमाच्या शाळेत विद्यार्थ्यांचे प्रवेश वाढायला लागल्यानंतर पालकांनी मराठी व इतर भाषिक शाळांकडे पाठ फिरवली. …