ओटीटी प्लॅटफॉर्म, टीव्ही, स्मार्ट फोन यांमुळे आता थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहण्याचे फारसे आकर्षण वाटत नसले, तरी चित्रपट ही एक आपली संस्कृती आहे, त्या कलेला यश मिळण्यासाठी आणि गेल्या दोन वर्षांत डबघाईला आलेल्या चित्रपटसृष्टीला सावरण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी थिएटरला जाऊन सिनेमा पाहण्याची गरज आहे. त्यामुळे एकप्रकारे अर्थचक्रही सुरळीत चालेल आणि मनोरंजनाचा आनंदही मिळेल.
गेल्या काही वर्षांपासून मराठी चित्रपटसृष्टी ही प्रबळ बनताना दिसत आहे. खरंतर मराठी चित्रपटसृष्टी हा बॉलीवूडचा आत्माच आहे. कारण मुळात भारतात चित्रपटाचा पाया घालणारे दादासाहेब फाळके हे मराठी होते. त्यानंतर व्ही. शांताराम यांच्यापासून ते आजच्या महेश मांजरेकरांपर्यंत अनेक मराठी दिग्गजांनी बॉलीवूडमध्ये आपले स्थान निर्माण केलेले आहे. त्यामुळे मराठी चित्रपटाला प्रोत्साहन देण्यासाठी सिनेमाला चला अशी हाक द्यावी लागेल.
आजच्या शुक्रवारी अनेक चित्रपट प्रदर्शित होत आहेत. त्यात मराठी चित्रपटही आहेत. कोरोनाचे निर्बंध शिथिल केल्यानंतर नाट्य, चित्रपटगृहांना परवानगी दिल्यानंतर कोणते चित्रपट प्रदर्शित होतात, याकडे सिनेरसिकांचे लक्ष लागले होते, पण अजूनही फारसे चित्रपट प्रदर्शित करण्याचे धाडस मागच्या महिन्यात कोणी केले नव्हते. नोव्हेंबरचा महिना हा जुन्या चित्रपटांवरच चित्रपटगृहे आणि मॉलनी काढला, पण खºया अर्थाने ३ डिसेंबरच्या शुक्रवारी नवे चित्रपट येत आहेत, त्यांचे चांगले मूल्यांकन प्रेक्षकांनी केले पाहिजे असे वाटते.
३ डिसेंबरला झी मीडियातर्फे प्रदर्शित होणारा पांडू हा एक महत्त्वाचा चित्रपट आहे. विजू मानेसारख्या दिग्गज तरुण दिग्दर्शकाने अनेक यशस्वी चित्रपट दिल्यानंतर हा महत्त्वाकांक्षी चित्रपट दिलेला आहे. या चित्रपटाला अवधून गुप्तेने संगीत दिले आहे. या चित्रपटातून भाऊ कदम हा प्रमुख भूमिकेत असणार आहे, तर कुशल बद्रिकेही या चित्रपटात असणार आहे. नुकताच त्याचा ट्रेलर बाहेर आल्यावर रसिकांनी आनंद व्यक्त केला होता. गेल्या चार दिवसांपासून या चित्रपटाची पोस्टर्स, बॅनरही सगळीकडे झळकताना दिसत आहेत. त्यामुळे १९७० च्या दशकात दादा कोंडकेंच्या पांडू हवालदारला जसा चांगला प्रतिसाद मिळाला होता, तसाच प्रतिसाद भाऊ कदमच्या पांडू हवालदारलाही मिळेल अशी अपेक्षा करायला हवी. कोविड-१९ च्या संकटात अनेक मराठी कलाकार अडचणीत आले होते. अनेकांचे करिअर बाद झाले, तर अनेक निर्मात्यांनी गुंतवलेला पैसा अडकून पडला. त्यामुळे कलाकारांना उत्तेजन देण्यासाठी सर्वांनी या सिनेमाला चला असे एकमेकांना सांगितले पाहिजे आणि एक कला जतन करण्याचे व्रत म्हणून चित्रपट पाहिला पाहिजे. भाऊ कदम आणि कुशल बद्रिके यांना आपण चला हवा येऊ द्यामध्ये नेहमी पाहतोच, पण रूपेरी पडद्यावर पांडू आणि महादूची ही जोडी कोविड-१९च्या काळात सर्वसामान्यांचे गमावलेले हसू मिळवण्यात यशस्वी ठरावी ही अपेक्षा आहे. विशेष रसिकांची लाडकी अप्सरा सोनाली कुलकणी ही या चित्रपटात भाऊ कदमबरोबर आहे, त्यामुळे या चित्रपटाला ग्लॅमर आणि यश मिळायला हरकत नाही.
मराठी चित्रपटांचे आकर्षण हिंदी निर्मात्यांना आता वाटू लागले आहे. गेल्या काही वर्षांत अनेक हिंदी आणि दाक्षिणात्य निर्माते मराठीमध्ये गुंतवणूक करत आहेत, याचे कारण मराठीतील विषय हे हटके असतात. वेगळे असतात, फक्त प्रेमकथांभोवती न फिरता ते मातीशी नाते सांगणारे असतात. प्रेक्षकांचा त्यांना प्रतिसादही चांगला मिळतो. म्हणूनच बॉलीवूडमधला यशस्वी निर्माता, दिग्दर्शक आणि शो मन सुभाष घई मराठी चित्रपटाची निर्मिती करत आहे. त्या चित्रपटाचे प्रदर्शन पुढील शुक्रवारी होणार आहे. यातही सुबोध भावे, पूजा सावंत, सुशांत शेलार असे दिग्गज कलाकार आहेत. सुभाष घईच्या मुक्ता आर्ट या बॅनरखाली येणारा विजेता हा चित्रपट म्हणूनच महत्त्वपूर्ण असणार आहे. त्याचे स्वागत करण्यासाठीही आपण सर्वांनी चला सिनेमाला म्हटले पाहिजे.
याशिवाय अनेक मराठी, हिंदी चित्रपट आज आणि पुढील आठवड्यात प्रदर्शित होत आहेत. यामध्ये गेल्या चार वर्षांत ऐतिहासिक चित्रपटातून मराठी इतिहास प्रेक्षकांपुढे यशस्वीपणे आणणारा निर्माता, दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरचा पावनखिंड हा चित्रपट येत आहे. छत्रपतींच्या इतिहासातील कथानके प्रेक्षकांना नेहमीच आवडतात. फर्जंदसारखे यशस्वी चित्रपट दिल्यानंतर पुन्हा इतिहासाची पाने धुंडाळत त्यांनी आणलेला हा नवा विषय प्रेक्षकांना आवडेल यात शंका नाही. दिग्पालचे चित्रपट हे भव्य-दिव्य आणि तांत्रिकदृष्याही मजबूत असल्याने प्रेक्षकांना भावतात. त्यामुळे बाजी प्रभू देशपांडेंच्या जीवनावर असणारा हा चित्रपट या वर्षाच्या शेवटी प्रदर्शित होत असला, तरी नव्या वर्षात पदार्पण करताना छत्रपतींचा विचार घेऊन जायला मिळणार याचा आनंद प्रत्येकाला मिळणार आहे. त्यामुळे आता कोरोनाच्या संकटावर मात करत मनाला आनंद देण्यासाठी, फ्रेश होण्यासाठी आणि चित्रपटसृष्टीला, कलाकारांना पुन्हा चांगले दिवस येण्यासाठी आपण म्हटले पाहिजे चला सिनेमाला. एखादा विकेंड त्यासाठी थिएटरकडे आपले पाय वळले पाहिजेत.
शुक्रवारी कोणता चित्रपट झळकतो याचे आकर्षण प्रेक्षकांना नेहमीच असते, पण हा आनंद गेल्या पावणेदोन वर्षांपासून आपल्यापासून हिरावला गेला होता. तो आनंद परत मिळवण्यासाठी आता सर्वांनी चला सिनेमाला.
– प्रफुल्ल फडके/ द स्क्रिन
9152448055\\