सायबर गुन्हे : एक अदृष्य चेहरा…

सायबर गुन्ह्यांच्या गुन्हेगारांचे चेहरे अदृष्य असतात. यामुळे गुन्ह्यांचा तपास लावणे हे अतिशय जिकिरीचे आणि चिकाटीचे काम असते. सायबर गुन्ह्यांमुळे ‘माणूस आयुष्यातून उठू शकतो’ इतके गंभीर स्वरूप या गुन्ह्यांचे असते. जनजागृतीशिवाय याला पर्याय नाही. आता आपण सायबर गुन्ह्यांचे काही प्रकार पाहू : १) के. वाय. सी. फ्रॉड : यात एसएमएसद्वारे लिंक पाठवली जाते. बँकेचे के. वाय. सी. अपडेट करायचे आहे असे सांगितले जाते. लिंकवर क्लिक केल्यावर डुप्लिकेट वेबसाइट उघडली जाऊन तुमचे सर्व बँक डिटेल्स घेतले जातात व त्यानंतर तुमच्या खात्यातून पैसे गायब होतात.
बँकांचे व्यवहार हे म्हणूनच अधिकृत वेबसाइटवर किंवा प्रत्यक्ष बँकेत जाऊन करणे हे आवश्यक असते. २) इन्शुरन्स फ्रॉड : रिटायर झालेल्या गृहस्थांना मेलवर उत्तम रिटायरमेंट पॅकेज आॅफर करण्यात आले. त्यांनी तीन वर्षे नियमितपणे पैसेही भरले. वेगवेगळ्या अकाऊंटवर पैसे भरण्यासाठी त्यांना सूचना मिळत गेल्या, तरीही त्यांना संशय आला नाही. दुर्दैवाने कोरोना काळात या गृहस्थांचे निधन झाले. पत्नीने इन्शुरन्सच्या रकमेची मागणी केल्यावर पॉलिसी क्लोजरच्या नावाखाली तिच्याकडून अजून पैसे उकळून ही गुन्हेगार मंडळी आॅनलाइन प्लॅटफॉर्मवरून गायब झाली. म्हणूनच आपल्या खात्रीच्या इन्शुरन्स एजंटकडून इन्शुरन्स पॉलिसी घेणे चांगले असते.

३) कस्टम गिफ्ट फ्रॉड : यात स्त्रियांना जास्त फसवले जाते. विशेष करून अविवाहित, एकट्या महिला. त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवरून त्या एकाकी आहेत याचा अंदाज घेतला जातो व आॅनलाइन मैत्रीचे जाळे फेकले जाते. थोडी मैत्री झाल्यावर ‘मी तुला एक गिफ्ट परदेशातून पाठवतोय’ म्हणून सांगितले जाते. स्त्री ‘नको-नको’ म्हणते पण सुखावते. मग तिला ‘कस्टम डिपार्टमेंट’च्या नावावर कॉल येतो. ‘कस्टम्स ड्युटी भरा’ या बाबीवर कित्येक लाख मागितले जातात. परदेशातला मित्र सांगतो, मीच गिफ्ट पाठवलेले आहे. तू ड्युटी आॅनलाइन भर. कुटुंबाच्या अपरोक्ष हे सगळे प्रकार केले असल्याने महिला हातोहात फसवलीही जाते आणि ती पोलिसांत तक्रारही करत नाही.
४) मॅट्रिमोनियल फ्रॉड : मॅट्रिमोनियल साइटवरून वय वाढलेल्या एकट्या महिलांना सावज केले जाते. अनपेक्षितपणे एखाद्या देखण्या परदेशी स्थळाकडून विचारणा झालेली स्त्री ही मोहरते. मग मेलवर किंवा फोनवर वैयक्तिक गप्पा व्हायला लागतात. या गुन्हेगारांच्या ‘लव्ह स्क्रिप्ट्स’ही तयारच असतात. ‘माझ्या दिवंगत काकांनी त्यांची संपत्ती माझ्या नावावर केली आहे, मी चेकने ते पैसे तुझ्या नावावर पाठवतोय’ असे ही व्यक्ती सांगते. स्त्रीला पुरेसे काही उमजायच्या आतच कस्टम्समधून कॉल येतो. ‘तुमचा चेक आला आहे. हे टेररिस्ट फंडिंग नाही म्हणून सर्टिफिकेट द्या, एवढे पैसे कुठून आले ते सांगा’, असे घाबरवून महिलेकडून पैसे उकळले जातात.

५) परचेस फ्रॉड : साड्या, दागिने, बॅग्स अत्यंत कमी किमतीत दाखवून खोट्या वेबसाइट बनविल्या जातात. नागरिक तिथे पैसे भरतात पण वस्तू घरी येत नाही. ६) लोन फ्रॉड : यात मोठमोठ्या फायनान्स कंपन्यांच्या नावाचा वापर केला जातो. अगदी माननीय पंतप्रधानांचा फोटो वापरून वेबसाइट तयार करून ‘पंतप्रधान कर्ज निधी’मधून कर्ज देण्याच्या जाहिरातीसुद्धा ही मंडळी करतात. कर्जाच्या रकमेच्या काही टक्के रक्कम तुमच्याकडून आधीच घेतली जाते आणि मंडळी गायब होतात.
६) सेक्सटोर्शन : तुमच्या सोशल मीडिया हालचालींवर लक्ष ठेवले जाते. पॉर्नसारख्या साइट्सवर तुमची हालचाल जाणवली, तर तुम्हाला ‘लाइव्ह सेक्शुअल व्हिडीओ कॉल’ केले जातात. ‘चॅट’ ही येतात. यात ‘डिप फेक टेक्नॉलॉजीचा’ वापर केला जातो. तुम्ही प्रतिसाद दिलात, तर तुमचाही लाइव्ह व्हिडीओ रेकॉर्ड होतो. पुढे धमक्या आणि ब्लॅकमेल यांचे सत्र सुरू होते आणि लाखो रुपये तुमच्याकडून उकळले जातात. हेच व्हिडीओ दुसºया गँग्सना दिले जातात. जे तुम्हाला ‘पोलीस’/‘सीबीआय’ या नावाने फोन करून परत पैसे उकळतात. ७) फेक फेसबुक प्रोफाईल : तुमच्याच फेसबुक प्रोफाईलवरील माहिती घेऊन दुसरे प्रोफाइल तयार केले जाते आणि त्यावरून तुमच्या मित्र-मंडळींना पैशांची मागणी केली जाते. तसेच सोशल मीडियावरील मुलींचे फोटो आणि व्हिडीओ मॉर्फ करून पॉर्नसाइटवर टाकणारी मोठी साखळीच आहे. कित्येक अजाण मुली अशा परिस्थितीत घाबरून आत्महत्येचा प्रयत्न करतात. आपले अकाऊंट वैयक्तिक ठेवणे आणि अनोळखी व्यक्तींना अकाऊंटमध्ये प्रवेश न देणे, हाच यावर उपाय आहे.

हे सगळेच खूप धक्कादायक व सुन्न करणारे आहे. या सगळ्या प्रकारात न घाबरता पालकांनी आणि पीडितांनी पुढे येऊन तक्रारी नोंदवणे गरजेचे आहे. प्रत्येक गुन्हेगाराची एक विशिष्ट मानसिकता असते. बहुतांशी गुन्हेगार अगदी तरुण वयातील मुले असतात, विशेषत: भारतात. या मुलांचे शालेय शिक्षणही पूर्ण झाले नसते. देशातील काही विशिष्ट गावे ही सायबर गुन्हेगारांची गावे आहेत. यातल्या प्रत्येक घरातल्या मुला-मुलींना सायबर गुन्ह्यासाठी वडीलधाºयांमार्फत प्रशिक्षित केले जाते.
इथल्या समाजात सायबर गुन्ह्यात सहभाग असलेल्या मुलाला लग्नाच्या बाजारात मोठा भाव असतो. मोठ्या परिश्रमाने गुन्ह्याचा शोध लावत पोलीस तिथे पोहोचलेच, तरी त्यावेळी हे संपूर्ण गावच रिकामे झाले असते. चेहरे नसलेल्या या गुन्हेगारांचा शोध म्हणूनच गवताच्या पेंढीतून सुई शोधण्यासारखा असतो. या अदृष्य नजरा सोशल मीडियावरील हालचाली घारीसारख्या टिपून आपले सावज शोधतात. यांना बळी पडणारा सगळ्यात मोठा असुरक्षित वर्ग म्हणजे ज्येष्ठ नागरिक, तरुण मुले-मुली आणि एकट्या स्त्रिया. म्हणून तुम्ही आता सावध राहा, सुरक्षित राहा.

े बाळासाहेब हांडे े/ ९५९४४४५२२२\\

About Editor

अवश्य वाचा

उखाणा

सवाष्णीने आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पारंपरिक शैली ही महाराष्ट्राची ओळख आहे. लग्नात किंवा सण-समारंभात …