सागरगोटे

खेळ हे माणसाला नेहमीच आनंद देणारे असतात. त्याचप्रमाणे जीवनाचे तत्वज्ञानही खेळ सांगत असतात. आपल्याकडे खूप पारंपारिक खेळ आहेत. संत ज्ञानेश्वरांनी सुरू केलेल्या सापशिडीच्या खेळाप्रमाणे अनेक खेळ हे जीवनाचे सार सांगणारे आहेत. आज क्रिकेट, फुटबॉलसारखे निवडक खेळ हे आंतरराष्ट्रीय होतात; पण ते खर्चिक असतात. त्यातून फक्त स्पर्धा आणि पैसा कमावणे हे शिकवले जाते. पण, साध्या साध्या खेळांमधून आपल्याला जीवनाचे तत्वज्ञान सांगितले जाते, ते खेळ खरे महत्त्वाचे असतात. अशाच काही खेळांची आपण माहिती दर रविवारी घेणार आहोत. यातील एक खेळ आहे तो सागरगोट्यांचा.

हा खेळ खेळण्यासाठी अनेक वस्तूंचा वापर होतो. सागरगोटे घेऊन हा खेळ खेळला जातो, गजगे घेऊन खेळता येतात, तर कोणी बिट्ट्या घेऊनही हा खेळ खेळतात. रामशास्त्री या जुन्या चित्रपटातील एक गीत आहे, दोन घडीचा डाव… याला जीवन ऐसे नाव. १९४४ सालच्या या चित्रपटात सागरगोट्यांचा खेळ खेळताना साºया जीवनाचे सार या गाण्यातून, या खेळातून सांगितले आहे.

या खेळात ९ खडे असतात. पखई, दुखई, तिखई, चोखई, पाचखई, सहाखई, सातखई, आठखईपर्यंत डाव असतात. पखईला एक खडा वर टाकायचा आणि तो खाली येण्याअगोदर खालचा खडा उचलायचा आणि वर उडवलेला झेलायचा. खडा न पडता सगळे खडे झेलले की, मग दुखई. एका वेळी दोन खडे उचलायचे. मग एकावेळी तीन खडे असे करत करत एकाच वेळी आठ खडे उचलेपर्यंत जायचे. मग हंडी करायची.

भरपूर वेळ सवंगड्यांसह खेळता येणारा माजघरातील, ओटीवरचा, ओसरीवरचा हा बैठा खेळ. दिसायला साधा दिसत असला, तरी हा खेळ बरंच काही शिकवून जातो. वरचा खडा खाली येण्याअगोदर खालचा उचलणे. खालचा उचलण्याच्या नादात वरचा पडू द्यायचा नाही. त्यासाठी एकाग्रता महत्त्वाची आहेच; पण कोणता खडा खाली ठेवायचा आणि कोणता उचलायचा हे आजच्या राजकारण्यांनाही जमणार नाही, इतके सहज तत्वज्ञान या खेळात आहे, म्हणजे आजचे राजकारणी नेते, कार्यकर्ते सहजपणे उचलतात आणि कोणाला खाली ठेवतात. तोच प्रकार असतो हा. हा खेळ सावरण्याचे आणि तोल सांभाळण्याचेही शिक्षण देत असतो. नजर हटी, दुर्घटना घटी अशी वाक्य आपण महामार्गावर पाहतो. ती वाहनचालकांसाठी असते; पण इथे जरा नजर हालली, तर वरचा खडा केव्हा खाली पडेल हे समजणार नाही. त्यामुळे लक्ष देण्याचे शिक्षण हाच खेळ देतो.

खेळाचा आणि व्यायामाचा जवळचा संबंध आहे; पण व्यायाम हा फक्त मैदानी खेळांनीच होतो किंवा त्यासाठीच तो आवश्यक असतो असा समज आहे. मैदानी खेळांपूर्वी धावणे, पळणे, उड्या मारणे असा सराव किंवा आजच्या भाषेत वर्कआऊट केले जाते; पण हे बैठे बिन पैशांचे बिन खर्चाचे खेळ असतात ते पण भरपूर व्यायाम करून घेतात. खडा उडवल्यावर तो खाली येण्यापूर्वी, त्याला झेलण्यापूर्वी बाकीच्यांना बरोबर घेण्याचे तंत्र सांभाळताना होणाºया हात, पाय आणि कमरेची हालचाल ही फार मोठी कसरत असते. शरीर आणि मन, शरीर आणि बुद्धीला हा व्यायाम होत असतो. कोणाला केव्हा उचलायचे, कोणाला कधी सोडायचे हा तडजोडीचा सल्ला देणारा हा खेळ आहे. जास्तीत जास्त डाव आपल्या हातात राहील ही जिंकण्याची ऊर्जा देणारा हा खेळ आहे. लवकर डाव निसटला हातातून तर आशावाद उत्पन्न करणारा आणि लवकरच आपला डाव येणार आहे, हे शिकवणारा हा खेळ आहे, म्हणजे अच्छे दिन आनेवाले हैं असे कोणी म्हटले आणि ते आले का नाही, हे समजले नाही तरी या खेळात मात्र आता माझा डाव येणार आहे हे स्वप्न नक्की खरे होत असते. समोरच्याचा डाव केव्हा ना केव्हा संपतोच आणि आपण त्याच्यापर्यंत पोहोचू शकतो. त्याच्यापर्यंत पोहोचण्याची नवी संधी मिळते, हे शिकवणारा हा खेळ आहे. इथे ना कसली घराणेशाही, ना कसला वारसा. तुम्ही खेळलात तरच तुम्ही पुढे जाऊ शकणार आहात. पुढे जाण्यासाठी तुम्हाला आकाशात कोणाला तरी पाठवायचे आहे. तो खाली येण्यापूर्वी खालच्या कोणाला तरी उचलायचे आहे. आकाशातला आणि जमिनीवरचा खडा दोघांना एकत्र आणणारे माध्यम तुम्हाला व्हायचे आहे. जमिनीवरचा खडा राक्षस आहे, तर आकाशात उडालेला आणि वरून खाली येणारा खडा देव आहे. दोघांची सांगड घालणारे आपण मनुष्य आहोत. कधी राक्षसांची साथ तर कधी देवाचा आशीर्वाद घेत हे जीवन घडवायचे आहे, हे शिकवणारा हा खेळ.

हातातून आकाशाच्या दिशेने जाणारा खडा म्हणजे देवाच्या दिशेने जाणारा साधक आहे. खाली येणारा खडा म्हणजे अध:पतनाची सुरुवात आहे. त्याला पडू न देणे ही जीवनाची दिशा आहे. असे काही शिकवणारे हे खेळ आपल्या जीवनाचे एक अंग आहे.

खेळ मांडियेला/ प्रफुल्ल फडके

9152448055\\

About Editor

अवश्य वाचा

उखाणा

सवाष्णीने आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पारंपरिक शैली ही महाराष्ट्राची ओळख आहे. लग्नात किंवा सण-समारंभात …