ठळक बातम्या

सभागृहातील चिंतन

मंगळवारी विधिमंडळात आमदारांच्या सभागृहातील वर्तनाबद्दल चर्चा झाली. ही अत्यंत महत्त्वाची होती. गेली काही अधिवेशने आपण गदारोळ आणि गैरवर्तनाच्या वातावरणात होताना पाहत आहोत. त्यामुळे नागरिक, मतदार कुठे तरी नाराज होते. त्यामुळे आपण लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी आहोत याचा विसर पडून सभागृहात नकला, हातवारे, विदुषकी चाळे, गैरवर्तन करणाºयांना थोडी समज आली असेल. पण, अशा प्रकारे झालेली चर्चा ही विधिमंडळाच्या इतिहासात नोंद घेण्यासारखी चर्चा आहे. सत्ताधारी आणि विरोधकांनी याला चांगले समर्थन दिले. प्रत्येकाने चांगले वागले पाहिजे, शिस्तीने वागले पाहिजे या भावना जर प्रत्येकाच्या असतील, तर त्या लोकशाहीच्या मंदिराचा खºया अर्थाने सन्मान राखला जाईल. तो राखला जात नाही याची जाणीव लोकप्रतिनिधींना झाली, हे फार महत्त्वाचे होते.
याला कारण घडले ते पण फार महत्त्वाचे होते. ते म्हणजे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसºया दिवसाच्या सुरुवातीलाही विरोधकांकडून पायºयांवर आंदोलन करत सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली होती. यावेळी आमदार नितेश राणेदेखील इतर भाजप आमदारांसोबत आंदोलनात सहभागी झाले होते. भाजप आमदारांकडून पायºयांवर बसून घोषणाबाजी केली जात असताना, शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे सभागृहात पोहचले. यावेळी नितेश राणे यांनी म्याव म्याव, असा आवाज देण्यास सुरुवात केली. त्यानंतर सत्ताधारी महाविकास आघाडीने यावरून नितेश राणे यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी केली होती.

नितेश राणेंनी केलेल्या कृत्यावरून याआधीही विधानसभेत चर्चा घेण्यात आली होती. त्यावेळी भाजप नेत्यांनीही हे बरोबर नसल्याचे म्हटले होते. सत्ताधाºयांसह विरोधकांनी आक्रमकपणे याबाबत विधिमंडळ आणि आवारामध्ये सदस्यांच्या वर्तणुकीबाबत आचारसंहिता असावी, अशी भूमिका घेतली. त्यानंतर अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभा उपाध्यक्षांच्या दालनात सभासदांचे वर्तन याबाबत बैठक घेण्यात आली. सभासद वर्तनाबाबत एक नियमावली प्रसिद्ध करण्यात आली आहे. यावरूनच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आपली भूमिका मांडली.
आचारसंहितेचे पालन करणे सभागृहाच्या प्रत्येक सदस्याचे कर्तव्य आहे. राज्यातला प्रत्येक जण विधिमंडळातल्या प्रत्येकाच्या वर्तनाकडे बारकाईने लक्ष ठेवून असतो. त्यामुळे प्रत्येकाने जबाबदारीने वागलं पाहिजे. या सभागृहामध्ये काही जण ग्रामीण भागात सहकार क्षेत्रामध्ये काम करून आलेले असतात, काही नगरपालिका, नगरपंचायत याचा अनुभव असलेले येतात, तर काही जण एकदम नवी कोरी पाटी असते, त्यांना कसलाही अनभुव नसतो. पक्षाचा पाठिंबा असतो म्हणून निवडून येतात. ही आजपर्यंतची परंपरा आहे. विधिमंडळाचा सदस्य विधिमंडळात आणि आवारात कसा वागतो, सार्वजनिक जीवनात तो कशा पद्धतीने वावरतो यातून केवळ त्या सदस्याचाच नाही, तर सभागृहाची आणि विधिमंडळाची प्रतिमा ठरते आणि याची जाणीव आपण सगळ्यांनी ठेवली पाहिजे, असे अजित पवार यांनी म्हटले. सर्व सदस्यांना त्यांनी ही जाणीव करून दिली, हे फार महत्त्वाचे होते.

अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत पुढाकार घेत ही चर्चा घडवली आणि त्याला विरोधकांनीही पाठिंबा दिला, हे चांगले झाले. अत्यंत नम्रमणे आणि आपल्या स्वभावाप्रमाणे स्पष्ट शब्दात अजित पवार बोलत होते. हे विधिमंडळातील गेल्या कित्येक वर्षांतील चांगले कामकाज म्हणावे लागेल. या सभागृहातल्या सदस्यांना माझी विनंती आहे, गेल्या काही वर्षांमध्ये आपल्यापैकी काही जणांच्या वर्तनामुळे सभागृहाच्या मान सन्मानाला नक्कीच धक्का बसला आहे. ही प्रतिमा आणखीन ढासळू नये. तिला उंचवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आपण सर्वांनी सभागृहातल्या विधिमंडळातल्या आवारात सार्वजनिक जीवनातल्या स्वत:च्या वर्तनाबद्दल अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे, असेही अजित पवार म्हणाले.
विशेष म्हणजे, आदर्श वर्तन आणि आचारसंहितेचे पालन होण्याबाबत सगळ्यांनी चिंता व्यक्त केली. पक्ष बाजूला ठेवून यावर चर्चा करण्यात आली. त्यासंदर्भात सर्व सदस्यांना जाणीव करून देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. ही समाधानाची बाब आहे. यावेळी अजित पवार मनमोकळेपणाने बोलले. ते महत्त्वाचे होते. एका गोष्टीची मला खंत आहे. माझी मते मी स्पष्टपणे मांडतो मी कधी त्यामध्ये पक्षीय राजकारण आणत नाही, पण संसदीय सभ्याचार आणि शिष्टाचार हे पुस्तक सर्वांनी वाचले पाहिजे. या सभागृहामध्ये निवडून येताना लाखो मतदार तुमच्याकडे बघून मतदान करतात. त्यातून तुम्ही या सभागृहाचे प्रतिनिधीत्व करता. कुत्री, मांजरे, कोंबड्यांचे आपण प्रतिनिधीत्व करत नाही याची जाणीव ठेवली पाहिजे, हे त्यांनी मांडलेले मतही महत्त्वाचे होते. विधिमंडळाच्या आवारात प्राण्यांचा आवाज काढणे हा सभागृह सदस्यांचा आणि मतदारांचा विश्वासघात केल्यासारखे आहे. आपला माणूस तिथे जाऊन असे आवाज काढतो, टवाळी करतो यावर मतदारांना काय वाटेल. त्यामुळे सर्वांनीच ही गोष्ट गांभीर्याने घेतली पाहिजे, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.

त्यानंतर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांचे समर्थन केले. सुधीर मुनगंटीवार यांनी अधिकारी आमदारांशी नीट वागत नाहीत, हा मुद्दा उचलला. त्यावरून भास्कर जाधव यांनी सुधीर मुनगंटीवार यांना समर्थन दिले आणि तो मुद्दा योग्य असल्याचे मांडताना आमदारांची अधिकारी, पोलीस, कलेक्टर कशाप्रकारे बेइज्जत करतात हे सांगितले. शासनातील नेते, सभागृहातील नेते जबाबदारीने वागतीलच, पण प्रशासनानेही आमची इज्जत राखावी हे सांगण्याची वेळ आली. याचे कारण लोकप्रतिनधी आदरास पात्र वर्तन ठेवत नाहीत, हेच त्यामागचे मूळ आहे. त्यामुळे हे सभागृहातील झालेले चिंतन, मंथन हे फार महत्त्वाचे होते, आवश्यक होते. ते केले आता त्याप्रमाणे सुधारणा होतील, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. किमान अर्थसंकल्पीय अधिवेशन तरी सभ्यपणे पार पडेल, अशी आशा करायला हरकत नाही. त्यावेळी तरी जनतेच्याच प्रश्नांवर चर्चा होईल, असा विश्वास आता बाळगायला हरकत नाही.
प्रफुल्ल फडके/बिटवीन द लाइन्स

9152448055\\

About Editor

अवश्य वाचा

शिक्षक भरती घोटाळा

इंग्रजी माध्यमाच्या शाळेत विद्यार्थ्यांचे प्रवेश वाढायला लागल्यानंतर पालकांनी मराठी व इतर भाषिक शाळांकडे पाठ फिरवली. …