गावाहून फोन आल्यापासून म्हणजे गेले दोन दिवस बर्वे आणि त्याची पत्नी अगदी अस्वस्थ झाले होते. कोणा अनोळखी व्यक्तीचा फोन नव्हता, कोकणातल्या घराहून फोन होता. गेले काही महिने आई आजारी होती. तेथे उपचार सुरू होते. त्यासाठी लागणाºया पैशांचीही तजवीज बर्वे करत होता. वेळ मिळेल, तेव्हा जाऊन विचारपूस करूनही येत होता. आईचा आजार बळावत नव्हता; पण पूर्ण बराही होत नव्हता. तेव्हा तेथील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही चाचण्या करून घेणे गरजेचे होते आणि त्यासाठी तिला मुंबईला घेऊन जा, असा सल्ला दिला होता. बर्वेच्या मोठा भावाची जागा तशी सोयीची आणि मोठी होती; पण तेथे आई जाणे शक्य नव्हते. त्या दोघांमध्ये का कोणास ठाकुक पण वितुष्ट आले होते. मुंबईला जाईन, तर अनंता कडेच राहीन असा तिचा हट्ट होता. अनंत बर्वे मोठ्या अनंत अडचणींना तोंड देत मीरा रोडच्या तिसºया मजल्यावरील वन रूम किचनमध्ये कुटुंबासह राहत होता. दोघांच्या नोकºया मुलांच्या शाळा, रोजचा उभयतांचा मुंबईतील रेल्वे, बस मोठे सव्य-अपसव्य करून कमावर जाण्या-येण्यासाठी करावा लागणारा जीवघेणा प्रवास, पिण्याच्या पाण्याचा तुटवडा, गॅस मिळण्याचा आटापिटा आणि मोलकरणींचा मनमानी व्यवहार या अनंत अडचणींवर मात करत बर्वे संसार रेटत होता. आता आईची कुटुंबात भर पडणार म्हटल्यावर ते दोघं अस्वस्थ झाले होते. आईचे येथे येणे एक धर्मसंकट वाटत होते. ती शक्य तो मुंबईत येऊच नये म्हणून काय करता येईल, यासाठी बर्वे विचारांची जुळवा जुळव करत होता.
तितक्यात त्याचा सहकारी मित्र म्हणला अरे आज जाताना गंगारामकडे पूजेला जायचंय, लक्षात आहे ना! गंगाराम, बर्वेच्या आॅफिसमधील जुना शिपाई. त्यांनी उपनगरातील एका झोपडपट्टीत चार-पाच वर्षांपूर्वी पैसे जमवून झोपडी घेतली होती, त्याच्यावर मजला चढवून त्यांनी आज पूजा योजली होती. चार मुले आणि नवरा बायको, असा त्याचा संसार होता. आॅफिसमधील दुसरा शिपाई बरोबर येणार होता आणि तो आला म्हणूनच बर्वे आणि त्याचे मित्र त्या झोपडपट्टीने वेढलेल्या दुमजली झोपडी जवळ, जेमतेम एक व्यक्ती कशी बशी जाऊ शकेल, अशा गल्ल्यांच्या जंजाळातून, जावून पोहचले. सगळं घर आणि गंगारामचे कुटुंबीय मोठ्या आनंदाने आल्या गेल्याचे स्वागत विचारपूस करत होते. त्याचा नातू तीर्थ प्रसाद देण्याची घाई गडबड करत होता. एवढ्याशा त्या घरात आनंद आणि उत्साह ओतप्रोत भरला होता. टोपी-उपरणे घातलेला गंगाराम आल्यागेल्यांना त्याचे ते एवढेसे घर वरखाली करत अभिमानाने दाखवत होता. बर्वे आणि मित्र त्याच्या मागोमाग चिंचोळ्या शिडीवरून झोपडीचा वरच्या भागात गेले. जेमतेम चार-पाच व्यक्ती उभी राहू शकतील एवढ्या जागेत एका बाजूला, एका टेबल फॅन समोर चिंचोळ्या बाकड्यावर एक ऐंशी-नव्वदीची असावी अशी वृद्ध स्त्री डोळ्यांवर आडवा हात टाकून झोपली होती. उभ्या उभ्या गंगाराम म्हणाला गो आये, माजे ह्पिस्चे सायेब लोक इले हत बग, त्या वृद्धेने ममतेने त्या मंडळीकडे पाहिले आणि गंगारामला म्हणाली, त्यांचा आदर-सत्कार व्येवस्तीत कर, वास्तुक आशीर्वाद लई मन्जे लैच मत्त्वाचे असतं. गंगाराम म्हणाला इतके दिवस एकटीच गावाला राहत होती. मी म्हटलं आता आपलं घर लय मोटो झालो हा, आता माज्या सांगाती रव. परवा रविवारी जावून गावातसून तिला घेऊन आलो. नायर हस्पित्लात माझा मेहुणा कामक हा. तिचा मोती बिंदूचा अप्रीषण पण आता करून घेतो. तिने हातानेच नको नको म्हटले, गंगाराम म्हणाला, घाबरता कित्याक, मोती बिंदूचा अप्रीषण धा मिनटात पार पडता. व्हय की नाय हो सायबाणु? बर्वे वगैरे सर्वांनी तिला धीर दिला आणि उभ्या-उभ्या नमस्कार केला आणि गेले तसेच शक्य तेवढे शरीर बारीक करत शिडीवरून खालच्या जागेत आले. तेथे मांडलेल्या सत्यनारायणाच्या पूजेसमोर बसून नमस्कार केला. येवढ्याशा जागेत त्यांनी चहा-पानाचीही व्यवस्था केली होती. सर्वांना तीर्थ प्रसाद त्याचा नातू हौसेने देत होता. गंगारामाने आम्हाला घरी नेण्यासाठी प्रसाद बांधून दिला.
तेवढ्यात त्याची बायको पुढे आली. बर्वेला म्हणाली तुम्ही सर्व इलात आमका आनंद झालो; पण तुमच्या माघारनिक का हाडला नायस,? तिका पण पुजेक आणुचा. बर्वे मनात म्हणाला खरंच मी माज्या कुटुंबाला इथे घेऊन यायला हवे होते, म्हणजे सर्वांना कळले असते, आपल्या वृद्ध माता-पित्यांची सेवा हे, गरिबीत टीचभर जागेत राहणारी माणसे काहीही गाजावाजा न करता आणि कसलीही कारणे न देता कशी करतात ते ह्याची देही ह्याची डोळा पाहता आले असते. बर्वेला वाटले या प्रसादाला आपण आणि आपले कुटुंब मात्र मुकलो आहोत. इतके मात्र निश्चित.
मोहन गद्रे/कांदिवली