राजकीय पक्षांचे अंतिम ध्येय ‘सत्ताकारण’ हेच असते. त्याला कुठलाही राजकीय पक्ष अपवाद नसतो. एखाद्या पक्षाला सत्तेत येण्यासाठी जेव्हा बहुमत प्राप्त झालेले नसते, तेव्हा सत्ताकारणासाठी तो पक्ष कोलांट्या उड्या मारत ‘तडजोडी’ करून सत्ता प्राप्त करतोय. याबाबत सगळेच राजकीय पक्ष एकामाळेची ‘मणी’ असतात, म्हणूनच एकाच पक्षाला दोष देण्यात काय हशील?
भारतीय जनता पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय गृहमंत्री, तसेच केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्राच्या दौºयाचा निरोप समारंभ करताना शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीला आव्हान देत आपला मनसुबा उघड केला. खरे म्हटले, तर हा त्यांचा दौरा तसा राजकीय नव्हताच. केंद्रीय सहकार मंत्री या नात्याने देशातल्या पहिल्या सहकार परिषदेला मार्गदर्शन करण्यासाठी ते महाराष्ट्रात आले होते.
त्या व्यासपीठावरून देशाचे सहकारमंत्री म्हणून त्यांनी केलेले भाष्य योग्यच होते. ते या भाषणात म्हणाले ते असे, ‘सहकार क्षेत्र पुढे नेण्याची गरज आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन सर्वांनी त्याचा विचार केला पाहिजे. राज्य सरकारांनीही त्याचे भान ठेवले पाहिजे. सहकार क्षेत्रात जो पक्षपात होत आहे, त्यात मी मूकदर्शक राहू शकत नाही. हा पक्षपात होऊ न देणे ही माझी जबाबदारी आहे. तेच सांगण्यासाठी मी आलो आहे. मी तोडायला नाही, जोडायला आलोय’ शहा यांचे हे मार्गदर्शन राजकारणाच्या पलीकडे होते याबाबत शंकाच नाही, परंतु राजकीय नेत्यांना आपल्या राजकीय विरोधकांवर टीका-टिप्पणी केल्याशिवाय, विरोधकांचे दोष उघडे पाडल्याशिवाय राजकीय समाधानच मिळत नसते.
त्यातच अमित शहा हे देशातील सत्ताधारी पक्षाचे प्रमुख नेते आणि महाराष्ट्रातील १०६ आमदार असलेल्या विरोधी पक्षाचे दिशादर्शक. त्यामुळे राजकीय भाष्य केल्याशिवाय शहा यांच्या महाराष्ट्र दौºयाची सांगता होणे तसे कठीणच होते, म्हणूनच मग भाजपच्या वतीने आयोजित केलेल्या बुथ प्रमुखांच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना शहा यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर आपली भूमिका मांडलीच. त्यात त्यांनी शिवसेना, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला.
शिवसेनेला लक्ष्य करताना शहा यांनी, शिवसेनेने सत्तेसाठी वचन मोडले. मुख्यमंत्री पदासाठी हिंदुत्व सोडले. सत्तेसाठी शिवसेनेने हिंदुत्वाशी तडजोड केली. सत्ता माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, असे शिवसेनेला वाटते असे आरोप करतानाच हिंमत असेल, तर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्या आणि तिन्ही पक्षांनी एकत्र लढून भाजपशी दोन हात करा, असे आव्हानच दिलेय. विरोधी पक्ष म्हणून शिवसेना व आघाडी सरकारवर केलेली शहा यांची टीका राजकीयदृष्ट्या योग्यच आहे, पण शिवसेनेने सत्तेसाठी ‘हिंदुत्व’ सोडून तडजोड केली, म्हणून त्यांना आरोपांच्या पिंजºयात उभे करून दोषी ठरवणे हा अमित शहा यांचा दावा ‘उलटा चोर कोतवाल को डांटे’ या सदरात मोडणारा ठरतो.
पहिली बाब म्हणजे १९९०च्या दशकातील भारताच्या राजकारणात राजकीय पक्षांची वैचारिक ओळख (आयडिओलॉजी) हे तत्वच इतिहास जमा झाले. केंद्राची अथवा राज्यांची सत्ता हस्तगत करण्यासाठी पक्षाची वैचारिक ओळख खुंटीला टांगून कुठल्याही पक्षांशी तडजोड करू शकणारा व्यवहारवादी व सत्ताभोगी असा ‘नवसत्तावाद’ तयार झाला. याचा पाया राष्ट्रीय पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षानेच १९९८ साली घातला, त्यावेळी वाजपेयींच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या विचारधारेचे २४ पक्ष एकत्रित येऊन सत्ता मिळवते झाले होते, तेव्हा भाजपने आपला ‘हिंदुत्ववाद’ कुठल्या खुंटीला टांगून ठेवला होता?, तीच परंपरा पुढे काँग्रेस पक्षाने सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली अनेक पक्षांची मोट बांधून दहा वर्षे चालवली व सत्ता भोगली. त्यावेळी काँग्रेस पक्षाची विचारधारा कुठल्या वैचारिक पिझ्झा आणि पास्ता खाण्यात गुंतली होती? या दोन्ही राष्ट्रीय पक्षांनी सत्ताकारणासाठी आपल्या पक्षाच्या विचारधारा गहाण ठेवून सत्तेचे लोणी चाखले, तर तो आदर्शवाद आणि शिवसेनेसारख्या प्रादेशिक पक्षाने सत्तेचे गणित जुळवले, तर ती हिंदुत्वाशी तडजोड?, हे कसे काय?
राष्ट्रीय पक्ष असोत वा प्रादेशिक पक्ष सत्ता हस्तगत करण्यासाठी कुठेही आणि कुणाबरोबरही श्वानासारखी तंगडी वर करण्यात पटाईत असताना, एकाच पक्षाला दोषी ठरवणे कितपत योग्य? ते सुद्धा भाजपसारख्या पक्षाने. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली २०१४ नंतर भाजपचा सुवर्ण काळ सुरू झाला. अशा काळातही अधाशासारखी सत्ता हस्तगत करण्यासाठी भाजपने हिंदुत्वाशी तडजोड करूनच अनेक राज्यांत षड्यंत्रे रचली त्याचे काय?, जम्मू-काश्मीरची सत्ता मिळविण्यासाठी हिंदुत्वद्रोही व पाकिस्तानप्रेमी पीडीपीच्या मुफ्ती सईद यांच्याशी याराना केला होता, तेव्हा ती हिंदुत्वाशी केलेली तडजोडच होती ना? बिहारच्या नितीश कुमारांनी भाजप, मोदी आणि हिंदुत्वाची लक्तरे काढली होती. तरीसुद्धा सत्तेसाठी भाजप त्यांच्यासोबत राहिली व आहे. तेथे हिंदुत्वाचे काय झाले?
कर्नाटक आणि मध्य प्रदेशात तेथील जनतेने काँग्रेस विचारधारेला मतदान करून सत्ता आणली होती, पण भाजपने ती पाडली हे तर ‘तडजोडी’पेक्षा भयानक राजकीय षड्यंत्र होते. गोवा आणि मणिपूर राज्यात भाजपला नाकारलेले असताना, काँग्रेसचे आमदार फोडून सत्ता मिळवली. हे सर्व हिंदुत्ववादी होते काय?, गेल्या सात वर्षांत राज्याराज्यातील सत्ता मिळविण्यासाठी भाजपने काय-काय केलेय, ते एकदा आरशात पहावे आणि मग दुसºया पक्षांवर सत्तेसाठी केलेल्या तडजोडीवर भाष्य करावे. शिवसेनेने सत्तेसाठी तडजोड केली हे शंभर टक्के सत्यच आहे, पण देशाला कुठला पक्ष सत्तेसाठी तडजोड करत नाही, हे शहा यांनीच देशवासीयांना सांगावे.
vijay Samant