संविधान दिन रोजच असावा

२६ नोव्हेंबर हा स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एक विशेष दिवस आहे. या दिवशी देशभरात ‘संविधान दिन’ मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी भारताने औपचारिकपणे संविधान स्वीकारले. हे संविधान २६ जानेवारी, १९५० रोजी लागू झाले. हा दिवस राष्ट्रीय कायदा दिन म्हणून पण ओळखला जातो. भारत सरकारने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १२५वी जयंती वर्ष साजरे केले जात असताना, त्यांना एक प्रकारची श्रद्धांजली वाहण्यासाठी २६ नोव्हेंबर, २०१५ रोजी पहिला अधिकृत संविधान दिन साजरा केला.

संविधानाबाबत जनजगृती करण्यासाठी आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने देशभरात २६ नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने २४ नोव्हेंबर, २००८ ला आदेश काढून ‘२६ नोव्हेंबर’ हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले होते. आपल्या देशाच्या संविधानाच्या निर्मितीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सर्वात महत्त्वाचा वाटा होता. त्यामुळे त्यांना आदरांजली वाहण्याचे प्रतीक म्हणून संविधान दिन साजरा केला जातो.
भारताचं संविधान हे जगातील सर्वात मोठं आणि सर्वात विस्तृत संविधान आहे. यामध्ये २५ भाग, ४४८ अनुच्छेद आणि १२ परिशिष्ट आहेत. मूळ संविधानात ३९५ आर्टिकल्स आणि ९ परिशिष्ट होते. भारतीय संविधानाचं सर्वात मोठं सौंदर्य म्हणजे हे तयार करताना सांस्कृतिक, धार्मिक आणि भौगोलिक विविधता ध्यानात घेतली होती. आपल्या संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला स्वतंत्र भारतात राहण्याचा समान अधिकार दिला आहे.

पाश्चिमात्य संस्कृतीच्या युगात देशातील तरुणांमध्ये संविधानाची मूल्ये रुजवणे हा संविधान दिन साजरा करण्यामागचा एकमेव उद्देश आहे. संविधानाने नागरिकांना काही मूलभूत स्वातंत्र दिले. विचार, अभिव्यक्ती, संचार, धार्मिक आचार अशा अनेक विषयांमध्ये स्वातंत्र्य प्राप्त झाल्याने नागरिकांना आपला विकास साधण्याची संधी निर्माण झाली, परंतु स्वातंत्र्याचा स्वैराचार झाल्याचे दिसून येत आहे. सोशल मीडियातून इतरांना खालच्या पातळीवर येऊन ट्रोल करणे, चिमुकल्या बाळांपासून ते वयोवृद्ध महिलांपर्यंत कोणालाही आपल्या विकृत वासनेची शिकार करणे, रस्त्याने चाललेल्या मुली व महिलांची छेडछाड करणे, रस्त्यात थुंकणे, धुम्रपान करणे, कचरा टाकणे, रूळ ओलांडणे, वाहतुकीचे नियम धुडकावणे, वाटेल तिथे गाड्या पार्क करणे, भर रस्त्यात टिंगल टवाळी करणे याला स्वातंत्र्याचा गैरवापर म्हणायचं नाही तर काय?
आपल्याबरोबर शेतकरी, उपेक्षित आणि आर्थिक दुर्बल घटकांना जगण्याचे पण स्वातंत्र्य आहे. हेच कदाचित आपण सारे विसरत चाललो आहोत. साने गुरूजींनी त्यावेळी लिहिले होते की, ‘स्वातंत्र्य म्हणजे संधी, स्वातंत्र्य म्हणजे सर्वांच्या विकासाला संधी, स्वातंत्र्य म्हणजे संयम, स्वातंत्र्य म्हणजे उच्छृंखलपणा नव्हे. स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी. आपण एकमेकांच्या भावना ओळखायला शिकले पाहिजे. खरंच साने गुरूजींचे विचार आजच्या पिढीने अंमलात आणून देशाचा उत्कर्ष करण्यासाठी वाटचाल करायला हवी’. फक्त २६ नोव्हेंबर या दिवशीच संविधान दिवस साजरा न करता रोजच्या जीवनात पदोपदी त्याचे आचरण करणे आता आवश्यक झाले आहे.

-े बाळासाहेब हांडे/९५९४४४५२२२\\

About Editor

अवश्य वाचा

उखाणा

सवाष्णीने आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पारंपरिक शैली ही महाराष्ट्राची ओळख आहे. लग्नात किंवा सण-समारंभात …