संगीत नाटकाला प्रोत्साहन देणारी संस्था ‘कल्याण गायन समाज’

संगीत नाटक ही मराठी नाट्य इतिहासातील एक मर्म बंधातली ठेव आहे. किंबहुना कित्येक वर्षे मराठी नाटक म्हणजे संगीत नाटकच, असे ढोबळ समीकरण अनेकांनी मनाशी गृहीत धरले होते. आज सौभद्र, स्वयंवर या संगीत नाटकांचे स्वागत होत असले, तरी प्रत्यक्षात त्या प्रकारचे संगीत नाटक निर्माण होत नाही. काहींनी त्या पद्धतीने संगीत नाटक लिहिण्याचा प्रयत्न केला, पण संगीत नाटकांची ही परंपरा खंडित होऊ नये, गेल्या कित्येक वर्षात नवीन संगीत नाटके निर्माण झाली नाहीत ही उणिव दूर करण्यासाठी कल्याण गायन समाज या संस्थेने संगीत नाटक संहिता लेखन स्पर्धा घेतली आणि नाटककारांना लिहिण्यास प्रवृत्त केले. हे फार मोठे योगदान संगीत रंगभूमीसाठी कल्याण गायन समाज या संस्थेचे असणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणात या लेखन स्पर्धेला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे ही संस्था अभिनंदनास पात्र ठरते. जवळपास तीस ते पस्तीस संहिता संस्थेकडे आल्या. त्यातील तीन नाटके जरी रंगभूमीवर आली, तरी नव्याने संगीत रंगभूमी उभारी घेईल, त्याचे श्रेय कल्याण गायन समाज या संस्थेला जाते.
आज संगीत नाटकांचे प्रयोग होत नाहीत असे नाही, पण जुनीच नाटके केली जातात. म्हणजे गेल्या ५० वर्षांत नवीन संगीत नाटके लिहिली गेली नाहीत. आजही एकच प्याला, कट्यार काळजात घुसली, संशयकल्लोळ या नाटकांना प्रतिसाद मिळतो, त्याचे प्रयोग होतात. पण याचा अर्थ नवीन संगीत नाटके निर्माण होऊच नये काय? त्यामुळे लेखकांना संगीत नाटक लिहिण्यास प्रवृत्त करण्याचा कल्याण गायन समाज या संस्थेचा उपक्रम हा रंगभूमीच्या इतिहासात एक अध्याय ठरेल.

विसाव्या शतकात देवल, किर्लोस्कर, गडकरी आदींच्या संगीत नाटकांबरोबरच उत्तरार्धात विद्याधर गोखले यांची नाटके गाजली. ती म्हणजे पंडितराज जगन्नाथ, मंदारमाला, स्वरसम्राज्ञी इत्यादी. संस्कृतातील भाण या प्रकाराच्या आधाराने बावनखणी हे संगीतमय नाटक त्यांनी लिहिले. रणजीत देसाई यांची हे बंध रेशमाचे, तानसेन; गोपालकृष्ण भोवे यांचे धन्य ते गायनी कळा, पुरुषोत्तम दारव्हेकर यांचे कट्यार काळजात घुसली ही सारी नाटके म्हणजे जुन्या संगीत नाटकांचे पुनरुज्जीवनच होते. वास्तविक दारव्हेकरांनी वहाºडी माणसे, चंद्र नभीचा ढळला, नयन तुझे जादूगार अशी वेगवेगळ्या विषयांवरची, वेगळ्या पद्धतीची नाटके लिहिली; परंतु त्यांना कट्यार काळजात… ने सर्वाधिक मान्यता दिली. त्यातही त्यातल्या संगीतामुळे! वि. वा. शिरवाडकरांनी ययाति आणि देवयानी सारखे एक चांगले संगीत नाटक लिहिले. तेही बरेचसे परंपरेशी नाते सांगणारेच आहे, पण त्यानंतर ही परंपरा ठप्प झाली होती. त्या परंपरेला संजीवनी देण्याचे काम कल्याण गायन समाज या संस्थेने केलेले आहे.
वसंत कानेटकरांनी मत्स्यगंधा आणि लेकुरे उदंड जाली ही दोन संगीत नाटके लिहून एक वेगळीच दिशा स्वीकारली. मत्स्यगंधा नाटकाची दर्शनी रचना पारंपारिक संगीत नाटकासारखी भासली तरी एक फरक असा आहे की, त्यात नाट्यपदांपेक्षा काव्याचा वापर अधिक आहे. तो वापर मान्यही झाला. लेकुरे उदंड जालीच्या निमित्ताने गद्यप्राय संवादांना एका लयकारीचे स्वरूप प्राप्त झाले. पाश्चात्य संगीताच्या धर्तीवर ध्वनिमुद्रित संगीत मराठी नाटकात आले. पु. ल. देशपांडे यांनी लिहिलेल्या तीन पैशांचा तमाशाच्या निमित्ताने पाश्चात्य संगीताचा वापर झाला. विजय तेंडुलकरांचे घाशीराम कोतवाल आणि पुरुषोत्तम बेर्डे यांचे अल्वारा डाकू या दोन नाटकांतील लोकसंगीताच्या वापराने नाटकांतील संगीत संकल्पनेला एक वेगळे परिमाण लाभले. विषय, आशय, व्यक्तिरेखा यांच्याशी एकजीव झालेली संगीत रचना मराठी नाटकात एकंदरीत कमीच आहे. अनेक नाटकांतील पदे स्वतंत्ररित्या लोकप्रिय ठरली आहेत. त्याची कारणेही भिन्न आहेत.

परंतु नाट्य रचनेचा एक अपरिहार्य असा भाग म्हणून आलेले संगीत ही संकल्पना अलीकडच्या काळात प्रत्यक्षात आली. त्यामुळेच घाशीराम कोतवाल, अल्वारा डाकू यांचे महत्त्व विशेष आहे. या नाटकांतील संगीताने मूळ विषय-आशयाला धक्का न पोहोचवता नाटकाचे मूळचे सौंदर्य वाढवले आहे. लोकसंगीताचा वापर हा त्यांचा मुख्य आधार आहे. त्यामुळे खºया अर्थाने संगीत नाटक या निमित्ताने निर्माण झाले. फरक करून सांगावयाचा झाला, तर पूर्वीच्या संगीत नाटकांबाबत असे म्हणता येईल की, त्या नाटकांत संगीत जरूर होते; पण काही वेळा नाट्य रचना एकाची व पद रचना अन्य कोणाची असेही घडले होते. त्यातले नाटक आणि संगीत अलग काढणे शक्य होते. घाशीराम… च्या निमित्ताने भास्कर चंदावरकरांनी वेगळे संगीत देऊन नाट्य संगीतविषयक कल्पनाच बदलली.
असे प्रयोग होत राहिले असले, तरी खºया अर्थाने संगीत नाटकांची संहिता निर्माण करण्याचे काम मात्र ठप्प झाले होते. त्याला दिली गेलेली चालना हे २०२१ या वर्षाचे फार मोठे यश आहे. बहुसंख्य संगीत नाटके ही स्वातंत्र्यपूर्व काळात, युद्धजन्य परिस्थितीत निर्माण झाली. त्यातून कुठेतरी बंडखोरीही होती. पण कोरोनाच्या युद्धजन्य परिस्थितीचा लेखकांकडून योग्य वापर करण्याचे तंत्र कल्याण गायन समाजने जे अवलंबले ते फार महत्त्वाचे आहे.

– प्रफुल्ल फडके/ तिसरी घंटा
9152448055\\

About Editor

अवश्य वाचा

उखाणा

सवाष्णीने आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पारंपरिक शैली ही महाराष्ट्राची ओळख आहे. लग्नात किंवा सण-समारंभात …