ज्ञानाचं अमृत दिलं,
प्रेमाचं खतपाणी घातलं,
मायेची ऊब दिली,
चुकांची शिक्षा केली,
यशाबद्दल शाबासकी दिली,
आणि संस्कारांचे विविध पैलू पाडले!
जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये स्वत:ला घडवण्यात तीन गोष्टींचा मुख्य वाटा असतो. एक म्हणजे आई-वडील, दुसरे म्हणजे आपला भवतालचा परिसर आणि तिसरा महत्त्वाचा म्हणजे आपली शाळा.
खरंतर, प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये शाळा ही खूप मोठी भूमिका बजावत असते. परमेश्वराने लिहिलेले जगाचे भले मोठे पुस्तक कसे वाचायचे ते या शाळेच्या कुंपणामध्येच आल्यावर समजते. गणित सोडविता, सोडविता जीवनाचे गणित मांडायला सुद्धा हीच शाळा शिकवत असते. थोडक्यात शाळा, म्हणजे गुरुजनांचे आचरण आणि नीतिमूल्यांचे चालते बोलते हरिपाठ असते.
या शाळेच्या विद्या मंदिरी आलेला प्रत्येक विद्यार्थी हा घडत असतो, उमलत असतो आणि सुसंस्कृत सुद्धा होत असतो.
बालविश्वातील प्रत्येक लहान लेकराच्या वादळांची, आनंदी व दु:खाच्या क्षणांची साक्षीदार सुद्धा ही शाळाच असते.
पण जवळपास दीड-पावणेदोन वर्षांपासून अचानकपणे उद्भवलेल्या कोरोनासारख्या विश्वातील महाभयंकर आजाराने या प्राथमिक शाळेची घंटाच वाजली नव्हती. या शाळेतील मुले या शाळेतील दैनंदिन आनंदावनापासून हळूहळू दुरावत चालली होती. केवळ घर, अंगण, टीव्ही, मोबाइल, कॉलनी, जवळचे नातेवाईक, या सर्वांचाच अगदी या मुलांना फारच कंटाळा आला होता. केवळ सुट्ट्या आणि सुट्ट्याच या मुलांना मिळत होत्या.
शाळा बंद असल्याने वह्या-पुस्तके, वर्गातील मित्र-मैत्रिणी, त्यांच्याशी मनसोक्त होणाºया दिलखुलास गप्पा, शाळेचे विस्तीर्ण मैदान, त्या मैदानावरील घसरगुंड्या, लोखंडी झुले आणि इतर त्यासारखी खेळण्याची अनेक साधने, साहित्य नसल्यामुळे आॅनलाइन वर्गात मुलांचे फारसे मनही रमत नव्हते. प्रत्यक्ष शालेय शिक्षण आणि सदरील अॅप्लिकेशन्सद्वारे मीटिंग कॉल करून भरवलेले वर्ग यात या विद्यार्थ्यांना मोठे अंतर भासत होते.
प्रत्यक्ष शाळेची सर या आॅनलाइन वर्गांना येत नव्हती. प्रचंड प्रमाणात मिळालेली सुट्टी आता नकोशी होऊन शाळेची तीव्र आठवण या बच्चे कंपनीला येत होती.
(खरंतर, सुट्ट्या या विद्यार्थी दशेत असणाºया प्रत्येकालाच हव्या असतात,पण संस्कृतमध्ये ‘मर्यादम् विराजते’ म्हटले आहे ते उगाच नव्हे.)
त्यामुळे कोरोना परिस्थितीचे कमी झालेले वातावरण पाहून १ डिसेंबर २०२१ पासून इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय नुकताच राज्य-शासनाने घेतल्यामुळे समस्त विद्यार्थी, पालक व शिक्षक-वर्गांमध्ये आनंदाचा, उत्साहाचा उत्सव बघायला मिळत आहे.
कोरोना आपत्तीनंतर प्रदीर्घ काळाने म्हणजेच जवळपास दीड ते दोन वर्षांनंतर प्राथमिक शाळा विशेषत: पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा सुरू होत असल्याच्या या वार्तेने गेल्या कित्येक दिवसांपासून घरात एकाकी पडलेल्या विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाल्याचे सर्वत्र दिसत आहे. कारण शाळा म्हणजे केवळ शिक्षणच नव्हे, तर शालेय शिक्षणाबरोबरच शरीराची, मनाची जडण-घडण शाळेच्या मदतीने होणे हे ही तितकेच महत्त्वाचे असते.
शाळांची मैदाने ही देखील तितकीच विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकास घडवणारी महत्त्वाची केंद्र असतात. मैदानी खेळाबरोबरच विद्यार्थ्यांना दैनंदिन परिपाठातून नीतिमूल्ये व संस्काराचे धडे विद्यार्थीदशेत या कोवळ्या वयात शाळेतच दिले जातात. त्यामुळे विद्यार्थी हा आचारसंपन्न घडतो आणि त्यातूनच पुढे चालून तो विद्यार्थी चांगले-वाईट, भलं-बुरं,
हित-अहीत यातील भेद समजून सत्याच्या वाटेवर चालण्याचा प्रयत्न करतो, म्हणूनच विद्यार्थी हा शाळेत शिकण्यासाठी कधीच जात नसतो, तर तो शालेय अभ्यासक्रमाबरोबरच प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अनेक महत्त्वाच्या, हिताच्या गोष्टी आत्मसात करत असतो.
एकेकाळी ही शाळा म्हणजे मुलांना डांबून ठेवणारे भलेमोठे कोंडवाडे होते. कोमल बालमनाला भीती, धाक, शिक्षा या गोष्टी शिस्तीच्या नावाखाली सर्रासपणे शाळेत केल्या जात होत्या. शिक्षक म्हणतील त्या पूर्वदिशा होत होत्या. मुलांनी गप्प बसणे, प्रश्न न विचारणे, समजले असो किंवा नाही. घोकंपट्टी करून पुस्तकातील उत्तरे जशीच्या तशी लिहिता येणे आणि त्यासाठी गुणांची कमाई करून हुशार ठरवणे अशीच त्या काळची परिस्थिती होती. शाळा नावाच्या बंदिस्त चौकटीमध्ये सब घोडे बारा टक्के अशा सरधोपट पद्धतीने मुलांना शिकवले जात होते. मुलांचा कल, आवड, कुवत लक्षात घेऊन घडवणारे शिक्षक त्या काळीही फार मोठ्या संख्येने नव्हते. मग अशाच पारंपारिक शाळांतून विद्यार्थ्यांची होणारी घुसमट लक्षात घेऊन, काळानुसार बदलणाºया राजकीय, सामाजिक, आर्थिक गरजांच्या अनुषंगाने शिक्षणात अखंडपणे बदल होत गेले.प्रयोग, संशोधन आणि बदलत्या काळाचे भान ठेवून नवीन कल्पना प्रत्यक्षात येत गेल्या. कृतिशील शिक्षणावर भर दिला गेला. मुलांना झेपेल, पेलवेल आणि शिक्षकांना शिकविता येईल, असा अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके बनवली गेली. मग अशा विविध बाबींमुळे मुलांमधील उपजत विविध प्रेरणा, सुप्त कलागुण, सर्जनशीलता यांना शाळेतूनच वाव मिळू लागला आणि एक चांगला विद्यार्थी जगाबाहेर पडू लागला.
एकप्रकारे शाळा ही बाहेरच्या समाजाची छोटी प्रतिकृती असते असे म्हटले, तरी वावगे ठरणार नाही. कारण, भिन्न स्वभाव वैशिष्ट्यांच्या सवंगड्यांबरोबर मैत्री करणे, दंगामस्ती खोड्या करतानाच सहजीवनाचे संस्कार मुलांसाठी शाळाच सज्ज करीत असते. मातीच्या ओबडधोबड गोळ्याला शाळेचा परीसस्पर्श झाल्यावरच सोन्याचा आकार प्राप्त होत असतो. यशवंताच्या आईचा महान मंगलत्वाचा साक्षात्कार याच शाळेतून घडविला जातो, तर स्वातंत्र्यवीरांचे स्वतंत्रतेचे स्तोत्रही ही याच शाळेत शिकवले जाते. भूगोलातील जगातील अनेक आश्चर्यांची तोंड ओळख याच शाळेच्या मदतीने होते, तर सुसंस्कृत सुभाषितांची विचारांची समृद्धता सुद्धा याच शाळेतून प्रदान होते.
येथील गुरुजन त्यांच्या कृपेने अक्षराबरोबर मनालाही वळण लावतात. शब्द भांडाराने समृद्ध करतात. अवांतर वाचनाची आवड निर्माण करतात.पाठांतराची सवय लावतात. ज्ञान आणि व्यवहाराची सांगड कशी घालायची तेसुद्धा शिकवतात.
शेवटी एखादा कुंभार जशी मडकी घडवतो, तसे या शाळेने आणि या शाळेतील शिक्षकांनी आपल्या सर्वांना घडवले आहे.
भावी आयुष्याची बीजे इथेच रुजली आहेत. इथेच दृढ झाली आहेत.
– आकाश दीपक महालपुरे/75883997772\\