ठळक बातम्या

शाळांमधून एकात्मिक व द्वैभाषिक धोरण

विद्यार्थ्यांच्या पाठीवरील पाठ्यपुस्तकांचे ओझे कमी करण्यासाठी मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी एकात्मिक पाठ्यपुस्तक योजना प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणार आहे.
शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवर असणारे दप्तराचे ओझे कमी करण्याबाबत अनेक उपाययोजना करण्यात आल्या, परंतु अनेक शाळांमधील दप्तराचे ओझे काही कमी झाले नाही. त्यामुळे या शैक्षणिक वर्षापासून एकात्मिक पाठ्यपुस्तक योजना व द्विभाषिक पाठ्यपुस्तके योजना प्रायोगिक तत्त्वावर राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये मराठवाड्यातील संपूर्ण जालना जिल्ह्यासह प्रत्येक जिल्ह्यांतील एक तालुका निश्चित करण्यात आला आहे.
योजनेमुळे विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणे एकत्रित सर्व पुस्तके शाळेत नेण्याची गरज नाही. त्यासाठी सर्व पुस्तकांचे मिळून एकच पुस्तक असणार आहे. मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठीच ही योजना असून, त्यासाठी पाठ्यपुस्तके बालभारती भांडारगृहांमध्ये आली आहेत, परंतु कोरोनामुळे योजनेची अंमलबजावणी कधीपासून होणार की नाही, याबाबत संभ्रम होता. संबंधित तालुकास्तरावरील शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांना पुस्तके आली, परंतु त्याची अंमलबजावणी कशी करायची, शिक्षण पद्धतीत काही बदल आहेत का?, शाळांमधील शिक्षकांचे योजनेनुसार अध्यापन कसे असेल?, त्यात काही बदल करायचे आहेत का, याबाबत कोणतीच स्पष्टता नसल्याने अजूनही काही बाबतीत संभ्रम आहे. पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तके एकत्रीकरण करून त्याची तीन भागांत पुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
यामध्ये इयत्ता पहिली व दुसरीसाठी बालभारती, माय इंग्लिश बुक, गणित यांसह खेळू, करू, शिकू ही चार पुस्तके एकाच पुस्तकात समाविष्ट केली आहेत. इयत्ता तिसरीसाठी बालभारती, माय इंग्लिश बुक, गणित, परिसर अभ्यास ही पुस्तके एकत्र आहेत. चौथीसाठी बालभारती, माय इंग्लिश बुक, गणित, परिसर अभ्यास, तर पाचवीसाठी बालभारती, माय इंग्लिश बुक, गणित, परिसर अभ्यास, हिंदी सुलभभारती ही सर्व पुस्तके एकात्मिक पुस्तकात असतील.
सहावी, सातवीमध्ये बालभारती, माय इंग्लिश बुक, गणित, इतिहास, भूगोल, सामान्य विज्ञान, हिंदी सुलभारती विषय एकात्मिक पुस्तकात समाविष्ट करण्यात आले आहेत. भविष्यात राज्यातील विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेची अडचण येऊ नये, इंग्रजीतील संकल्पना, संज्ञा अधिक स्पष्ट व्हाव्यात यासाठी राज्यातील ४८८ आदर्श शाळांमधून द्विभाषिक भाषा धोरण राबविण्यात येणार आहे. मराठीच्या जोडीला समानार्थी आणि सोप्या इंग्रजी शब्द आणि वाक्यांचा वापर करता यावा या दृष्टीने पुस्तकांची रचना करण्यात येणार आहे.
यंदाच्या वर्षापासून इयत्ता पहिली व पुढील वर्षीपासून इयत्ता दुसरीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ही अंमलबजावणी करण्यात येणार आहे, अशी नुकतीच घोषणा शालेय शिक्षणमंत्री ना. वर्षा गायकवाड यांनी केली आहे. ही योजना प्रायोगिक तत्त्वावर सुरू असल्याने सर्व राज्यात कधीपासून लागू होईल व याचे परिणाम काय येतील यावरून नवीन शैक्षणिक धोरणास दिशा मिळेल हे मात्र निश्चित!
े बाळासाहेब हांडे े/ ९५९४४४५२२२\

About Editor

अवश्य वाचा

शिक्षक भरती घोटाळा

इंग्रजी माध्यमाच्या शाळेत विद्यार्थ्यांचे प्रवेश वाढायला लागल्यानंतर पालकांनी मराठी व इतर भाषिक शाळांकडे पाठ फिरवली. …

One comment