महाराष्ट्र राज्याची अंदाजित लोकसंख्या १२ कोटी इतकी असून, त्यापैकी ज्येष्ठ नागरिकांची अंदाजित संख्या एक कोटी एवढी आहे. आधुनिक उपचार पद्धती, वैद्यकीय सुविधा, राहणीमान, सकस आहार व आरोग्याविषयी जागृती निर्माण झाल्यामुळे त्यांच्या आयुर्मानात वाढ होत आहे. ज्येष्ठ नागरिक याचा अर्थ ६० वर्ष पूर्ण केलेला कोणताही पुरुष अथवा स्त्री असा होतो, परंतु सर्वच ज्येष्ठ नागरिक नशीबवान नसतात.
समाजामध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढल्याने व रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्यामुळे काही तरुण परदेशातही स्थलांतरित होत आहेत. स्थलांतराच्या वाढत्या प्रमाणाबरोबरच विभक्त कुटुंब पद्धती रूढ होत आहे. छोटे कुटुंब राहण्यासाठी छोटी जागा, इत्यादी कारणामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांमध्ये वाढ होत आहे. आर्थिक दुर्बलता, कमी वेतन, वाढती महागाई यांमुळेसुद्धा कौटुंबिक समस्यांमध्ये वाढ होत आहे.
बºयाचदा समाजात असे दिसते की, सर्वसाधारणपणे आई-वडिलांची स्थावर अथवा जंगम मालमत्ता प्राप्त होईपर्यंत मुले त्यांची देखभाल करतात, परंतु एकदा का मुलांच्या नावावर मालमत्तेची नोंदणी झाली की, ती मुले आई-वडिलांची देखभाल करीत नाहीत. यातूनच समाजातील महत्त्वपूर्ण घटक असलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या मानवीय अधिकारांचे हनन होते. आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यावर त्यांना एकटे आणि निरस आयुष्य जगावे लागते.
समाजातील नव्वद टक्के ज्येष्ठांना सामाजिक सुरक्षितता नाही. ३५ टक्के ज्येष्ठ कौटुंबिक अत्याचाराने पीडित आहेत. मुंबईतील विशेषत: उच्च उत्पन्न असलेल्या समाजातील वृद्ध पालकांची त्यांच्याच पाल्यांकडून संपत्तीसाठी छळवणूक होत असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. आता असे निरीक्षण उच्च न्यायालयाच्या कल्याणकारी न्यायाधीकरणाने नुकतेच एका निकालाद्वारे नोंदवले आहे. या शहरातील खासकरून येथील श्रीमंत वर्गातील वृद्ध पालकांना त्यांच्या आयुष्याच्या संध्याकाळी सर्व प्रकारच्या छळाला सामोरे जावे लागत आहे.
आपल्याच मुलांकडून संपत्तीसाठी त्यांचा छळ होत असल्याच्या एकामागून एक तक्रारी आपल्यापुढे येत आहेत, असेही म्हटले आहे की, वडिलांच्या मालमत्तेत मुलगी तिचा वाटा मागत होती, परंतु ते जिवंत असताना त्यांच्या मालमत्तेत तिचा ‘वाटा’ काहीच नाही. तिचे वृद्ध वडील मुंबईतील आपले घर आणि सर्व संपत्ती तिला देऊ शकतात.
मात्र तो त्यांचा हक्क आहे आणि त्यांना तसे करण्यापासून कोणी रोखू शकत नाही. ते जोपर्यंत हयात आहेत, तोपर्यंत मुलीला मालमत्तेत हिस्सा नाही, असेही न्यायालयाने प्रामुख्याने नमूद केले आहे. एकंदरीत प्रत्येक व्यक्तीला आपण कमावलेल्या संपत्तीचे वाटप करण्याचा पूर्ण अधिकार आहे. आई-वडिलांच्या मृत्यूनंतर मात्र कायदेशीर वारस असलेल्या व्यक्तींना ती मालमत्ता वारस हक्काप्रमाणे मिळते. आपल्याच मुलांनी मालमत्तेसाठी जीवनाच्या संध्याकाळी वृद्ध, असह्य आई-वडिलांचा छळ करणे कितपत योग्य आहे?
े बाळासाहेब हांडे/ ९५९४४४५२२२\\