विकासावर बोलू काही

सध्या राज्यात अत्यंत घाणेरडे राजकारण पाहायला मिळते आहे. राज्याचे महत्त्वाचे प्रश्न, महागाई, बेरोजगारी, पाणीटंचाई, शेतकºयांचे प्रश्न यांकडे कोणाचेही लक्ष नाही. फक्त आरोप-प्रत्यारोप, गुन्हे दाखल करणे, जामिनासाठी पळापळ करणे, फरार होणे, अज्ञातवासात जाणे आणि जप्ती होणे या पलीकडे राज्यात काही घडत नाहीये. याचा सर्वसामान्य नागरिकांना इतका उबग आलेला आहे की, आता जनता या सर्वांना लांब करून नवा पर्याय शोधायला लागली आहे. त्यामुळे आगामी काळात जर निवडणुकांमध्ये या चिखलफेक करणाºया पक्षांना धक्के बसले, तर आश्चर्य वाटायला नको. त्यामुळे आता त्यांनी विकासावर काही तरी बोलायला पाहिजे.

तपास यंत्रणांच्या कारवायांमुळे अनेकांची डोळे दीपवणारी संपत्ती उघड झाली. संपत्तीची ही अब्जावधीची उड्डाणे नेत्यांबद्दलच्या प्रतिमा धुळीला मिळवणारी आहेत. राजकीय महायुद्ध पेटल्यानेच नेत्यांच्या संपत्तीच्या राशीबद्दल सामान्य नागरिकांना पुरेशी कल्पना आली, हेही नाकारता येणार नाही. पण एकूणच राज्याचे चित्र काय दिसते आहे सध्या? कोणी जामिनासाठी कनिष्ठ न्यायालयातून उच्च न्यायालयात, कोणावर मालमत्ता जप्तीची कारवाई, तर एखादा नेता चौकशीसाठी तपास यंत्रणांच्या ताब्यात, हे आज महाराष्ट्राचे अत्यंत घाणेरडे आणि सामान्यांना नको असलेले चित्र आहे.

आरोप-प्रत्यारोपाचा कलगीतुरा चाललेला आहे. विविध राजकीय पक्षांच्या नेते मंडळींकडून आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर पातळी सोडून टीका केली जात आहे, पण यामध्ये सामान्य माणसाचे काय? याची कोणालाही पडलेली नाही. त्याच्या प्रश्‍नांची सोडवणूक करण्यासाठी सरकारचे धोरण काय? याला काहीही उत्तर नाही. आता जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य वगैरे बाजूलाच राहू द्या, आम्ही जनतेसाठी आहोत याचेच विस्मरण सर्वांना पडल्याचे दिसते आहे.

एकीकडे भाजपने लावलेल्या सापळ्यात महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेली शिवसेना अडकून पडली आहे. विरोधकांना उत्तर देण्यात महाविकास आघाडी सरकार आपली ताकद पणाला लावत आहे. शरद पवार मुख्यमंत्री असते, तर महाराष्ट्राचे आजचे चित्र वेगळे दिसले असते, असे मत काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केले. काही गरज होती का या वक्तव्याची? तुम्हाला कोणी विचारले होते का? जे शरद पवार आणि राष्ट्रवादी पंतप्रधान पदाची स्वप्न पाहात आहेत त्यांना मुख्यमंत्री हे छोटेसे पद देण्याचा घाट घालून यशोमती ठाकूर त्यांचे अवमूल्यन करत आहेत का? पण यशोमती ठाकूर यांचे ते विधान मुख्यमंत्र्यांसह शिवसेनेच्या नेत्यांना बरेच झोंबले. पण त्यांच्या विधानाचा नेमका अर्थ समजावून घेणे शिवसेनेच्या हिताचे ठरेल.

आज राज्यात भारतीय जनता पक्ष, त्याचे मित्र पक्ष आणि महाविकास आघाडी यांच्यात सुरू असलेला संघर्ष राज्याच्या उत्कर्षासाठी, हितासाठी नसून आपल्या महत्त्वाकांक्षेची पूर्तता करण्यासाठी आहे. ईडीने भाजपविरोधकांवर सुरू केलेल्या कारवाईला प्रत्युत्तर देण्यासाठी महाविकास आघाडीने राज्य पोलीस यंत्रणेसह राज्याच्या अखत्यारीतील यंत्रणांना कामाला लावले. जनतेच्या न्यायालयात, सार्वजनिक सभांमध्ये आपापली भूमिका मांडत राजकीय नेत्यांनी विरोधकांना उत्तर दिले असते, तर वेगळी गोष्ट होती. पण हे संकेत धुडकावत आणि नीतीनियमांची पायमल्ली करीत सर्व राजकीय पक्षांकडून विरोधकांना घेरण्यासाठी होणारा शासकीय यंत्रणांचा वापर अतिशय धोकादायक आहे.

आता मागच्या सरकारच्या काळातील फोन टॅपिंगबद्दल महाविकास आघाडीचे नेते आज ओरडत आहेत. तेव्हा भाजपच्या मांडीला मांडी लावून बसणा‍ºया शिवसेनेला या फोन टॅपिंगची कल्पना नव्हती का? आमच्या नेत्यांपैकी अनेक जण किती भ्रष्ट आहेत, हे केंद्र आणि राज्याच्या यंत्रणांकडून वेगवेगळ्या प्रकरणात सुरू असलेल्या तपासात पुढे आले. मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांची डायरी गाजत आहे. त्याबद्दल खुलासा करण्याची शिवसेनेला सोय राहिलेली नाही. आम्ही भ्रष्ट नाही, हे सांगण्यापेक्षा विरोधकांनी कसा गैरव्यवहार केला हे सातत्याने सांगणे सर्वांनाच सोयीचे वाटते. गैरव्यवहाराचे गंभीर आरोप असलेले अनेक नेते स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी भाजपमध्ये गेले. आपण केंद्रातील सत्ताधारी पक्षात असल्याने चारित्र्याचे प्रमाणपत्र मिळाल्यासारखे हे नेते वागत असतात. भाजपचे एक जुने नेते किरीट सोमय्या यांनी तर भ्रष्टाचारविरोधी मोहीम सुरू करण्याचा आव आणला. आता विक्रांत युद्ध नौकेच्या नावाखाली त्यांनी जमा केलेला पैसा गेला कुठे?, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. निधी संकलनाचा कार्यक्रम प्रतीकात्मक होता, असे सांगत हे प्रकरण जुने आहे असा पवित्रा त्यांनी घेतला. पण दुसरीकडे ईडीकडे असलेली प्रकरणेही जुनी आहेत, त्याबाबत ते बोलत नाहीत.

खरंतर भाजपकडून शिवसेनेला डिवचण्याची एकही संधी दवडली जात नाही. शरद पवारांच्या निवासस्थानावर हल्ला करून राज्य अस्वस्थ करण्याचा घृणास्पद प्रयत्न नुकताच झाला. तो प्रयत्न आणि भोंग्यांचा उकरून काढलेला विषय हे कशासाठी आहेत? यातूनच महाराष्ट्राची अवस्था पाकिस्तानसारखी झाल्याचे भासवले जात आहे. पण हे महाराष्ट्राला अपेक्षित नाही. सर्वसामान्य जनतेला वा‍ºयावर सोडून आपली पोळी कशी भाजता येईल, हेच राज्यकर्ते आणि विरोधक पाहणार असतील, तर ती राज्याची फसवणूक ठरेल. मनोरंजनासाठी कला आहेत, राजकीय नेत्यांच्या प्रयोगांची त्यासाठी गरज नाही. पण सकाळ झाली की वाहिन्यांचे फोटोग्राफर, कॅमेरामन, बातमीदार या ठराविक लोकांचे उंबरे झिजवायला जातात आणि आज काय खमंग मिळतेय, दिवसभर दळायला कोणते दळण मिळते आहे हे पाहतात. त्यातून बराच अनर्थ ओढवतो. चुकीचे शब्द प्रयोग जातात. कशाला पाहिजेत प्रतिक्रिया? कोण काय म्हणाले यावर कशाला हवे आहेत कोट? महागाईवर प्रश्न विचारा, जनतेच्या प्रश्नांवर बोला. पण त्याने रंजन होणार नाही म्हणून हे असले काही तरी लावालाव्यांचे प्रकार वाहिन्यांकडून होतात. त्यातून गोंधळ माजतो आहे सगळा. म्हणून आता विकासावर बोलू काही असे सर्वांना म्हणायची वेळ आलेली आहे.

About Editor

अवश्य वाचा

उखाणा

सवाष्णीने आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पारंपरिक शैली ही महाराष्ट्राची ओळख आहे. लग्नात किंवा सण-समारंभात …