वर्क फ्रॉम होम

 उद्यापासून संपूर्ण देश निर्बंध मुक्त होत आहे. गेली दोन वर्षे ज्यांनी वर्क फ्रॉम होम केलेले आहे त्यांना आता बाहेर पडण्याची संधी मिळेल. घरात बसून काम करणे आणि आॅफीसला जाऊन काम करणे यात फरक आहे. घरात बसून काम केले, तर काम केल्याचे समाधान मिळत नाही हे खरे आहे. पण, खरोखरच जरी कोरोनामुक्त देश झाला आणि निर्बंध हटवले असले, तरी ज्यांना वर्क फ्रॉम होम करता येणे शक्य आहे त्यांनी ते करायला हरकत नसावी. सरकारने आणि खासगी आस्थापनांनीही त्याचा फायदा घ्यावा असे वाटते.

अर्थात नुकत्याच झालेल्या फेडरल रिझर्व्ह बँक आॅफ डलासच्या संशोधनानुसार, फेब्रुवारी २०२२ मध्ये घरून काम करणाºया लोकांची संख्या केवळ ८.२ टक्के होती. कडक लॉकडाऊनच्या काळात म्हणजे मे २०२० मध्ये ३५.२ टक्के लोकांनी वर्क फ्रॉम होम स्वीकारले होते. खरंतर कोरोनापूर्वी घरून काम करणे ही तरुण पिढीसाठी कल्पनारम्य गोष्ट होती. घरी बसून काम करता आले तर किती छान झाले असते, ना ट्रॅफिकची चिक-चिक, ना सहकाºयांची किच-किच, असे गमतीने म्हटले जात असे. ही कल्पना अपघाताने का होईना; पण अचानक सत्यात उतरली. पण, आता घरून काम करण्याच्या नकारात्मक बाबी समोर येऊ लागल्या आहेत.

यामध्ये लोकांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. विश्व-भारती विद्यापीठ, पश्चिम बंगालच्या एका संशोधन अहवालानुसार, घरून काम करणाºया २९ टक्के लोकांनी म्हटले की, त्यांना नैराश्य, मूड बदलणे, चिंता यांसारख्या समस्या कायमस्वरूपी आहेत. कुटुंबात राहूनही तो घरातील सदस्यांपासून तुटतो. छोट्या घरात राहणाºया लोकांना सर्वाधिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ते काम करण्यासाठी सुरक्षित वैयक्तिक जागा शोधण्यात अक्षम आहे. कुठे नेटवर्कची अडचण, तर कुठे लहान मुलांच्या गोंगाटामुळे कामात अडथळा येतो. घरून काम केल्याने चिडचिडपणा वाढला आहे आणि परिणामी घरगुती हिंसाचारही वाढत आहे. मुलांवर अन्याय होतो. वर्षभरातच कार्यालयातील कामाची, सहकाºयांच्या गेट टुगेदरची आठवण येऊ लागली आहे. बºयाचवेळा घरात बसून काम करणे म्हणजे एक प्रकारची असुरक्षितताही वाटू लागली आहे.

वास्तविक घरून काम करण्यास प्रोत्साहन देण्यामागे अनेक कारणे आहेत. कार्यालयाचे भाडे वाचते, वीज बिलातून सुटका होते, यंत्रसामग्री ठेवण्याचा त्रास होत नाही. खासगी आस्थापनांचा चहापाणी हा मोठा कार्यालयीन खर्च कमी झाला. त्यांना ते निश्चितच सोयीस्कर आहे. त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी खर्च कमी करण्यासाठी या पद्धतीचा वापर करायला हरकत नाही. कामावर उशिरा येणे, बस चुकणे, ट्रेन चुकणे, लेटमार्क लागणे हे प्रकारही यातून सुटतील. त्यामुळे आस्थापना आणि कर्मचारी या दोन्ही दृष्टीकोनातून यातून जे फायदे आहेत, ते मिळवण्यासाठी कोरोनामुक्त झालो, तरी ही पद्धत चालू ठेवायला काहीच हरकत नाही.

अर्थात या वर्क फ्रॉम होममुळे अनेकांना वैफल्य येण्यामागचे कारण वेगळे आहे. ते म्हणजे कामाकडे त्यांनी आॅफीसवर्क म्हणून पाहिले नाही. आपण रोज आॅफीसला जातो तसे तयार होऊन आपल्या घरातच कामाला सुरुवात केली, तर आॅफीसचा आनंद घेता येईल; पण घरातच आहे, कोण पाहणार आहे, म्हणून घरगुती कपड्यातच, बर्म्युड्यातच बसला आहे, असे प्रकार केले, घरात बायकोला कामात मदत करता करता आॅफीसचे काम केले, तर त्यात शिस्त येणार नाही. वर्क फ्रॉम होम हे शिस्तीचे काम आहे. गचाळ माणसांचे ते काम नाही. नेहमी कामावर काही तरी निमित्त सांगून उशिरा जाणारे, सतत सुट्टी घेणारे, कामचुकार लोकांच्या दृष्टीने हे काम योग्य असणार नाही; पण शिस्तीने नियमीत काम करणारी माणसे व्यवस्थापनासाठी वर्क फ्रॉम होम चांगल्याप्रकारे करून आनंद मिळवू शकतील.

अनेकांनी वर्क फ्रॉम होममुळे आमची जाडी वाढली, वजन वाढले अशा तक्रारी केल्या; पण याला काही अर्थ नाही. तुम्ही व्यायाम करू शकला असता. तुमचा जाण्या-येण्याचा वेळ वाचत आहे तर थोडा वेळ व्यायामाला, वर्कआऊटला दिला, तर वजन वाढण्याचे कारण नाही. तोंडावर ताबा पाहिजे. घरात आहे म्हणून सतत चरत बसला आहे, असे कसे चालेल? आपण आॅफीसात आहोत असे समजून काम करायला पाहिजे. आॅफीसमध्ये काही सतत चरत बसतो का?, लंच अवरशिवाय एरवी कोणी खात पित बसते का? तशीच शिस्त लावून काम केले, तर वजन वाढणार नाही. आपल्या कामाची विशिष्ठ शैली निर्माण केली, घरी आहे म्हणून केव्हाही कोणालाही भेटण्यात, गप्पा मारण्यात वेळ घालवला नाही, तर असले प्रकार होणार नाहीत. वर्क फ्रॉम होम आहे, म्हणून कोणीही केव्हाही भेटायला आला असे होता कामा नये. घरात असलो तरी आॅफीसमध्ये आहे, कामात आहे, असे सांगण्याचा स्पष्टवक्तेपणा असला पाहिजे. घरच्यांनी इतरांना तसे सांगण्याची सवय केली पाहिजे, तर वर्क फ्रॉम होम नीट होईल आणि त्याचा आनंद मिळेल.

About Editor

अवश्य वाचा

उखाणा

सवाष्णीने आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पारंपरिक शैली ही महाराष्ट्राची ओळख आहे. लग्नात किंवा सण-समारंभात …