वणव्याचे स्वरूप

कर्नाटकमधील हिजाबवरून उफाळलेला वाद मिटण्याची चिन्हे दिसत नाहीत. हा वाद थांबवणे आवश्यक असताना काही वृत्तवाहिन्या त्या आगीत तेल ओतण्याचे काम करत आहेत. ही अत्यंत लांछनास्पद अशी बाब आहे. हा वाद कर्नाटकातून काही वाहिन्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात आणला गेला आहे. त्यामुळे आता एका शिक्षण संस्थेतील हा स्थानिक पातळीवरचा विषय आज राष्ट्रीय पातळीवर वणव्याचे स्वरूप धारण करून राहिला आहे. विविध राज्याराज्यांतून तो पसरत चालला आहे.

खरंतर उच्च न्यायालयाच्या दिशानिर्देशांनंतर तो सर्वोच्च न्यायालयात पोहोचला. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात तातडीने सुनावणी घेण्याची आवश्यकता नसल्याची भूमिका घेतली आहे. मात्र, या प्रकरणामुळे केवळ कर्नाटकातच नव्हे, तर संपूर्ण देशभरामध्ये हिंदू-मुस्लीमांमध्ये आजवर आधीच खोल असलेली दरी अधिक रुंदावण्याचे जे जोरदार प्रयास विविध घटकांकडून चालले आहेत, ते अत्यंत घातक असे आहेत. दोन दिवसांपूर्वी एका वाहिनीने मुंबईतील एका महाविद्यालयात दहा वर्षांपासून अशी बंदी असल्याचे वृत्त दाखवले. हे अत्यंत अनावश्यक काम त्या वाहिनीने केले. त्या महिला प्राचार्यांनी स्पष्ट सांगितले आहे की, बुरखा घातला तर आत एखादा मुलगा असू शकतो आणि तो मुलींची छेडछाड काढू शकतो, म्हणून अशी बंदी आम्ही दहा वर्षांपूर्वी घातलेली आहे. यात गैर काहीच नाही; पण मुंबईत बंदी मुंबईत बंदी अशी ओरड करून त्या वाहिनीने इथल्या मुस्लीम धर्मियांना भडकवण्याचा प्रयत्न केला. अर्थात त्या कॉलेजच्या मुस्लीम विद्यार्थिनींनी तो डाव हाणून पाडला. यात गैर काहीच नाही. असे सांगून कॉलेजला सहकार्य करण्याची भूमिका घेतली; पण जर हे उलटे झाले असते, तर महाराष्ट्रात भडका उडायला वेळ लागली नसती, म्हणूनच वाहिन्यांच्या वृत्तांवर आता सेन्सॉरबोर्ड लावावे की काय, असा प्रश्न निर्माण झालेला आहे.
शैक्षणिक संस्थेतील गणवेषाच्या साध्या विषयाला घटनात्मक व्यक्ती स्वातंत्र्य, धार्मिक स्वातंत्र्य, नागरी समानता आणि अगदी समान नागरी कायद्यापर्यंतच्या विषयांची किनार मिळाल्याने तो गुंतागुंतीचा आणि स्फोटक बनत चाललेला दिसतो आहे. ही आग अर्थातच वाहिन्यांनी भडकवली आणि त्याला राजकीय पक्षांनी आपल्या सोयीनुसार वापर करण्याचे ठरवले. यात शिक्षणक्षेत्राचे नुकसान होत आहे. आठ-दहा दिवस झाले कर्नाटकातील शिक्षणसंस्था या कारणामुळे बंद ठेवण्यात आल्या आहेत. अगोदर कोरोनामुळे वर्ष दीड वर्ष शिक्षणाचे वाटोळे झाले आहे, आता या गलिच्छ राजकारणाने नुकसान होत आहे. त्यामुळे अशाप्रकारचे वृत्त प्रसिद्ध करून आगीत तेल टाकणाºयांना आवर घालावा लागेल.

कर्नाटकातल्या उडुपीतील शैक्षणिक संस्थेमध्ये काही मुस्लीम मुली हिजाब घालून आल्यावरून हा वाद गेल्या वर्षअखेरीस सुरू झाला. बघता बघता त्याचे लोण कर्नाटकच्या किनारपट्टीतील भागांत पसरत गेले आणि आता हा विषय राष्ट्रीय पातळीवर पोहोचवला गेला आहे. उत्तर प्रदेशसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत, हिमाचल, गुजरात आणि जम्मू-काश्मीरच्या निवडणुका वर्षअखेर व्हायच्या आहेत आणि खुद्द कर्नाटकची निवडणूकही मे २०२३ पूर्वी व्हायची आहे. त्यामुळे या प्रकरणाला दोन्ही बाजूंनी धार्मिक आणि राजकीय स्वरूप देऊन आपापला मतलब साधण्याचे प्रयत्न चाललेले स्पष्ट दिसत आहे. कोणत्या ना कोणत्या विषयावरून जातीय वा धार्मिक ध्रुवीकरण घडवून आणायचे आणि आपला निव्वळ राजकीय मतलब पुरेपूर साधायचा हे नित्याचे झाले आहे.
खरं म्हणजे, संविधानाने नागरिकांना व्यक्ती स्वातंत्र्य, धार्मिक स्वातंत्र्य बहाल केलेले आहेच, परंतु त्याचबरोबर समानतेचा आग्रहही धरलेला आहे. शाळा, महाविद्यालये ही शिक्षण घेण्यासाठी असतात. पोशाखीपणासाठी नव्हे. त्यामुळे तेथे प्राधान्य शिक्षणाला असायला हवे, परंतु धार्मिक स्वातंत्र्याच्या नावाखाली आम्ही गणवेश घालणार नाही, हिजाबच घालून जाऊ हा एका गटाचा हट्टाग्रह आणि त्या हिजाब घालणार असतील, तर आम्ही भगवे शेले घालू हा दुसºया गटाचा दुराग्रह यातून हे प्रकरण कुठल्याकुठे जाऊन पोहोचले आहे. पहले हिजाब, फिर किताब यांसारख्या घोषणा या विषयात कोवळी मुले-मुली देत आहेत, हे खरोखर लाजीरवाणे आहे. आधीच मुस्लीम समाजामध्ये शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. विशेषत: मुला-मुलींनी मदरशांमधून धार्मिक शिक्षण घेतले की, पुरे झाले अशी प्रतिगामी मानसिकता आजही दिसते. परंतु, दुसरीकडे मुस्लीम समाजातूनही शिकली सवरलेली काही मुले-मुली वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये पुढे आलेली आहेत. मग यापैकी कोणता मार्ग चोखाळायचा, याचा विचार या कोवळ्या मुलांनी व पालकांनी करायला हवा आहे. धर्मवेड्या संघटना आणि नेते जर डोकी भडकावत असतील, तर समाजातील सुबुद्ध जाणत्या नागरिकांनी ही दिशाभूल रोखण्यासाठी पुढे यायला हवे. त्यासाठी आगीत तेल ओतणाºया माध्यमांवरही थोडा अंकुश ठेवावा लागेल.

हिजाबच्या प्रकरणात दोष केवळ एका समाजाचा नाही. ते हे करीत आहेत, तर आम्ही ते करू ही जी प्रतिशोधाची भावना भडकावली जात आहे, तीही तितकीच घातक आणि भारतीय एकात्मतेस मारक आहे, हे देखील तितकेच ठासून सांगण्याची वेळ आलेली आहे. प्रतिगामी शक्ती या सर्व धर्मांमध्ये असतात. आपले वर्चस्व राखण्यासाठी सतत समाजाची दिशाभूल करीत राहतात. समाजघटकांमध्ये असुरक्षितता निर्माण करीत असतात. याचा राजकीय फायदा घेणाºयांची अर्थातच त्यांना फूस असते. दोघेही परोपजीवी असतात. त्यामुळे एकमेकांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष साह्य करीत असतात. ही भ्रष्ट विचारांची युती किंवा सहकार्याची भावना समजून घेतली पाहिजे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी अशा भडकावू भाषणे, घोषणा आणि वृत्तांवर विश्वास न ठेवता आपले हित पाहिले पाहिजे.

About Editor

अवश्य वाचा

उखाणा

सवाष्णीने आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पारंपरिक शैली ही महाराष्ट्राची ओळख आहे. लग्नात किंवा सण-समारंभात …