लग्नोत्सवाचा उद्योग घाट्यात

१९९४ साली सूरज बडजात्या यांचा सुपरहिट चित्रपट ‘हम आपके हैं कौन’ किंवा त्यानंतर आलेला ‘विवाह’ आणि आताचा ‘प्रेम रतन धन पायो’ हे चित्रपट म्हणजे लग्नाचा आनंद देणारे, खर्चिक लग्नांचे नमुने दाखवणारे चित्रपट. सूरज बडजात्या यांच्या राजश्री प्रॉडक्शनचे हे सारे चित्रपट भारतीय लग्नसोहळे चित्रित करणारे होते. अडीच-तीन तास फक्त लग्न दाखवणा‍ºया सिनेमाने लोकांना आकर्षित केले. म्हणजे भारतीय संस्कृतीतील कलात्मकता, भव्यता हे सगळे या चित्रपटांमधून बघायला मिळालेच, पण भरजरी कपडे, भव्य-दिव्य सेट, तीन-चार दिवस चालणारा सोहळा, गाणी, संगीत, मस्ती-मजा आणि बरेच काही. पण यातून लग्नोत्सवाचा उद्योग आकाराला आला होता, पण गेल्या दोन वर्षांत या उद्योगाला फार मोठा आर्थिक फटका बसल्याचे दिसत आहे.
एकाच थिमवर आधारित असूनही सूरज बडजात्यांचे हे सिनेमे दणाणून चालले. याचे कारण कोणाही माणसाला आनंदी वातावरण बघायला आवडते. दररोज येणा‍ºया हिंसात्मक बातम्या, जगातील दु:खदायी, वेदनादायी घटना यामध्ये आनंद देणारे क्षण माणसाला हवे असतात. म्हणूनच लग्न ही थिम पुन: पुन्हा चालली. विशेष म्हणजे यामधून आणखी एक गोष्ट आता दिसून आली आहे. ती ही की, लग्न नावाची एक प्रचंड अशी इंडस्ट्री, एक उद्योग, इव्हेंट मॅनेजमेंट गेल्या काही वर्षांत या देशात उभी राहिली आहे. म्हणजे लग्न जमवण्यापासून ते हनिमून पॅकेजपर्यंत या इंडस्ट्रीमध्ये व्यवसायाच्या विविध संधी उपलब्ध झाल्या आहेत. याकडे एक करिअर म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन वाढीस लागला आहे. फार मोठी उलाढाल सुरू झाली, पण कोरोनाच्या काळात नेत्यांच्या मुलांची लग्न सोडली, तर सामान्यांना गर्दी करण्यास परवानगी नव्हती, त्यामुळे या उद्योगाला फार मोठा फटका बसला. यामध्ये मंडपवाले, केटरर्स, बँडवाले, घोडावाले, वरातीतील माणसे आणि सर्वात जास्त फटका लग्नपत्रिका छापणाºया, स्क्रिन प्रिंटिंग करणाºया व्यावसायिकांना बसलेला दिसतो.

आपल्याकडे तुळशीचे लग्न झाल्यानंतर विवाहाचा हंगाम सुरू होतो. तेव्हापासून किती उद्योग कार्यान्वित होतात हे लक्षात घेण्यासारखे आहे. एकट्या महाराष्ट्रात विवाह सोहळ्यांवर होणारा वार्षिक खर्च कागदावरील उपलब्ध आकडेवारीनुसार ६५ हजार कोटींच्या घरात पोहोचल्याचे दिसून आले आहे. लग्नात लेखी नोंद नसलेले खर्च खूप असतात. यामुळे प्रत्यक्षात हा आकडा आणखी मोठा असू शकतो.
देशात सध्या लग्नांवर वर्षाला सव्वा लाख कोटी खर्च होतात. म्हणजे एक माणूस आपल्या आयुष्यातील एक पंचमाश कमाई ही लग्नासाठी खर्च करतो. भारत हा तरुणांचा देश आहे. २५ ते ३० वयोगटांतील मुला-मुलींची संख्या लक्षात घेता सध्या पुढील ५ वर्षांत मोठ्या संख्येने लग्ने होणार आहेत. लग्न खर्चाची वार्षिक उलाढाल पुढील पाच वर्षांत प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष खर्च लक्षात घेता १० लाख कोटींच्या वर जाऊ शकते. पण या लग्नोत्सवाला जर आळा घातला तर फार मोठी आर्थिक उलाढाल थांबणार आहे.

काही वर्षांपूर्वी मुंबईत एक विवाह महोत्सव झाला होता. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. म्हणजे ज्याप्रमाणे प्रॉपर्टी एक्झिबिशन भरतात, त्याप्रमाणे विवाह महोत्सव केला गेला. या विवाह महोत्सवात साड्या, कपडे, दागदागिने, फोटो, व्हिडीओ, डेकोरेशन, हनिमून पॅकेज असे स्टॉल उभारण्यात आले होते. याशिवाय वधू-वर मेळावाही आयोजित केला होता. यासाठी विविध वधूवर सूचक केंद्रांची मदत घेतली होती. हा उद्योग आर्थिक चक्र वेगाने फिरवणारा आहे. पण लग्नातील उपस्थितीवर आलेली बंधने, थोडक्यात लग्न करण्याचा आलेला आदेश यामुळे हा उद्योग संकटात सापडलेला दिसतो.
इव्हेंट मॅनेजमेंट आणि हा उद्योग नवनव्या कल्पना प्रत्यक्षात उतरवतात. म्हणजे ज्यांना शक्य आहे, त्यांच्याकडून भरपूर खर्च करून हा उत्सव, आनंदोत्सव करण्याचा नवा फंडा प्रचलित झाला होता. याप्रमाणे गर्भश्रीमंतांची लग्ने मॉरिशस तसेच राजस्थानमधील जोधपूर, उदयपूर येथे आयोजित केली जातात. मॉरिशसमधील एका लग्नाचा साधारण खर्च आहे तो २८ कोटी. त्याच वेळी जोधपूर, उदयपूरमधील किल्ला परिसरातील लग्नांचा खर्च ३ कोटींपासून सुरू होतो. ही लग्ने म्हणजे एकप्रकारे वेडिंग टुरिझमच आहे. मागच्या महिन्यात एका अभिनेत्रीचा विवाहसोहळा सोडला, तर सामान्य माणसांना असे सोहळे साजरे करता आलेले नाहीत. पण या उद्योगाला चालना दिली, तर रोजगाराची फार मोठी संधी निर्माण होईल हे लक्षात घेतले पाहिजे. कोकणातील सुंदर प्रशस्त किना‍ºयांवर अशी लग्ने भविष्यात आयोजित करता येऊ शकतात. याशिवाय विविध रिसॉर्टबरोबर टायअप करूनही लग्ने लावली जातील.

लग्नावर होणारा खर्च हा नेहमीच चर्चेचा आणि टीकेचा भाग असला, तरीही रोजगार आणि उद्योग वाढीस हा फार मोठा आकर्षक सोहळा होत आहे. त्यामुळे अनेक उद्योगांना चालना मिळते आहे. याकडे सकारात्मकतेने पाहिले पाहिजे. सर्वांना अशी धुमधडाक्यात लग्न करता आली नाहीत तरी जे अशी लग्न करत आहेत त्याचा आनंद घेण्यास काहीच हरकत नाही. चित्रपटामुळे काही विधी नसलेले लादले गेले आहेत हा एक भाग आहे. तसा पूर्वी मेंदीचा कार्यक्रम हा काही विधी नव्हता. पण आजकाल हळदीप्रमाणे मेंदीचा कार्यक्रम एक दिवस केला जातो. हे बदल या उद्योगाची शान वाढवत आहेत. पण हा उद्योग रुजत असतानाच त्याला कोरोनाच्या ग्रहणाने ग्रासले, त्यामुळे अनेकांचा रोजगार यात गेला हे लक्षात घेतले पाहिजे. हा दिसणारा रोजगार नसला तरी त्यांनाही प्रोत्साहन देण्यासाठी मोकळ्या जागेत विवाह करण्यास परवानगी दिली पाहिजे. सगळे उद्योग चालू असताना हा लग्नोत्सवाचा उद्योग ठप्प होणे योग्य नाही.
– प्रफुल्ल फडके/मुखशुद्धी

9152448055\\

About Editor

अवश्य वाचा

उखाणा

सवाष्णीने आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पारंपरिक शैली ही महाराष्ट्राची ओळख आहे. लग्नात किंवा सण-समारंभात …