लई भारी रितेश देशमुख

चित्रपटसृष्टी आणि राजकारण यांचे संबंध जरी जुनेच असले, तरी चित्रपट क्षेत्रातून राजकारणात येणारा प्रवाह आपल्याकडे सातत्याने पाहिला गेला आहे, पण राजकारणातील मोठे व्यक्तिमत्व आणि घरातून मोठी राजकीय पार्श्वभूमी असलेला एक तरुण चित्रपटसृष्टीत आपले नाव निर्माण करतो हे फार मोठे आणि अवघड काम आहे, पण रितेश देशमुखने ते करून दाखवले, म्हणून रितेश देशमुख हा लई भारी अभिनेता ठरला. आज १७ डिसेंबर रितेशचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्याच्या कारकिर्दीचा हा प्रवासही पाहायला हवा.
रितेश महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे दुसरे सुपुत्र आहेत. २००३ सालचा चित्रपट तुझे मेरी कसमद्वारे रितेशने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून अनेक लहान-मोठ्या भूमिका त्याने केल्या आहेत. २००४ मध्ये प्रदर्शित झालेला मस्ती या चित्रपटापासून त्याला व्यावसायिक यश मिळण्यास सुरुवात झाली.

त्यानंतर त्याने क्या कूल हैं हम, ब्लफमास्टर, मालामाल विकली, हे बेबी, धमाल, दे ताली, हाऊसफुल्ल, डबल धमाल, तेरे नाल लव हो गया, हाऊसफुल्ल २, क्या सुपर कुल हैं हम, ग्रँड मस्ती अशा यशस्वी चित्रपटांत काम केले. अस्सल मराठमोळे व्यक्तिमत्व असूनही बॉलीवूडमध्ये नायक म्हणून रितेश यशस्वी झाला हे विशेष. रितेशने आजवर विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. मध्यंतरी आलेल्या काही सिनेमांद्वारे विनोदी कलाकार अशी त्याची ओळख निर्माण झाली. रितेशने २०१४ मध्ये आलेल्या एक व्हिलन चित्रपटात प्रथमच नकारात्मक भूमिका साकारली व ती प्रचंड लोकप्रिय ठरली.
जानेवारी २०१३ मध्ये रितेशने पहिल्यांदाच बालक-पालक या मराठी चित्रपटाची निर्मिती केली. २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लय भारी’ चित्रपटाद्वारे त्याने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. चित्रपटांसोबतच रितेशने अनेक पुरस्कार सोहळ्यांचे सूत्रसंचलनदेखील केले आहे. रितेशला आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. अनेक मोठ्या पुरस्कार सोहळ्यांमध्ये नामांकन व पुरस्कार रितेशने पटकावले आहेत. अभिनयाशिवाय सेलिब्रिटी क्रिकेट लीगमधील ‘वीर मराठी’ नावाचा संघ त्याचा आहे, तसेच तो या संघाचा कर्णधारदेखील आहे. २०१८ ला लय भारी चित्रपटात काम करून मराठी नायकाला बॉलीवूडचा टच देण्याचे काम केले होते. हा चित्रपट तुफान चालला होता.

रितेशचा जन्म लातूरमधील बाभळगाव या गावी झाला. माजी केंद्रीय अवजड उद्योग व विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख व वैशाली देशमुख यांचे ते दुसरे सुपुत्र आहेत. रितेशचे ज्येष्ठ बंधू अमित देशमुख हे राज्यमंत्री तथा लातूर शहराचे विद्यमान आमदार आहेत, तसेच छोटे बंधू धीरज देशमुख हे लातूर युवक काँग्रेसचे अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य होते आणि आता लातूर ग्रामीणचे आमदार आहेत. एवढी भव्य राजकीय घरगुती पार्श्वभूमी असलेल्या रितेशने राजकारणाकडे न वळता चित्रपट क्षेत्राकडे केलेली वाटचाल ही कौतुकास्पद अशीच आहे. रितेशचे शालेय शिक्षण लातूर येथेच झाले आहे, तसेच त्याचे महाविद्यालयीन शिक्षण जि. डी. सोमाणी मेमोरिअल स्कूल येथे झाले आहे. कमला रहेजा महाविद्यालय, मुंबई या महाविद्यालयातून त्याने आर्किटेक्ट ही पदवी प्राप्त केली. २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तुझे मेरी कसम’ चित्रपटाद्वारे त्याने चित्रपटसृष्टीत अभिनेता म्हणून पदार्पण केले. या चित्रपटाद्वारे जोडी जमलेल्या जेनेलिया डिसुझा हिला रितेशने आयुष्याचा जोडीदार(पत्नी) म्हणून पसंत केले व २०१२ मध्ये हिंदू व ख्रिश्चन या दोन्ही रितीरिवाजानुसार तो जेनेलिया हिच्या सोबत विवाहबद्ध झाला. जेनेलिया ही अभिनेत्री असून, तिने आजवर अनेक हिंदी व तेलुगू चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. रितेशच्या दोन्ही वहिनी आदिती घोरपडे (आदिती अमित देशमुख) व दीपशिखा भगनानी (दीपशिखा धीरज देशमुख) यादेखील चित्रपटसृष्टीशी निगडीत आहेत. मोठ्या वहिनी आदिती यांनी हिंदी मालिकांमध्ये अभिनेत्री म्हणून काम केले आहे, तर धाकट्या वहिनी दीपशिखा या स्वत: निर्मात्या असून, सुप्रसिद्ध निर्माते वासू भगनानी यांच्या त्या कन्या आहेत. रितेश आणि जेनेलिया यांना २ अपत्य असून रिआन व राहील अशी त्यांची नावे आहेत.
राजकीय वारसा असल्याने सामाजिक कार्य करणे हे रितेशच्या बाबतीत अटळच होते. रितेश देशमुख हा युवक बिरादरी (भारत) या राष्ट्रीय पातळीवरील युवा संस्थेचा उपाध्यक्ष आहे. रितेशने त्याचे मूळ गाव असलेल्या लातूर येथे जलयुक्त लातूरसाठी २५ लाख रुपये एवढी देणगी दिली आहे. रितेश आणि त्याची पत्नी जेनेलिया देशमुख हिने अवयव दान करण्याचा निर्णय घेतला आहे. ही सामाजिक बांधीलकी जपत रितेशने आपली कारकीर्द यशस्वी करून दाखवली आहे. कोरोनानंतर नव्याने बाळसं धरू पाहत असलेल्या मराठी चित्रपटसृष्टीला रितेश देशमुख याच्याकडून खूप अपेक्षा आहेत. त्या त्याच्याकडून पूर्ण व्हाव्यात याच त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा ठरतील.

प्रफुल्ल फडके/ द स्क्रिन
9152448055\\

About Editor

अवश्य वाचा

उखाणा

सवाष्णीने आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पारंपरिक शैली ही महाराष्ट्राची ओळख आहे. लग्नात किंवा सण-समारंभात …