लसीकरण पूर्ण होऊन १५ दिवस झालेल्यांना आता मुंबई लोकलचे तिकीट मिळायला सुरुवात झाली आहे. याआधी राज्य सरकारने लोकल प्रवासासाठी मासिक पास देण्याचे आदेश मध्य आणि पश्चिम रेल्वेला दिले होते. त्यामुळे गेले काही दिवस गोंधळ बघायला मिळाला होता. रेल्वेने ही बाब राज्य सरकारच्या लक्षात आणून दिल्यानंतर राज्य सरकारने पुन्हा एक पत्र रेल्वेला लिहून या पत्रात लसीकरण पूर्ण झालेल्या अत्यावश्यक सेवेत असलेल्या किंवा नसलेल्या, अशा सर्वच प्रवाशांना एक दिवसाचे तिकीट काढण्याची परवानगी देण्यास सांगितले.
फक्त लसीकरण झालेले प्रवासीच तिकीट आणि पास घेत आहेत याची खात्री करावी, अशा सूचनादेखील राज्य सरकारने केल्याचे पत्रात आहे. मुंबईमध्ये आता जवळपास सर्वच निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत, पण लोकल ट्रेनमधून प्रवास करण्यासाठी लसीचे दोन डोस झालेल्या प्रवाशांना महिन्याभराचा पास काढावा लागत होता. प्रवाशांना एका दिवसाच्या प्रवासासाठी तिकीट मिळत नव्हते. त्यामुळे प्रवासी एक-दोन दिवसांच्या प्रवासासाठी महिन्याभराचा पास काढण्यापेक्षा विनातिकीट प्रवास करताना दिसत होते.
परिणामी अनेक लोकांना नाहक दंडाचा भूर्दंड सहन करावा लागला. सरकार निर्बंध शिथिल करताना लोकलचा विचार का करत नाही, हा प्रश्न उपस्थित केला जात होता. आठवड्यातून एकदा म्हणजे महिन्यातून चार वेळा मी लोकलने प्रवास करतो, पण त्या चार दिवसांसाठी मी महिनाभराचा पास का काढू?, मला तिकीट दिले जात नाही. त्यामुळे मी विनातिकीट प्रवास करतो. अशा प्रकारचे अनेक प्रवासी होते. जे तिकीट काढून प्रवास करू इच्छित होते, पण नाईलाजाने विनातिकीट प्रवास करत होते. आम्हाला तिकिटे देणे सुरू करा. मग ही अडचण येणारच नाही, असेही ते सांगत होते.
यामुळे विनातिकीट प्रवास करणाºयांची संख्या वाढली होती. लोकांसमोर पर्याय नसेल, तर लोक विनातिकीट प्रवास करणारच. त्यांच्यासाठी सिंगल तिकीट उपलब्ध करून द्या, ही मागणी प्रवासी संघटनेकडून करण्यात येत होती. प्रवासी संघटनेचे मधू कोटीयन म्हणाले, ‘लसीचे दोन डोस झालेल्यांना प्रवासाची मुभा द्या ही आमची मागणी मान्य केली, पण पासचा फंडा कुठून आला?, जर लोकांना १-२ तासांसाठी प्रवास करायचा आहे, तर त्यांनी महिन्याचा पास का काढायचा?’ जिथे २० रुपयांच्या तिकिटाने प्रवास शक्य आहे, तिथे प्रवाशांनी १२५ रुपये का द्यायचे?
राज्य सरकारने लवकर ही अट काढून टाकावी. रेल्वेने ही बाब राज्य सरकारच्या लक्षात आणून दिल्यानंतर सुधारित पत्रात लसीकरण पूर्ण झालेल्या, अत्यावश्यक सेवेत असलेल्या किंवा नसलेल्या, अशा सर्वच प्रवाशांना एक दिवसाचे तिकीट काढण्याची परवानगी देण्यात येत असल्याचे या पत्रात म्हटले आहे, परंतु मधल्या काळात मध्य व पश्चिम रेल्वेकडून नाइलाजाने प्रवास करणाºया प्रवाशांकडून विक्रमी दंडवसुली करण्यात आली. याला जबाबदार कोण?
े बाळासाहेब हांडे/े ९५९४४४५२२२\\