राहून गेलेलं काही…

आम्ही पूर्वी गिरणगावात एका चाळीत राहायचो, त्या परिसरात फिरताना गिरण्यांच्या उंच उंच चिमण्या आकाशात झेपावलेल्या दिसत, आम्ही त्यांना भोंगे किंवा धुरांडी म्हणायचो. आता त्याच जागी त्यांच्या पेक्षाही उंच टॉवर तेथे उभे आहेत. त्या धुरांड्यांना बाहेरच्या बाजूने त्यावर चढून जाण्यासाठी स्टेपल पीनसारख्या पायºया दिसायच्या, काही ठिकाणी वेगळ्या प्रकारच्या असतील पण पायºया असत. ज्या अर्थी पायºया होत्या त्या अर्थी कोणी तरी काही कामासाठी त्या वापरत असणारच. वाटायचे आपणही त्या पायºया चढून वर जायला काय हरकत आहे. वेगळाच थरार अनुभवायला मिळेल; पण त्या गिरणीच्या भोंग्याच्या पायºया चढून जाण्याचा योग कधी आला नाही.

आजूबाजूला येता-जाता रोज आपल्या डोळ्यांसमोर दिसणाºया ठिकाणी माझ्यासारख्या एका अतिसामान्य व्यक्तीने ठरविले, तर प्रवेश मिळणे तितकेसे अवघड नाही अर्थातच नोकर म्हणून नव्हे, कारण नोकर म्हणून देखील तेथे काही खास प्रशिक्षणाची आवश्यकता असते, पण अशा काही ठिकाणी मी अजून जाऊ शिकलेलो नाही. तेथे एकदा तरी प्रवेश मिळावा, तेथे पाय ठेऊन अगदी थोड्या वेळासाठी का होईना जाऊन पाहता यावे एक आगळावेगळा अनुभव घेता यावा. अशा काही गोष्टी मात्र मला अजूनही करता आल्या नाहीत, याचे दु:ख किंवा वैशम्य नव्हे तर हूरहूर मात्र लागून राहिली आहे. अप्राप्य नसतानाही अजून न अनुभवलेल्या गोष्टीबद्दल एक प्रकारची हूरहूर वाटत राहवी, तसे काहीसे.
अगदी शहरी भागात किंवा डोंगर-दºयातून, माळरानावर, मोबाईल टॉवर उभे राहिले आहेत. त्यांना वर चढून जाण्यासाठी पायºया असलेली चिंचोळी शिडी असते. वर बसवलेली उपकरणे त्यांची निगा राखण्यासाठी कामगार वर जात असणारच, त्या शिडीवर चढून जाऊन आजूबाजूला असलेला परिसर कसा दिसतो ते पहावे असे वाटायचे, पण पुढचा सर्व पोलीस प्रकरणाच्या शक्यतेचा विचार केला की वाटायचे, नको ते धाडस.

शिवडी, बुचर आयलंड, रसायनी या बाजूला तेल कंपन्यांच्या अजस्त्र आकारांच्या तेलाच्या टाक्या दिसतात. चंदेरी चमचमत्या रंगाच्या टाक्यांना बाहेरच्या बाजूने त्या टाक्यांच्या भिंतींना खेटून काळ्या रंगाच्या लोखंडी पायºया एखाद्या घाट रस्त्यासारख्या वळणे घेत त्या टाकीच्या वरच्या बाजूला गेलेल्या दुरूनही स्पष्ट दिसतात. त्या पायºया चढून जाताना एका बाजूला कड्यासारखी टाकीची तुळतुळीत वर गेलेली उभी भिंत आणि दुसरीकडे दरीसारखा पसरलेला भवताल, काय वेगळाच थरार अनुभवायला मिळत असणार! परंतु त्या परिसरात आत प्रवेश मिळणच मुश्कील, त्या टाकीपर्यंत पोहचणे आणि त्या पायºयांवर पाय ठेवण तर त्याहून मुश्कील. त्यामुळे तो थरार अनुभवायला मिळाला नाही.
आता मी जे सांगणार आहे किंवा जो अनुभव मला घ्यावासा वाटला तो सांगितला, तर मला कोणीही वेड्यातच काढेल. पण तरीही सांगतोच कारण मनातलं सगळं सांगण्यासाठी तर हा खटाटोप आहे. मग मला तुम्ही काहीही म्हणा किंवा नावं ठेवा.

रेतीने काठोकाठ भरलेले ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌ट्रक रस्त्यावरून जाताना आपण पाहतो, त्या रेतीवर एखाद दुसरा कामगार, पोत्याची घडी उशाला घेऊन आणि पोत अंथरूण एक हात डोळ्यांवर आडवा टाकून अगदी भरदुपारी देखील गाढ झोपलेला दिसतो. खाली मऊ मऊ रेती, झोपाळ्यासारखी हेलकावे खात जाणारी गाडी आणि अंगावर येणारा मोकळा वारा, जणू काही समुद्रावरच्या वाळूवर आपण झोपलो आहोत आणि कुठली, तरी अज्ञात शक्ती आपल्याला अलगद उचलून अशी कुठे कुठे घेऊन जातेय. असे कधीतरी अनुभवास यावे, असेही कधी-कधी वाटते.
आता आयुष्याच्या या टप्प्यावर आल्यावर म्हणजे वयाची पंचाहत्तरी जवळजवळ येत असताना, ‌‌काही काही गोष्टी करायच्या, अनुभवायच्या राहून गेल्या असं वाटत राहतं.

पण टिपिकल, मध्यम वर्गीय जगणे आनंदाने म्हणा किंवा नाईलाजाने म्हणा स्वीकारलेले असल्यामुळे मनात असूनही बरेच अनुभव ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌धाडसाने म्हणा किंवा बंडखोरी करून मिळवणे शक्य झाले नाही यापुढे शक्य होईल, असे वाटत नाही.
पण त्यामुळे काही फार मोठे बिघडलेले नाही ना? बास तर मग! हा मध्यमवर्गीय मंत्र मात्र अशा परिस्थितीत मनाला मोठा आधार देऊन जातो.

– मोहन गद्रे
\

About Editor

अवश्य वाचा

उखाणा

सवाष्णीने आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पारंपरिक शैली ही महाराष्ट्राची ओळख आहे. लग्नात किंवा सण-समारंभात …