ठळक बातम्या

रात्र शाळा आणि त्यांच्या समस्या

महात्मा ज्योतिबा फुले यांनी १८५५ साली पुणे येथे पहिली रात्रशाळा सुरू केली. गरीब, गरजू, कष्टकरी विद्यार्थ्यांना इंग्रजीचे शिक्षण मिळावे या उद्देशाने ब्रॅडले यांनी १८६६ मध्ये मुंबई येथे रात्रशाळा सुरू केली. १९४७ ते १९९३ दरम्यान औद्योगिक शहरात व गिरणगावात रात्रशाळेचा प्रसार झाला.

विद्यार्थ्यांची गरज ओळखून रात्र कनिष्ठ महाविद्यालये व रात्र महाविद्यालये ही रात्रशाळांना जोडून सुरू करण्यात आली. दिवसभर नोकरी करून रात्री शिक्षण घेण्याची संधी रात्रशाळेमुळे गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मिळते. रात्रशाळा या कष्टकरी विद्यार्थ्यांचे जीवनच बदलून टाकू शकतात. रात्रशाळा काहींना वरदान ठरल्या आहेत. जसे रात्रशाळेतच शिकून मा. सुशीलकुमार शिंदे, मा. नारायण राणे हे राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री झाले, तर रात्रशाळेत शिकलेले काही जण सध्या उच्च पदावर कार्यरत आहेत.
मुंबई व उपनगरात अनेक रात्रशाळा कार्यरत आहेत. त्यातील जवळजवळ ९० रात्रशाळा या मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीमध्ये भरत आहेत. पूर्वी भाडे कमी होते, परंतु १९९८ पासून भाडेवाढ झाली. सन २००४ पासून वेतनेतर अनुदान बंद झाले. त्यामुळे भाड्याचा प्रश्न उभा राहिला. त्यावेळी असणाºया मुख्यमंत्र्यांनी यावरील मार्ग मोकळा केला होता, परंतु आता पुन्हा कोरोना महामारीच्या काळात मुंबई महानगरपालिकेने भाडेवाढ केल्याने थकित भाड्याचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. अनेक विद्यार्थी कामावर जात असल्याने त्यांचा अभ्यास पूर्ण करून घेणे हे शिक्षकांसाठी मोठे आव्हानात्मक काम होत असते.

मुंबई व उपनगर मिळून १८६ रात्रशाळा कार्यरत आहेत. त्यातील जवळजवळ ९० रात्रशाळा या मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीमध्ये भरत आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री मा. विलासराव देशमुख यांनी भाडेवाढीवर स्थगिती आणली. त्यामुळे रात्रशाळा वाचल्या, परंतु आता भाड्याच्या थकबाकीचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे.
रात्रशाळा ही संकल्पना फक्त महाराष्ट्रातच आहे. बाकीच्या राज्यांत ती दिसून येत नाही. रात्रशाळा ही काळाची गरज आहे. त्या टिकल्याच पाहिजेत. गरीब व अज्ञानामुळे जे तरुण शिक्षण प्रवाहातून बाहेर पडले किंवा नैसर्गिक आपत्ती व घरगुती अडचणीमुळे दिवसाच्या शाळेत जाऊ शकत नाहीत. वय वाढलेले असल्यामुळे मनात असूनसुद्धा शाळेत जाऊ शकत नाहीत, त्यांना पुन्हा शिक्षण प्रवाहात सहभागी होण्यासाठी रात्रशाळा हा उत्तम पर्याय आहे. मुक्तशाळा, मुक्त विद्यापीठे, बहिस्थ: परीक्षा यामुळे शाळाबाह्य तरुणांना शिक्षण प्रवाहात पुन्हा येता येते.

परंतु त्यामुळे दैनिक अध्यापन, वैयक्तिक मार्गदर्शन होत नाही. सर्वच विद्यार्थ्यांना घरी स्वयंअभ्यास करण्यासाठी पोषक वातावरण नसते. याच कारणासाठी रात्रशाळांना पर्याय नाही. रात्र शाळेत जाणारे विद्यार्थी हे अतिशय गरीब, गरजू व होतकरू कुटुंबातील असतात. घरच्या गरिबीमुळे व अन्य समस्येमुळे ते इतर विद्यार्थ्यांसारखे नियमित शिक्षण घेऊ शकत नाही. गरिबीमुळे त्यांना अर्धवेळ अथवा पूर्णवेळ नोकरी करून शिक्षण पूर्ण करता येते. अशा विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, पोषक-आहार, शिष्यवृत्ती यांसारख्या योजनांचा लाभ आवर्जून उपलब्ध होणे अत्यंत आवश्यक व गरजेचे आहे. रात्रीच्या शाळेत नोकर भरतीच्या देखील गंभीर समस्या आहेत. तिकडे मात्र मायबाप सरकार मुद्दाम कानाडोळा करते.
– बाळासाहेब हांडे/९५९४४४५२२२\\

About Editor

अवश्य वाचा

शिक्षक भरती घोटाळा

इंग्रजी माध्यमाच्या शाळेत विद्यार्थ्यांचे प्रवेश वाढायला लागल्यानंतर पालकांनी मराठी व इतर भाषिक शाळांकडे पाठ फिरवली. …