राणा दाम्पत्याची कुरघोडी

गेले दोन दिवस राज्यात अत्यंत हिडीस असे राजकारण पाहायला मिळाले. तसे गेली तीन वर्षे राज्यात आणि देशात महत्त्वाच्या प्रश्नांपेक्षा अशा गोष्टींचाच उहापोह केला जात आहे; पण हनुमान चालिसावरून जो सध्या प्रकार पाहायला मिळाला त्यातून खेद वाटल्याशिवाय राहत नाही. युवकांची किती शक्ती फालतू कामासाठी वाया जाते. तीच शक्ती विधायक आणि चांगल्या कामासाठी वापरण्याची बुद्धी का होत नाही?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्रीसमोर हनुमान चालिसाचे पठण करण्याचा इशारा देणाºया आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले. काही आवश्यकता होती का याची?, नवनीत राणा आणि रवी राणा यांना किती महत्त्व द्यायचे हे शिवसेनेने ठरवायला पाहिजे होते. अनावश्यक त्यांचे महत्त्व वाढवून काय साध्य केले?

रविवारी राणा यांच्या घरासमोर शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यावेळी अत्यंत गलिच्छ शब्दात शिवीगाळ केली गेली, हे प्रसारमाध्यमे, टीव्ही चॅनेलवरून सर्व जग पाहत होते. त्यामुळे नवनीत राणा यांची काहीच बेअब्रू झाली नाही, तर शिवसैनिकांबाबत जनतेचे मत खराब होण्याची शक्यता आहे, याचे भान राखायला पाहिजे होते. ज्याप्रकारे महिला शिव्या घालत होत्या, ओरडत होत्या त्यावरून नवनीत राणांची बदनामी नाही, तर शिवसेनेची होतेय हे लक्षात घेणे गरजेचे होते. त्यामुळे राणांच्या जाळ्यात शिवसेना अडकली की काय, असा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडला. एक नवरा-बायको, अपक्ष आमदार आणि खासदार आहेत, त्यांना इतके महत्त्व देण्याचे कारण काय होते? यामुळे काही काळ मुंबई आणि अमरावतीतील वातावरण तणावपूर्ण झाले होते. वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केला. शिवसेना महानगरप्रमुख पराग गुडधे यांच्या नेतृत्वात ५०० शिवसैनिकांचा मोर्चा राणा दाम्पत्याच्या घरावर धडकला होता. आंदोलकांनी आमदार व खासदार राणा मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. महिला शिवसैनिकांनी खा. राणा यांच्या घरावर बांगड्या फेकल्या. शिवसैनिकांनी हनुमानाचा मुखवटा घातला होता. जोरदार घोषणाबाजी करणारे शिवसैनिक आक्रमक होत असल्याचे बघून तेथे वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केला. पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतले आणि नंतर काही वेळाने सोडून दिले. यातून काय मिळाले? युवकांची, एखाद्या पक्षाची, संघटनेची एवढी ताकद वाया घालवायचे कारण काय होते? त्यापेक्षा स्वच्छतेच्या, विकासाच्या, लोकसहभागाच्या कामासाठी ही ताकद वापरली असती, तर बरे झाले असते. नवनीत राणा किंवा रवी राणा इतके महत्त्वाचे नव्हते.

पण शिवसैनिकांच्या या कृतीवर राणा दाम्पत्याने कुरघोडी करण्याचा चांगला प्रयत्न केला. हनुमान चालिसाचा पाठ करण्यासाठी येणाºया कोणत्याही पक्षातील कार्यकर्त्यांना अडवू नये, अशी विनंती आमदार राणा यांनी केली. ते म्हणाले की, जर हनुमान चालिसाचा पाठ करण्यासाठी व त्याचा मुख्यमंत्र्यांना आग्रह करण्यासाठी कोणी आमच्या विरोधात मुर्दाबादचे नारे देत असतील, तर त्याचे आम्हाला काहीच वाटणार नाही. मातोश्रीवर जाताना कोण अडवतो पाहू, बांगड्या या महिलांच्या सौभाग्याचे देणे आहे. मी सौभाग्यवती आहे. महिला शिवसैनिकांनी बांगड्या फेकण्याऐवजी मला दिल्या असत्या, तर मी त्या आदराने स्वीकारल्या असत्या. हनुमान चालिसाचा पाठ करण्यासाठी मी व युवा स्वाभिमान कार्यकर्ते मातोश्रीवर जाणारच आहोत. मीही मुंबईची मुलगी आहे. मला कोण अडवणार ते बघतेच. मी हिमतीने जाणार, मला कोणी अडवून दाखवावे, असे आव्हान देऊन नवनीत राणांनी कुरघोडी केली. शिवसैनिकांच्या आंदोलनाला उत्तर देण्यासाठी राणा दाम्पत्यानेदेखील तयारी केली होती. आमदार राणा म्हणाले की, आम्ही शिवसैनिकांचे स्वागत करण्यासाठी लाल कार्पेट टाकून तयार होतो. त्याचबरोबर आम्ही सरबत आणि फुलांचे बुकेही तयार ठेवले होते. परंतु, शिवसैनिक आलेच नाहीत. काही झाले तरी आम्ही मातोश्रीवर जाणारच आहोत.

या एकूणच घडामोडीतून काय साध्य झाले? आपल्या विरोधकांना, मुख्य प्रतिस्पर्ध्याला टक्कर देण्याऐवजी राणांसारख्या किरकोळ शक्तीच्या पाठीमागे शिवसेना का लागली याचे आश्चर्य वाटते.

खरंतर अशा प्रकारांकडे मोठे नेते असतात, ते कधीही लक्ष देत नाहीत. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोघांचेही उदाहरण देता येईल. मोदींवर इतकी टीका केली जाते, विरोधक काय वाटेल ते बोलत असतात, सोशल मीडियावर टीका होते; पण ते आपल्या कामातून त्याला उत्तर देतात आणि टीकेकडे दुर्लक्ष करून आपले काम करतात. त्या कामावर बाजी मारतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही कधी असल्या गोष्टींवर प्रतिक्रिया देत बसत नाहीत. आपले काम बरे आणि आपण बरे.

कधी-कधी अनुल्लेखाने मारणे योग्य ठरते. समोर भाजपसारखा बलाढ्य पक्ष असेल, तर त्यांच्यापुढे शक्तिप्रदर्शन करणे ठिक आहे. आपली ताकद दाखवणे योग्य ठरले असते. पण, अपक्ष असलेल्या राणा पती-पत्नीविरोधात एवढी ताकद खर्च करणे यातून त्यांचे महत्त्व वाढवले गेले आहे. त्यांना कोणी इतकी प्रसिद्धी दिली नसती, ती शिवसेनेमुळे मिळाली.

नवनीत राणा कशाच्या जोरावर इतके बोलत आहेत, त्यांच्यामागे कोण आहे? याचा शोध घेऊन त्यांच्याविरोधात शक्तिप्रदर्शन करणे गरजेचे होते. शिवसेनेला चांगल्या कामापासून भरकटवायचे, भडकवायचे हाच यांचा मुख्य उद्देश होता. तो त्यांनी साध्य केला; पण आपण सत्तेत असताना अशाप्रकारे आपण आपली ताकद वाया घालवली नाही पाहिजे, याचे भान आता ठेवावे लागेल.

उठसूट प्रत्येक गोष्टीला उत्तर देण्याची गरज नसते. गर्जेल तो पडेल काय, अशी आपल्याकडे म्हण आहे. मातोश्रीवर जाण्याची नवनीत राणांनी घोषणा केली. आल्या असत्या आणि त्यांनी म्हटली असती हनुमान चालिसा तिथे तर काय फरक पडला असता?, उलट त्यांनी येऊन पौरोहित्य केले समजून त्यांना दक्षिणा देऊन बोळवण केली असती, तर त्यांची जागा दाखवून देता आली असती. शांतपणे त्यांना उत्तर देण्याची संधी असताना आणि त्यांची सहजपणे जागा दाखवण्याची शक्यता असताना शक्तिप्रदर्शन करून काहीही साध्य झाले नाही. त्यांना मोठे केले गेले. त्यांना वाय सुरक्षा काय प्रदान केली गेली. सगळे कॅमेरे काय त्यांच्या घराभोवती जमा झाले. शक्ती शिवसेनेची आणि प्रसिद्धी नवनीत राणांची झाली. हे नको ते चित्र उभे राहिले. प्रत्येक गोष्टीला उत्तर देण्याची आवश्यकता नसते. टक्कर मोठ्यांशी दिली, तर त्यात मोठेपण दिसते. ती संधी गमावली असे वाटत आहे.

About Editor

अवश्य वाचा

उखाणा

सवाष्णीने आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पारंपरिक शैली ही महाराष्ट्राची ओळख आहे. लग्नात किंवा सण-समारंभात …