ठळक बातम्या

राजदंड वापरला नाही

राजदंड ही काय कल्पना आहे, याकडे आजपर्यंत गांभीर्याने न पाहिल्यामुळेच आपल्या राज्यात शैक्षणिक अराजक माजले आहे. जेव्हा एखाद्या राजाला राज्याभिषेक होई तेव्हा त्याच्या मस्तकावर राज्याभिषेक झाला की तो घोषणा करीत असे. ‘अहं दंडयामी.’ ‘मी शासक आहे. मी शास्ता आहे.’ सर्वांनी नियमाप्रमाणे वागले पाहिजे. जो कोणी राजधर्माव्यतिरिक्त नियमबाह्य वर्तन करेल त्याला दंड देण्याचा अधिकार मला या अभिषेकाने प्राप्त झाला आहे, असे तो ओरडून सांगत असे. याचवेळी दुसरा प्रश्‍न उपस्थित व्हायचा. तो म्हणजे जर राजाच चुकला तर?, राजाला शासन करण्याचे काम कोणाकडे?, ‘कोदंड यामी’. ‘कोदंड यामी?’ त्यावेळी हा राजदंड उपयोगाला यायचा. हा राजदंड हातात असतो तो कुलगुरूंच्या. गुरूपुढे सर्वच जण झुकतात. त्याप्रमाणे राजालाही या गुरूपुढे झुकावे लागायचे. हा राजदंड या कुलगुरूंच्या हातात असे, ते या राजदंडाचा धाक दाखवून राजाला योग्य मार्गावर आणत. आज या राजदंडाचा वापर होत नाही म्हणून शैक्षणिक अराजक माजले आहे.
गेल्या दीड वर्षात शिक्षणाची फार वाताहात लागली आहे. कुठे १ डिसेंबरपासून, तर कुठे १५ डिसेंबरपासून शाळा सुरू होणार आहेत. कुठे पंधरालाही शाळा सुरू होण्याची शक्यता नाही. अशा परिस्थितीत अभ्यासक्रम, शैक्षणिक वर्ष याची गणती कशी होणार आहे?, कोणताही शिक्षक यावर बोलत नाही. एक तृतीयांश विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश दिला जातो. आलटून पालटून शाळेत बोलावले जाते, पण अभ्यासक्रमाचे काय?, अभ्यासक्रम पूर्ण होणार नाही म्हणून पाठ वगळले जात आहेत. तो वगळलेला अभ्यासक्रम म्हणजे तेवढे विद्यार्थ्यांच्या माथी अज्ञान मारणे आहे. अशा परिस्थितीत सरकार जर शाळा सुरू करण्यास तयार नसेल, तर शिक्षकांनी नैतिक जबाबदारी म्हणून आम्ही विद्यार्थ्यांची जबाबदारी घेतो, पण त्यांना शिकू देत, असा आग्रह का करत नाहीत?, पण आजकाल शिक्षकांना आपला पगार सलामत आहे, तर का चिंता करायची अशी प्रवृत्ती वाढीस लागली आहे. पोटार्थी शिक्षकांमुळे आज शिक्षणाचे नुकसान होताना दिसत आहे. ते कमवण्यासाठी शिकवत आहे, ज्ञान देण्यासाठी नाहीत. म्हणूनच ते आज गुरू होऊ शकत नाहीत ही खंत आहे. आपल्या हातात हा राजदंड आहे, याची जाणीव गुरूंना नाही, म्हणून ही वाताहत होताना दिसत आहे.

आम्ही लोकशाही स्वीकारली, राजेशाही सोडली म्हणजे नक्की काय?, जे राज्य एकटा राजा चालवायचा ती त्याची श्रमविभागणी केली. त्याच्या जबाबदा‍ºयांची विभागणी करून ती विविध मंत्रिगणांवर सोपवली, पण शासक, राज्यकर्ते हे माणसेच आहेत ना?, या माणसांच्या हातून झालेल्या चुकांना राजदंड दाखवण्याचे काम कोणी करायचे?, गुरू, कुलगुरू यांचे राजव्यवस्थेत स्थान काय?, या राजदंडाला गंज चढत असल्यामुळेच अराजक माजले आहे. जेव्हा जेव्हा या देशात राजदंडाने राजाला मार्गावर आणले आहे, तेव्हा तेव्हा रामायण घडले आहे. जेव्हा राजदंड गंजलेला आहे, तेव्हा तेव्हा महाभारत घडलेले दिसून येते.
तमाम जनतेच्या रक्षणासाठी विश्‍वामित्रांनी एक यज्ञ आरंभला होता. तेव्हा विश्‍वामित्रांनी या यज्ञ रक्षणासाठी तुझा ज्येष्ठ पुत्र राम माझ्यासोबत पाठव, अशी विनंती अयोध्येचा राजा दशरथाला केली होती, पण पुत्रमोहाने त्याचे मन धाकधुक करू लागले. रामाऐवजी मीच रक्षणासाठी येतो, पण रामाची मागणी करू नका, असे दशरथाने सांगितले. इथे पुत्रप्रेम, मोह, स्वार्थ आला. राजाला तसे वागून चालणार नाही. त्यावेळी राजाची ही चूक दुरुस्त करण्यासाठी कुलगुरू वसिष्ठांनी राजदंड वापरला. ‘हे राजा, तुझे कर्तव्य संपूर्ण प्रजेचे रक्षण करणे आहे. स्वत:च्या पुत्राच्या रक्षणासाठी तू स्वत: यज्ञरक्षणासाठी जाईन म्हणतोस यात शौर्य काहीच नाही. तू चुकतो आहेस. समस्त प्रजाजन हे राजाचे पुत्र असतात. तू एका पुत्राचे रक्षण करण्यासाठी धडपडतो आहेस हा अधर्म आहे. राजधर्माला सोडून ते वागणे नाही. विश्‍वामित्र दुबळे आहेत, म्हणून तुझ्याकडे मदतीची याचना करीत नाहीत. तुला त्यांच्याबरोबर रामालाच पाठवावे लागेल.’ असे राजदंड दाखवून वसिष्ठांनी सांगितले तेव्हा दशरथ ताळ्यावर आला. पुढचे सगळे व्यवस्थित झाले आणि राम घडला.

राजदंडाचा वापर कुलगुरूंनी केला नाही तर महाभारत घडते. भर सभेत द्रौपदीला पणाला लावली जाते, तिला वस्त्रहीन करण्यासाठी तिच्या उत्तरीयाला हात घातला जातो. हा एवढा अधर्म घडत असतानाही कृपाचार्य कुलगुरू बघत बसतात. मनात आणले असते, तर हा अनर्थ ते थांबवू शकले असते. येथेही पुत्रप्रेमाने आंधळा झालेल्या धृतराष्ट्राला राजदंड न दाखवल्यामुळे संपूर्ण कुरूवंशाचा नाश झाला. हा राजदंड वापरण्याचे सामर्थ्य असूनही तो वापरला जात नाही हेच दुर्दैव आहे.
आज शिक्षणाच्या बाबतीत चुकीचे निर्णय होत आहेत. मुलांच्या भवितव्याचा प्रश्न आहे. अशा परिस्थितीत कुलगुरू, गुरू, शिक्षकवर्ग सुस्त होऊन गप्प बसला आहे, ही धुंदी या देशात फार वाईट आहे. कारण आज चांगले संस्कार करण्यासाठी शिक्षकवर्गच अस्तित्वात नाही. सगळे कागदोपत्री शिक्षक आहेत. शाळा सुरू न करण्याबाबत, परीक्षांबाबत चुकीचे निर्णय होत आहेत. या मुलांचे भविष्यात काय होणार हा प्रश्न असताना कोरोनाची भीती घालून मुलांना घरात बसवले जात आहे. ही मनातील भीती घालवण्याचे काम करण्याची गरज आहे. कोणताही रोग हा अगोदर मनाला होतो. मन खंबीर तर कोणताही रोग शिवणार नाही. पण घाबरून घरात बसण्याचे शिक्षण आज मिळते आहे. हे निर्णय चुकीचे आहेत हे माहीत असूनही शिक्षकांनी त्या निर्णयाला विरोध का केला नाही?, आजचा शिक्षक हा शिक्षक किंवा गुरू न राहता तो नोकर, गुलाम झाला आहे. पगारासाठी पोटार्थी झाला आहे. त्याला स्वत:च्या हक्काबाबत जेवढी जाणिव आहे, तेवढी समाजाप्रती नाही ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. आपल्या हातात राजदंड असूनही धुंद अवस्थेमुळे त्यांनी त्याचा वापर केला नाही, त्यामुळे भावी पिढीचे आयुष्य जुगाराला लावले, तरी हे लोक बघत बसले. शिक्षकाचे व्रत असते. ते आनंदाने शिकवायचे असते. मी डॉक्टर होईन, इंजिनीअर होईन, अमुक होईन असे अनेकजण म्हणतात, पण मी शिक्षक होईन असे कोणी म्हणत नाही. मग काही काम मिळाले नाही म्हणून शिक्षकाची नोकरी करायला आलेले आहेत हे दिसून येते. दुसरी नोकरी मिळाली असती, तर ती केली असती. पैशांसाठी कोणताही धंदा करू अशा वृत्तीचे शिक्षक या राज्यात पेरले गेले. त्यामुळे राजकारणी लोकांचे फावत गेले. अशा शिक्षकांचा विद्यार्थ्यांनी आदर करावा, अशी अपेक्षा बाळगणेही चुकीचे आहे. आम्हाला अशैक्षणिक कामे नकोत, आम्हाला जनगणनेची कामे नकोत, निवडणुकीची कामे नकोत असे ओरडून सांगणा‍ºया शिक्षकांनी सरकारला का नाही ठणकावून सांगितले की, तुम्ही हे चुकीचे करीत आहात. एकाही शिक्षक संघटनेने याला विरोध का केला नाही? शाळा पूर्ववत सुरू करा, या मागणीसाठी शिक्षक आग्रही राहिले असते, तर आज दहावी, बारावीचे निकाल मूल्यांकनावर आधारित लावावे लागले नसते.

– प्रफुल्ल फडके/ बिटवीन द लाईन्स
9152448055\

About Editor

अवश्य वाचा

शिक्षक भरती घोटाळा

इंग्रजी माध्यमाच्या शाळेत विद्यार्थ्यांचे प्रवेश वाढायला लागल्यानंतर पालकांनी मराठी व इतर भाषिक शाळांकडे पाठ फिरवली. …