राजकारणात आणि निवडणुकीत भाषणबाजी करताना थोडे फार विनोदाचे ज्ञान असणे आवश्यक असते. प्रसंगावधान आणि स्थानिक घटनांची माहिती असणे हे महत्त्वाचे असते. आपल्याकडे जेवढे यशस्वी झालेले नेते आहेत, त्यांच्याकडे या गोष्टीचे भान होते, म्हणून ते यशस्वी झाले; पण भाषाकौशल्याचा प्रचंड वारसा असणाºया महाराष्ट्रात सध्या चांगले वक्तृत्व असलेले नेते नाहीत हे दुर्दैव म्हणावे लागेल. आज ऐकावे असे भाषण फारसे मिळत नाही. अलीकडच्या काळातील भाषणेही आरोप-प्रत्यारोप आणि सूड काढण्याच्या प्रवृत्तीने केलेली दिसतात. परस्पर विरोधी पक्ष हे एकमेकांचे शत्रू असल्याप्रमाणे वक्तव्ये करतात. त्यामुळे परस्परांवर विनोदाने कुरघोडी करण्याची राजकीय सभ्यता हरपताना दिसत आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात पन्नास वर्ष अधिराज्य गाजवलेल्या शरद पवार यांनीही आपली विनोद बुद्धी अनेकवेळा वापरली, म्हणून ते यशस्वी झाले. २०१४च्या निवडणुकीत शाई पुसून येण्याचा सल्ला देण्याचा त्यांनी केलेला विनोद अंगलट आला असला, तरी अनेकवेळा त्यांचे विनोद हे मिश्किल आणि मार्मिक टिप्पणी करणारे असतात. राजकारणाच्या आणि नेहमीच्या टिकाटिप्पणीत ही सभ्यता, विनोद बुद्धी जाऊन त्रासिक राजकारण सुरू झाल्याचे दिसते, म्हणून पूर्वीच्या सभ्यतेवर नजर मारणे आवश्यक आहे.
बॅ. अ. र. अंतुले यांना मुख्यमंत्री पदावरून हटवल्यानंतर अचानकपणे बॅ. बाबासाहेब भोसले यांचे नाव मुख्यमंत्री म्हणून आले. हा सगळ्यांना धक्काच होता, कारण अंतुले म्हणजे शंभर टक्के काँग्रेसनिष्ठ, इंदिरा गांधींच्या विश्वासातले होते; पण त्यांना ते प्रतिभा प्रतिष्ठान भोवले. त्यामुळे सत्तेवरून जावे लागले. त्यामुळे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून आता काँग्रेस कोणाला पाठवणार असा प्रश्न होता. जसा प्रश्न अशोकराव आदर्श प्रकरणात गेल्यानंतर होता तसाच तो प्रकार होता. यावेळी शरद पवार विरोधी पक्षात होते. काँग्रेसमध्ये नव्हते. जेव्हा बाबासाहेब भोसले यांचे नाव आले, तेव्हा शरद पवारांना काहींनी विचारले की, बाबासाहेब भोसले कसे काय मुख्यमंत्री झाले हो? तेव्हा शरद पवारांनी अत्यंत मार्मिक उत्तर दिले होते. ते म्हणाले की, काँग्रेस श्रेष्ठींकडून आदेश होता की, आता फक्त निष्ठावान काँग्रेसवालाच नको आहे, तर असा आमदार हुडका की त्याच्या नावात, आडनावात, किमान पत्त्यामध्ये इंदिरा, गांधी, नेहरू अशांपैकी काहीतरी असेल. शे दीडशे आमदारांच्या फाइली काँग्रेस निरीक्षकांनी चाळल्या; पण एकाच्याही नावात, आडनावात, पत्त्यात कुठे गांधी, नेहरू सापडेना. याला अपवाद ठरले ते बाबासाहेब भोसले, कारण त्यांच्या पत्त्यामध्ये नेहरूनगर, कुर्ला असा उल्लेख होता. त्यामुळे त्यांना हे मुख्यमंत्री पद मिळाले आहे. शरद पवारांच्या या वक्तव्याने सगळे जण खो-खो हसत होते.
आपल्या भाषणात आणि सभेत विनोदाची पेरणी असल्याने सभा जिंकता येते. अशा सभा जिंकण्याचे कौशल्य पुण्यातील साडेतीन शिरोमणी म्हणून जे राजकारण करत होते त्या जयंतराव टिळक, बॅ. विठ्ठलराव गाडगीळ, ना. ग. गोरे यांच्याकडे होते. जगन्नाथराव जोशी अशाच प्रकारे वार परतवून लावत होते. या तालमीतच शरद पवार अभ्यास करत होते. त्यामुळे भाषणामध्ये विनोदाची नेमकी पेरणी कशी करायची याची त्यांना चांगली जाण आहे.
माजी शिक्षणमंत्री रामकृष्ण मोरे आणि शरद पवार यांच्यात विळा भोपळ्याचे नाते होते. एकाच पक्षात राहून असे मतभेद आणि मनभेद असता कामा नये आणि पक्षसंघटना वाढवली पाहिजे यासाठी शरद पवारांनी पुढाकार घेतला. आळंदीमध्ये मनोमिलनाचा कार्यक्रम ठरवला. या मनोमिलनाच्या कार्यक्रमात रामकृष्ण मोरे आपल्या भाषणात म्हणाले होते की, शरद पवार आणि आमच्यात असलेले सगळे मतभेद आम्ही याक्षणी इंद्रायणीत बुडवत आहोत. त्यावर शरद पवार म्हणाले, हे मतभेद इंद्रायणी सोडून अन्य कुठेही बुडवा, कारण इंद्रायणीत बुडवलेली तुकोबाची अभंगगाथा जशी वर येते तसे ते पुन्हा वर येतील, म्हणून दुसºया कुठल्याही नदीत बुडवा पण इंद्रायणीत नको. त्यामुळे सगळे उपस्थित अतिशय दाद देऊन हसले आणि खºया अर्थाने मनोमिलन झाले. रामकृष्ण मोरे हे तुकारामांचे वंशज होते, त्यामुळे हा पंच तिथे चपखल बसला होता.
शरद पवारांकडे कृषी खाते होते याचे कारण ते शेतीवर अधिकारवाणीने बोलतात. त्यामुळे आपल्या भाषणात ते नेहमी शिवसेनेची खिल्ली उडवताना शेतीची उदाहरणे देतात. प्रमोद नवलकर जेव्हा शिवसेनेचे युतीच्या काळात मंत्री होते, तेव्हा सातारा जिल्ह्याच्या दौºयावर आले होते. तेव्हा तिथल्या शेतकºयांनी त्यांना भरपूर फिरवले. एक जण म्हणाला, साहेब यंदा भुईमुगाचं पीक मायंदाळ आलं आहे. या मायंदाळ शब्दाचा अर्थ काही केल्या नवलकरांच्या लक्षात आला नाही. त्यांनी कोणाला तरी विचारले की, मायंदाळ म्हणजे नेमके काय? तर एकाने सांगितले की, मायंदाळ म्हणजे भरपूर. म्हणून ते पुन्हा भुईमुगाच्या शेताकडे गेले. तर त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. हा शेतकरी सांगतो आहे, भुईमूग मायंदाळ आला आहे आणि आपल्याला या शेतातील भुईमुगाच्या रोपट्यांना एकही शेंग दिसत नाही. तेव्हा शेतकºयाने सांगितले की, भुईमुगाच्या शेंगा या जमिनीत येतात, झाडावर नाही. शरद पवार नवलकरांचा हा किस्सा अनेक भाषणातून सांगायचे.
शरद पवार, मनोहर जोशी, बाबासाहेब भोसले, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे वाचनाची प्रगल्भता होती. त्यामुळे हे नेते कायम अपडेट असायचे. सातारा जिल्ह्यात नायगांवला सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचे उद्घाटन झाले, तेव्हा सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री होते. शरद पवार खासदार म्हणून आले होते. त्यावेळी आपल्या भाषणात सुशीलकुमार शिंदे यांनी आपण पवार साहेबांचा हात धरून राजकारणात आलेलो आहोत, असे सांगताना पवार आणि आपल्यात काय साम्य आहे हे सांगण्यास सुरुवात केली. ते म्हणाले आम्ही दोघांनीही पळून जावून लग्न केलेले आहे. पळून जावून लग्न करणाराही मुख्यमंत्री होऊ शकतो. यावर प्रचंड हशा मिळाला; पण शरद पवारांनी नाक मुरडले, कारण याठिकाणी सुशीलकुमार शिंदेंचे वक्तव्य चुकीचे होते आणि त्यातून वेगळा संदेश जाण्याची शक्यता होती.
राजकारणातील गंभीर प्रसंग टाळण्यासाठी विनोदाच्या शिडकाव्याने वातावरण हलके करता येते. माणसे जोडता येतात हे मात्र खरे. राजकारणात टवाळकी करण्यापेक्षा विनोदाची पेरणी करून गटतटातील दुभंगलेल्या भिंती सांधता येतात. सभेतील प्रेक्षकांची मने जिंकता येतात. बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री झाल्यावर एका प्रशासकीय अधिकाºयाने त्यांची अॅपॉइंटमेट घेतली होती. त्यांनी दिलेल्या वेळेत ते अधिकारी हजर होते. आपल्या कामात अत्यंत कुशल असलेल्या या अधिकाºयाचे अडनाव वकील होते; पण बाबासाहेब आपल्या केबिनमध्ये काही लोकांशी खूप वेळ गावाकडच्या गप्पा मारत बसले होते. शेवटी त्यांनी पीएकडे चिठ्ठी पाठवली. पीए म्हणाला, वकीलसाहेब बाहेर बराचवेळ वाट पाहत आहेत. त्यावर बाबासाहेब म्हणाले की, ते वकील असले तरी मी बॅरिस्टर आहे. त्यामुळे रागावलेले वकिलांनीही कपाळाला हात लावला आणि राग सोडला.
प्रफुल्ल फडके/ बिटवीन द लाईन्स
9152448055\
अवश्य वाचा
शिक्षक भरती घोटाळा
इंग्रजी माध्यमाच्या शाळेत विद्यार्थ्यांचे प्रवेश वाढायला लागल्यानंतर पालकांनी मराठी व इतर भाषिक शाळांकडे पाठ फिरवली. …