राजकारणातील आयपीएल

सध्या आयपीएलचा महोत्सव सुरू आहे. तसाच तो राजकारणातही सुरू आहे. आता दरवर्षी आयपीएलच्या जत्रेची सर्वांना सवय झालेली आहे, त्याचप्रमाणे दरवर्षी कुठे ना कुठे तरी होणा‍ºया निवडणुका, त्यातील शक्तीप्रदर्शन, हार-जीत यावरून टीकेचे राजकारण सुरू होते ते म्हणजे राजकीय आयपीएल मधले षटकार, चौकार असतात. पण काही काही चौकार आणि षटकार हे अत्यंत फुसके बार असल्याप्रमाणे असतात. म्हणजे एखाद्याने लांब उंचीचा, जास्त अंतराचा षटकार मारला, तर त्याचे कौतुक होते, पण एकाच प्रकारचा शॉट सतत मारला तर त्याचे फारसे कौतुक नसते किंवा जेमतेम रडतखडत सीमापार झालेल्या चौकाराचेही फारसे कौतुक नसते.

राजकारणातही आज तसेच झालेले आहे. आयपीएलच्या जशा वेगवेगळ्या राज्यांच्या टीम आहेत, तशाच राजकारणाच्याही आहेत. किंग्ज इलेव्हन पंजाब, रॉयल चॅलेंजर्स राजस्थान, मुंबई इंडियन्स, कोलकाता नाइट रायडर्स, दिल्ली कॅपीटल वगैरे वगैरे. यात यावर्षी प्रथमच गुजरात आणि उत्तर प्रदेशच्या टीम दाखल झालेल्या आहेत. म्हणजे वर्षाअखेरीस होणा‍ºया गुजरात निवडणुका आणि नुकत्याच झालेल्या उत्तर प्रदेश निवडणुकीतील हिरो मोदी आणि योगी यांच्या टीम आता आयपीएलमध्ये आलेल्या आहेत. उत्तर प्रदेशच्या टीमने चांगला परफॉर्मन्स करून हम किसीसे कम नहीं हे धोनी, जडेजाच्या टीमला दाखवून दिल्याने सर्वांनीच आश्चर्याने तोंडात बोटे घातली, पण नाव बदलले तरी फक्त त्यातील खेळाडू आपले भारतीय नामांकीतच आहेत हे लक्षात घेतले पाहिजे.

राजकारणात वेगळे काय आहे? कोण कधी कोणत्या पक्षात असेल ते सांगता येत नाही. तसेच आयपीएलच्या लिलावात कोण कुणाला विकत घेईल सांगता येत नाही. तो तर भांडवलदारांचा खेळ झालेला आहे. राजकारणातही तसेच होते. निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच असे लिलाव होतात आणि नेते आयात-निर्यात करण्याच्या नावाला पक्ष प्रवेशाचे गोड लेबल लावले जाते. या झाडावरचे कावळे त्या झाडावर जातात आणि त्या झाडावर गेल्यावर पहिल्या पारावर आपली पिसे आणि विष्ठा टाकतात.

ज्या पाराने आणि झाडाने आपल्याला आधार दिला त्याचाही त्यांना विसर पडलेला असतो. पण आयपीएलच्या जशा आठ-दहा टीम आहेत, तसेच राजकाणातही असेच काही गट आहेत. अधून-मधून खांबखांबोळीप्रमाणे वेगवेगळे खांब बदलण्याचे काम ते करत असतात. कधी अ चा ब होतो, कधी ब चा क होतो. बाकी काही फरक पडत नाही.

त्यामुळे एखाद्या निवडणुकीत कोणी हरला, पराभूत झाला की, ज्याच्यामुळे आपण पराभूत झालो त्या पक्षाला भाजपचे लेबल लावायचे आणि अमूक एक पक्ष भाजपची बी टीम आहे असे म्हणायचे. अशा भाजपच्या आणि काँग्रेसच्या किती बी टीम झाल्या आहेत याचा अंदाजच येत नाही.

नुकत्याच उत्तर प्रदेशातील आणि चार राज्यांतील निवडणुकीत भाजपला घवघवीत यश आल्यानंतर उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीचा पराभव हा एमआयएममुळे झाला असा साक्षात्कार काहींना झाला. विशेषत: महाराष्ट्रात राष्ट्रवादी आणि शिवसेना, काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी एमआयएम ही भाजपची बी टीम आहे असे बोलायला सुरुवात केली. त्यामुळे अग्निपरीक्षा देण्यासाठी एमआयएमच्या जलील यांनी आम्ही बी टीम नाही हे सिद्ध करण्यासाठी आम्हाला महाविकास आघाडीत घ्या, अशी विनंती केली, तेव्हा या तिन्ही पक्षांनी कानावर हात ठेवले आणि एमआयएमला दरवाजे बंद केले.

यापूर्वी मागच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन विकास आघाडी ही भाजपची बी टीम आहे असे बोलले गेले होते. त्यापूर्वी आम आदमी पार्टी ही भाजपची बी टीम आहे असे बोलले गेले होते. अशा किती बी टीम भाजपच्या आहेत? भाजप म्हणजे काय बी टीम जनता पार्टी आहे का?

साधारण दहा-बारा वर्षांपूर्वी २००९च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत रिडालोस हा एक प्रयोग झाला होता. रिपब्लिकन डावी लोकशाही आघाडी नावाचा एक गट सेना-भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधात आल्यावर दोन्ही युती आणि आघाडींनी ही परस्परांची बी टीम आहे, असा दावा केला होता. वास्तविक त्या रिडालोसला काही यश आले पण नाही. २००९ला सेना-भाजपची विधानसभेची सत्ता येणे शक्य झाले नाही ते मनसेने त्यांचे १४ आमदार निवडून आणल्यामुळे आणि अनेक ठिकाणी त्यांच्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादीचा फायदा झाला. त्यावेळी मनसे ही काँग्रेस, राष्ट्रवादीची बी टीम म्हणून चर्चा झाली होती.

आता मात्र हाच महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष जेव्हा आपला गुढी पाडवा मेळावा घेतो आणि सरकारवर टीका करतो, तेव्हा त्यांना भाजपची बी टीम असे प्रमाणपत्र दिले जाते. असे टीम ए, टीम बी, टीम सी असे करत करत टीम झेडपर्यंत अनेक पक्ष आणि पार्ट्या येतील आणि आपल्या हातचे यश घेऊन जातील. त्यावेळी त्यांना दोष देण्यापेक्षा राजकीय पक्षांनी आपली कामगिरी सुधारणे हेच योग्य आहे.

त्याच्यामुळे मी पडलो, त्यांनी आमची मते खाल्ली असे रडगाणे गाण्यापेक्षा आपणच आपली कामगिरी इतकी चांगली केली पाहिजे की, मते हालणार नाहीत हे या पक्षांच्या लक्षात का येत नाही.

आमच्या बॅट्समननी बॅटिंग चांगली केली नाही, म्हणून आपण हारलो असे न मानता आमच्या गोलंदाजांनी विकेट घेतल्या नाहीत, म्हणून रडायचे. अम्पायरचा निर्णय चुकीचा होता म्हणून दोष द्यायचा. हे प्रकार खेळात चालतात तेच राजकारणात होताना दिसत आहेत. क्रिकेटचा खेळ जसा लिलाव आणि जुगार आहे, तसेच भारतीय राजकारण हे पण जुगार होताना दिसत आहे.

त्यामुळे आपल्या देशातही आता निवडणुका घेण्यापेक्षा टेंडर काढावे आणि राज्या चालवायला द्यावे. निविदेमध्ये जसे अमूक एक कामाचे वर्णन असते, तसे पाच वर्षांत ही कामे केली पाहिजेत, त्यासाठी निविदा मागवा. मतदारांना वेठीस धरायला नको की, ए टीम, बी टीम म्हणून टीका नको. हवे तर ठेकेदारांसाठी रिंग करा आणि एका कोणाला तरी सत्ता द्या, पण त्या पाच वर्षांच्या काळात निविदेत सांगितलेली सर्व कामे करून द्या. ती नाही जमली तर त्या पक्षांना काळ्या यादीत टाका.

About Editor

अवश्य वाचा

उखाणा

सवाष्णीने आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पारंपरिक शैली ही महाराष्ट्राची ओळख आहे. लग्नात किंवा सण-समारंभात …