राइट टू डिस्कनेक्ट म्हणजे काय? आपण याचा अर्थ थोडासा समजावून घेऊया. कार्यालयीन वेळेनंतर काम नाकारण्याचा अधिकार! कॉर्पोरेट कार्यालयातील वरिष्ठांच्या कधीच न संपणाºया अपेक्षांच्या ओझ्याखाली जगभरातील कर्मचारी दडपले गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या जीवनातील स्वत:चा वेळ त्यांच्यापासून हिरावला जात आहे. कर्मचारी अनेक वेळेला कार्यालयीन वेळेनंतरही इ-मेल, फोन कॉल्सना उत्तर देताना दिसून येतात. त्यामुळे त्यांच्या वैयक्तिक व सामाजिक आयुष्यावर याचा परिणाम होतो.
दीर्घकाळपर्यंत कामाची हीच पद्धत असल्यास कर्मचाºयाला तणाव, निद्रानाश जाणवू शकतो. प्रसंगी त्याची उत्पादकता कमी होते, तसेच त्याच्या मानसिक, शारीरिक आरोग्यावर दूरगामी परिणाम होऊ शकतो. इंटरनेट, मोबाइल व सोशल मीडिया या सर्वांमुळे प्रत्येक कर्मचारी हा सतत आॅफिसमधील वरिष्ठांच्या संपर्कात राहत असतो. त्यामुळे कर्मचाºयाला घरी आल्यावर अथवा सुट्टी घेऊन बाहेर गेला, तरी कामाच्या फोन कॉल्सना, मेसेजना उत्तर देणे आवश्यक असते. भारतातील ३४ टक्के कर्मचाºयांनी सांगितले की, आॅफिसचे काम व वैयक्तिक गरजांचा समतोल न साधता आल्यामुळे ताणतणावांना सामोरे जावे लागत आहे.
आपल्या देशात मोठ्या प्रमाणातील बेरोजगारीमुळे मिळालेली नोकरी टिकवून ठेवणे हीच कर्मचाºयांची प्राथमिकता तयार झालेली आहे. कर्मचाºयांच्या याच असुरक्षिततेच्या भावनेमुळे काही कंपन्या अतिरिक्त काम करून घेतात. आपल्याला कोठल्याही कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, अथवा दंड द्यावा लागेल याची भीती वाटत नाही. भारतीय कर्मचारी हा सर्वाधिक लवचिक, क्षमतेपेक्षा अधिक काम करणारा आणि कमी मोबदल्यात राबणारा आहे, असे आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने अधोरेखित केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नुकतेच हे विधेयक संसदेच्या पटलावर मांडले आहे. यापूर्वी देखील २०१८मध्ये त्यांनी पहिल्यांदा हे विधेयक लोकसभेत मांडले होते. कार्यालयीन वेळेनंतर कर्मचारी कोणत्याही कार्यालयीन संवादाला म्हणजेच फोन, मेसेज, इ-मेल यांना उत्तर देण्यास बांधील नसेल, अशी तरतूद यामध्ये केलेली आहे. काम आणि व्यक्तिगत आयुष्यात समतोल राखणे, कर्मचाºयांची गुणवत्ता, आरोग्य टिकवून ठेवणे हा या विधेयकाचा हेतू आहे. कारण अनेक कंपन्यांची अशी भूमिका असते की, जास्त काम केल्यामुळे उत्पादकतेत वाढ होते, परंतु अतिरिक्त कामामुळे उत्पादकतेत घट होते असे संशोधनातून समोर आले आहे. यामुळेच कदाचित परदेशात पाच दिवसांच्या आठवड्याऐवजी चारच दिवसांचा आठवडा असा कामात बदल केला जात आहे.
आपल्याकडील कर्मचाºयांनी देखील कार्यालयीन कामाच्या वेळी १०० टक्के काम केले, तर कामाचा ताण येणार नाही. सरकारी नोकरीत असलेल्या व्यक्तींनी तर आपल्या कामाप्रती निष्ठा ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा आजही संगणक युगात लोकांना सरकारी काम व सहा महिने थांब असे म्हणण्याची वेळ येईल.
े बाळासाहेब हांडे े/ ९५९४४४५२२२\\