मुंबईवर पाकिस्तानने घडवून आणलेल्या दहशतवादी हल्ल्याला कालच १३ वर्षे पूर्ण झाली. त्याच संधीचा फायदा घेत काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी आपल्या पुस्तकातील या हल्ल्याच्या संबंधित भाष्य करणारे प्रकरण प्रसिद्ध केले. कारण नसताना वाद निर्माण करण्याची विकृतीच काँग्रेस नेत्यांना जडली आहे, त्यातलाच हा एक प्रकार.
देशाच्या केंद्रीय सत्तेत २०१४ साली भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आल्यावर आपला प्रमुख राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या काँग्रेस पक्षाचे विसर्जन करण्याचा पणच भाजप नेत्यांनी बोलून दाखवला होता. भाजपने देशभर तसा प्रयत्नही करून पाहिला, मात्र काँग्रेस पक्षाची पूर्वपुण्याई एवढी मोठी आहे की, कुंथत कुंथत का होईना तो पक्ष आपले अस्तित्व राखून उभा आहेच.
तथापि, जे कार्य राजकीय सत्तेच बळ प्राप्त झालेला भारतीय जनता पक्ष करू शकला नाही ते काँग्रेस पक्षाच्याच नेत्यांनी आपल्या हातात घेतल्याने काँग्रेसला विसर्जित करण्याचे भाग्य भाजपला मिळणे शक्य नाही, असे सध्यातरी वाटतेय. कारण काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी आमचा पक्ष आम्हीच संपवू भाजपला कशाला त्रास?, असा स्व: नष्टतेचा प्रश्न उपस्थित करून काँग्रेसला बुडवायचे कार्य जोमात-जोरात सुरू केलेय. सत्तेला हपापले आणि असंतुष्ट भावनेने व राजकीय भवितव्याच्या असुरक्षतेने पछाडलेले काँग्रेस नेते म्हणजे ‘कुºहाडीचा दांडा गोतास काळ’ याप्रमाणे व्यक्त होऊ लागल्याने काँग्रेसला बाह्य राजकीय शत्रंूची गरजच उरली नाही.
२०१४ साली काँग्रेस पक्ष सत्तेपासून दुरावला. तेव्हापासून ‘सत्तेचे सुख हेच राजकारणाचे मुख’ असा अर्थ गृहीत धरून राजकारण करणारे काँग्रेसी राजकारणी खुळावले आणि आपल्याच पक्षाच्या मागील सत्ताकारणाच्या चुका काढत पक्षाच्या प्रमुख नेतृत्वालाच दोषी करार देते झाले. अशा प्रकारे स्वत:च्याच हातांनी स्व:पक्ष बुडविण्याची अजब कला फक्त संधीसाधू व सत्तापिपासू काँग्रेस पक्षाचेच नेते करू जाणोत, पण फक्त त्यांना दोष देऊन तरी कसे चालेल. सत्ताकारणाचा माज अंगात शिरलेल्या व सत्तेची धोतरे व लुंग्या परिधान करून हिंदू समाजावर विनाकारण आगपाखड करणाºया दिग्विजय सिंह, पी. चिंदबरम यांसारख्या नेत्यांना काँग्रेस श्रेष्ठींनी तेव्हाच आवरले असते, तर आजची वाचाळ पिलावळ तयारच झाली नसती.
त्यामुळेच सत्तेचे कवच नष्ट होताच एक-दोन नव्हे, तर ‘जी-२३’ असा पक्षांतर्गत गट बनविणारे काँग्रेस नेते पक्षाच्या नेतृत्वालाच मोक्याच्या क्षणी खिंडीत गाठण्याचे धाडस करू लागले. तसे पाहिले तर काँग्रेस पक्षाचे नेते अभ्यासू व हुशार असल्याने कुठल्याक्षणी भात्यातला कुठला बाण काढून नेम धरायचा याची त्यांना पूर्ण जाणीव असते.
याचा प्रत्यय पुन्हा एकदा काँग्रेस नेत्यांनी देशाला दाखवून दिलाच. नोव्हेंबर महिन्याच्या २६ तारिखला म्हणजे मुंबईवर पाकिस्तानने घडवून आणलेल्या २६/११च्या हल्ल्याचा स्मृतिदिन. यावर्षी या हल्ल्याला १३ वर्षे पूर्ण झालीत. बरोबर तीच संधी साधत काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी आपल्या पुस्तकातील २००८ साली मुंबईच्या घटनेवर भाष्य करणारे प्रकरण प्रसिद्ध करून योग्य राजकीय वेळ साधत आपल्याच पक्षाच्या नेतृत्वाला, तत्कालीन पंतप्रधानांना आरोपाच्या पिंजºयात उभे करत भारतीय जनता पक्षाला राजकीय टिकेचा मालमसाला पुरविण्याचे काम केले.
भारतीय युवा काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेले आणि केंद्रीय राज्य मंत्री पद उपभोगलेले मनीष तिवारी हे खासदार आहेत. त्यामुळे त्यांनी ही केलेली कृती अजाणपणाची नसून काँग्रेस पक्षाला व नेतृत्वाला बदनाम करत भाजपात आपले पुनर्वसन व्हावे या हेतूनेच केले यात शंकाच नाही. मुळातच त्यांचे हे पुस्तक अजून प्रकाशित व्हायचे आहे, असे असताना मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या स्मृतिदिनाच्या तीन दिवस अगोदर माध्यमांना त्याच विषयावर भाष्य करणारे प्रकरण प्रसिद्धीसाठी देण्याचा विचार म्हणजे त्याचे शंभर टक्के राजकारण व्हावे हाच प्रमुख हेतू मनीष तिवारी यांच्या मनात होता.
‘मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर कठोर कारवाई करायला हवी होती. संयम हे कमजोरपणाचे लक्षण आहे’ असा सूर तिवारी यांनी आपल्या पुस्तकात लावलाच. त्या मागून त्यांनी काँग्रेस पक्ष व तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग सरकारला लक्ष्य केलेय. २००८ साली पाकिस्तानने मुंबईवर दहशतवादी हल्ला घडवून आणल्यानंतर प्रत्येक भारतीयाची हीच भावना होती, यात शंका नाही. पण त्यावर १३ वर्षांनी तिवारीने केलेले भाष्य त्यांचे राजकीय अप्रामाणिकपणा सिद्ध करते.
त्याचे प्रमुख कारण म्हणजे त्यावेळी तिवारी काँग्रेस पक्षात सक्रिय होते. त्यांना यावर मुक्तभाष्य करता आले असते. दुसरी बाब म्हणजे या हल्ल्याची खंत त्यांच मन पोखरत होती, तर मग त्यांनी पंतप्रधान मनमोहन सिंगच्या मंत्रिमंडळात २०१२ साली समाविष्ट व्हायला नकार द्यायला हवा होता, पण त्यावेळी व तब्बल १३ वर्षे २६/११च्या घटनेवर तिवारी काही बोलल्याची नोंद नाही. राहिला प्रश्न काँग्रेसच्या निर्णयाचा तर त्या हल्ल्यानंतर २००९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला अधिक मते मिळाली व काँग्रेस पुन्हा सत्तेतही आली. ज्या मुंबईवर हा हल्ला झाला, त्याच मुंबईतील जनतेने काँग्रेस पक्षाला भरभरून मतदान केले. भारतीय मतदारांच्या या मनोवृत्तीवर तिवारींनी या पुस्तकात घाव घातला असता, तर तो नक्कीच चिंतनाचा विषय ठरला असता, पण काँग्रेस संपवणे हा काँग्रेस असंतुष्ट नेत्यांचा अजेंडा असल्याने मनीष तिवारी यांनी त्यासाठी मुंबईवरील हल्ल्याचा आधार घेतला एवढेच.
विजय सामंत/ दखल