आजकाल समाजामध्ये अस्थिरता, असमाधान, असंतुष्टता, अविचार यांचे साम्राज्य पसरलेले आपण पाहत आहोत. पूर्वी ‘विद्वान सर्वत्र पूज्यते’ असे म्हटले जात होते, परंतु एकविसाव्या शतकात ‘धनवान सर्वत्र पूज्यते’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जेव्हा समाजाची ज्ञानलालसा संपून धनलालसा वाढीस लागते, तेव्हा समाजाच्या ºहासाला प्रारंभ झालेला असतो. जीवन जगण्यासाठी धनाची नितांत गरज असते हे मान्य आहे, पण माणूस हे धन कुठल्या मार्गाने मिळवतो हेदेखील महत्त्वाचे आहे. आज समाजात कुकर्माने धन मिळविणारा माणूस सुखासीन जीवत जगतो आहे, तर सन्मानाने, न्यायबुद्धीने धन मिळविणारी माणसे आपला संसार कसा चालवायचा या विवंचनेत आहेत.
अब्राहम लिंकन यांनी एका ठिकाणी म्हटले आहे की, ‘दुष्ट माणसाच्या दृष्कृत्याची फळे नेहमी सज्जन माणसे भोगीत असतात.’ पैशांपुढे माणूस माणुसकी हरवून बसला आहे. आपल्या सुखासीन जीवनाच्या आड कुठल्या गोष्टी आल्या, तर माणूस त्याचा नाश करण्यात मागेपुढे पाहत नाही. समाजातील आपुलकी, प्रेमभाव, आदर, कणव इत्यादी गोष्टी दुर्मीळ होत चालल्या आहेत. कुणालाच कुणाची पर्वा राहिलेली नाही. एकदा का आपल्या घराचा किंवा ब्लॉकचा दरवाजा लावून घेतला की, त्याचा बाह्य जगाशी संबंध तुटतो. एखाद्या सोसायटीत कुणी मृत झाला असेल, तर त्या सोसायटीतले इतर सभासद अभावानेच त्या उत्तरक्रियेत सहभागी झालेले दिसतात. खरेतर अन्य पशू आणि प्राण्यांहून माणूस वेगळा आहे, असे आपण सर्वच मानतो. हे वेगळेपण माणसाच्या उन्नत समाजभावनेमुळे आणि बुद्धिमत्तेमुळे तसेच भावनाशीलतेमुळे स्पष्टपणे जाणवते.
भूक, भय, मैथुन, निद्रा यांच्या पलीकडेही बºयाच गोष्टी असतात. ही जाणीव मनुष्याला सामाजिक बंधनात राहायला उद्युक्त करते. या वैशिष्ट्यांमुळेच अन्य प्राण्यांहून माणूस वेगळा ठरतो. माणसाला समजून दिलेली चांगली वागणूक म्हणजे माणुसकी. आपल्यापासून इतरांना उपद्रव किंवा त्रास होणार नाही, ही काळजी घेऊन समाजात वावरणे म्हणजे माणुसकी. आपण समाजाचे काही देणे लागतो, ही भावना कायम मनात ठेऊन संधी मिळताच नि:स्वार्थपणे केलेली मदत म्हणजे माणुसकी. एवढेच काय, अडचणीत सापडलेल्या पशू-पक्षांनाही मदतीचा हात देणे, म्हणजे माणुसकी. यालाच आपण भूतदया असेही म्हणतो, पण माणसाच्या दैनंदिन जीवनातील कामे यंत्रे करू लागल्यामुळे माणूस इतर पशुंना महत्त्व देईनासा झाला आहे.
आपल्या आजूबाजूला कोणी प्राणीमित्र असतील, तर त्यांना त्रास दिला जातो, कारण त्या प्राण्यांमुळे आमचे आरोग्य बिघडते. बºयाच वेळा एखादी व्यक्ती संकटात सापडू शकते, तेव्हा त्या व्यक्तीला खºया मदतीची गरज असते. अशा वेळी मागचा पुढचा विचार न करता केलेली मदत म्हणजेच माणुसकी आहे. माणुसकी हीच गोष्ट आपल्याला बाकी प्राण्यांपासून वेगळी करते. प्रत्येक जण स्वत:साठी तर जगतच असतो, पण दुसºयांसाठी जगण्यात जी मजा आहे ती म्हणजे माणुसकी. स्वत:च्या भूकेएवढे खाणे ही आहे प्रकृती. भूकेपेक्षा अधिक खाणे ही आहे विकृती. प्रसंगी उपाशी राहून दुसºयाला खाऊ घालणे ही आहे संस्कृती. या चिरंतन संस्कृतीचा वारसा जपणे हे आपल्या सर्वांचे आद्य कर्तव्य आहे. ही देखील एक प्रकारची माणुसकीच आहे.
– बाळासाहेब हांडे/९५९४४४५२२२\\