गेल्या १५ वर्षांपासून एका जोडप्याला ओळखत होतो. त्यांचे नाव पण मला माहीत नाही आणि कदाचित त्यांना माझेही, तेव्हा मी दिवसातून कमीतकमी १० वेळा तरी खाली उतरत होतो, तेव्हा त्या दोघांची भेट व्हायची. दोघेही एकमेकांना अनुरूप, दिसायलाही दोघे छान आणि मला ते काही काळ दिसत नव्हते. काही महिन्यांनी भेटले, तेव्हा ते एकटेच, बायको सोबत नव्हती, असे खुप वेळा झाले. त्यांच्याशी बोलायचो, पण बायकोविषयी विचारले नाही आणि एक दिवस विचारले की, तुमच्या मिसेस सध्या दिसत नाही, बºया आहेत ना?त्यावर ते म्हणाले की, ती वारली. मला धक्का बसला. काही आजारपण नव्हते, अचानक आजारी पडली आणि काही दिवसांत गेली. मी काहीच बोलू शकलो नाही, नंतर समजले की, त्यांच्या मुलीचे लग्न झाले व ते एकटेच राहतात. नंतर मी विचार करत होतो, यांच्या जेवणाचे कसे होत असेल?, एकदा मी विचारले की, तुमच्या जेवणाचे कसे?, काही अडचण असेल तर मी कोणाला विचारू का?, त्यावर ते म्हणाले की, मुलीचे लग्न झाले. परदेशी असते, माझे येथे कोणी नातेवाईक नाहीत आणि आहेत त्यांचा काही उपयोग नाही. पैशांचा काहीच प्रॉब्लेम नाही. आता रिटायर्ड आहे. मी विचारले मग जेवण व इतर गोष्टी तर ते म्हणाले की, हल्ली चुटकीसरशी सर्व दारात हजर, तेही गरम, व्हेज, नॉनव्हेज, जे हवे ते मिळते, कधी वाटले तर पिझ्झा, बर्गर मागवतो. कधी फिश, चिकन, मटण पैशांची काहीच अडचण नाही, पण जे काही मागवतो, त्यातील अर्धअधिक मी लोकांना वाटतो. खुप कमी खातो, फक्त जगण्यापुरते. जे खाणे येते ते उत्तम असते, पण चव लागत नाही. बायको होती, तेव्हा रोज वेगवेगळे पदार्थ करायची, तेही उत्तम, आज मरण येत नाही म्हणून जगत आहे. लोकांना वाटते मी खुप खूश आहे, पण तसे नाही. गेली २ वर्षे मी घरी एकटाच आहे. घर खायला उठते, कोणी बोलायला नाही ही मोठी शिक्षा आहे, तिने जाताना सांगितले होते की, वाटल्यास तुम्ही लग्न करा, पण ही तर सर्वात मोठी शिक्षा होती. सध्या मुलीकडे जाऊ शकत नाही आणि ती पण येऊ शकत नाही.
माझ्याकडे आज जेवढा पैसा आहे, तेवढा नसता तरी चालले असते. फक्त बायको हवी होती. भले आजारपणामुळे पूर्वीसारखी राहिली नसती, कदाचित पूर्वीसारखे काही करू शकली नसती. ती नेहमी जसे खाणे बनवायची ते कदाचित बनवू शकली नसती. साधे वरण-भातही मला पंचपक्वान वाटले असते आणि ती जर जगली असती, तर काही काळाने ती कायमस्वरूपी अंथरुणाला खिळली असती, तरी मला ते चालले असते. सर्व काही तिचे केले असते.
आज ३ बीएचकेचा मोठा फ्लॅट आहे. समजा ती अंथरुणावर खिळली असती, तरी घरात फिरताना मला दिसली असती. ती कशीही असली तरी ती आहे, यामुळे जगण्याचे बळ मिळाले असते आणि ती आहे, यामुळे साधे पाणीही अमृतासमान वाटले असते.
हेमंत कालेलकर/ 9209263239\\