ठळक बातम्या

मराठी संगीत रंगभूमी

आपल्या मराठी संगीत रंगभूमीला वैभवशाली परंपरा आहे. मराठी रंगभूमीचा इतिहास १८० वर्षांचा आहे, पण ही रंगभूमी विकसित होण्यासाठी ब्रिटीश राजवटीचाही थोडाफार हातभार लागला. कारण त्यामुळे व्यक्त होण्याचे, अभिव्यक्तीचे नवे व्यासपीठ तयार झाले. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच ब्रिटिशांनी त्याच्या सत्तेचा पाश आवळायला सुरुवात केली होती. १८१७ मध्ये पेशव्यांकडून पुणे काढून घेतले आणि इंग्रजांचा एकछत्री अंमल सुरू झाला. प्रशासन चालवण्यास उपयुक्त असणारे, इंग्रजी जाणणारे कर्मचारी निर्माण करण्यासाठी १८५२ मध्ये ब्रिटिशांनी मुंबई विद्यापीठाची स्थापना केली.
विद्यापीठात शिकवण्यात आलेल्या इंग्रजी साहित्याद्वारे महाराष्ट्राला शेक्सपिअरचा परिचय झाला. त्याच्या सुखांतिका, शोकांतिका, त्याचे भाषा वैभव, त्याच्या नाटकांतील विलक्षण व्यक्तिरेखा यांचे नवे दालनच मराठी माणसांसमोर खुले झाले. या नाटकांनी प्रभावित होऊन अनेकांनी त्यांचे मराठीत अनुवाद केले, काहींनी रूपांतरे केली, तर काहींनी त्यावर आधारित नवीन नाटके लिहिली. एकूण झाले काय तर विद्यापीठांत शिकणाºया आणि न शिकणाºया अशा सर्वांपर्यंतच शेक्सपिअर पोचला.

याच काळात अनेक संस्कृत नाटकांची देखील मराठीत भाषांतरे झाली. संस्कृत नाट्यरचनेचा प्रभाव असलेली स्वतंत्र मराठी नाटकेदेखील लिहिली गेली. त्यांचे प्रयोग झाले नाहीत. पण विष्णुदासी पद्धतीच्या आख्यान नाटकांचेच प्रयोग प्रचलित होते.
विष्णुदास भाव्यांनी ज्या काळात सीता स्वयंवर हे नाटक रचले, त्याकाळी मराठी प्रांतात लोकरंगभूमीचे विविध प्रकार दिसून येत होते. धार्मिक ग्रंथांची प्रवचने, त्यातील कथानकांवर आधारित कीर्तने, कोकणाकडचा दशावतार, कानडी भाषेतले यक्षगान, भागवतमेळे, वर्षभरातले विविध व्रतवैकल्ये, सण, समारंभ, बारसे, विवाह, अंत्यसंस्कार असे विविध विधी याने सगळे सांस्कृतिक वातावरण भारलेले होते. काही धार्मिक प्रसंगी, विशेषत: दसºयाच्या दिवशी सोंग काढण्याची परंपरा अनेक ठिकाणी होती. इथे कथानक आणि संवाद हे घटक नसतात, पण व्यक्तिरेखा, वेषभूषा, थोडे संगीत, नाच हे नाटकातले घटक मात्र दिसून येतात. कथन परंपरेत पारायण, प्रवचन, कीर्तन असे विविध टप्पे दिसून येतात. चारुदत्त आफळे यांची कीर्तने ऐकली तर नाटक आणि कीर्तन किती जवळचे आहे हे लक्षात येईल. चारुदत्त आफळे संगीत नाटकात काम करणारे उत्तम अभिनेते, गायक असले, तरी कीर्तनाची परंपरा त्यांनी जपली आहे. पण त्यातही नाट्यमयता असते. हे ते आपल्या सादरीकरणातून दाखवून देतात.

पारायणात वाचन असते, प्रवचनाच वाचनासोबत थोडे समजावून सांगितले जाते, तर कीर्तनात समजावून सांगणे एवढ्या मोठ्या प्रमाणावर असते की, त्यासाठी संगीत आणि अभिनय हे घटक वापरले जातात. कीर्तनातील गेय काव्य आणि त्याचे गद्य निरूपण यात विष्णुदासांच्या नाटकाचे मूळ आढळते, शिवाय होनाजी बाळांच्या शाहिरी काव्याचा विष्णुदासांना परिचय होताच. त्यामुळे हे सगळे प्रभाव विष्णुदासी नाटकांवर दिसून येतात.
भारत त्या काळात एक ब्रिटिश वसाहत असल्यामुळे अनेक ब्रिटिश सैनिक अधिकारी भारतात राहात होते. त्यांच्या मनोरंजनासाठी तत्कालीन ब्रिटिश नाटक मंडळ्या भारतात येऊन प्रयोग सादर करत असत. त्यातील काही नाटके शेक्सपिअरची तर काही तत्कालीन ब्रिटिश नाटककारांची होती. त्यांची मंचनाची पद्धत मात्र शेक्सपिअर कालीन नसून त्याच काळातली असल्यामुळे ही नाटके कमानी मंचाच्या पद्धतीची होती. या नाटकांचे प्रयोग होण्याकरिता ब्रिटिशांनी भारतात काही कमानी-मंच नाटकघरे उभारली. ही नाटके पाहायला ब्रिटिश अधिकाºयांसोबतच प्रतिष्ठित धनिक तसेच ब्रिटिशांची चाकरी करणाºया भारतीयांना आमंत्रण असे. अशा प्रकारे त्या काळात युरोपात ज्या पद्धतीने नाटक सादर होत असे, त्या पद्धतीचा परिचय महाराष्ट्रातील जनतेला झाला.

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात पश्चिम भारतात पारशी नाटकांचा उदय झाला. व्यापारी, उद्योजक पारसी समाज यांच्याकडून या नाटकांना अर्थसहाय्य होत असल्यामुळे त्यांना पारसी नाटके असे म्हणत असत. गुजराती तसेच हिंदुस्थानी भाषांमधून ती नाटके सादर होत असत. सादरीकरणाच्या पद्धतीवर युरोपीय प्रभाव होता, पण त्यांची कथानके मात्र भारतीय पुराणे, अरबी भाषेतील सुरस आणि चमत्कारिक कथा आणि शेक्सपिअरची नाटके यांच्यावर आधारित अशी होती. या नाटकांमधले संगीत आणि नृत्य हे एकोणिसाव्या शतकातल्या तवायफ परंपरेतील होते. पारसी नाटकांचे प्रयोग लाहोर, आग्रा, लखनऊ तसेच मुंबई येथे होत असत. बहुतेक सर्व प्रयोग ब्रिटिशांनी बांधलेल्या कमानी-मंच पद्धतीच्या नाटकघरांमध्येच होत असत. कथानक, वेशभूषा आणि संगीत भारतीय परंपरेतील तर सादरीकरणाची आणि अभिनयाची पद्धत काहीशी पाश्चिमात्य असे विलक्षण मिश्रण पारसी नाटकात होते.
अशा प्रकारे एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्रात कीर्तन, दशावतार, लळीत, भारूडासारख्या लोकपरंपरा, विष्णूदासी पद्धतीची आख्यान नाटके, शेक्सपिअरच्या नाट्य-संहिता, त्यांचे मराठी अनुवाद, रूपांतरे, संस्कृत नाटकांचे मराठी अनुवाद, ब्रिटिश नाटक मंडळ्यांचे नाट्यप्रयोग, कमानी-मंच नाटकघरे, पारसी नाटके असे विविध प्रकार रंगभूमीवर नांदत होते. महाराष्ट्रात मराठी संगीत नाटक उगम पावले त्यामागे त्या काळात ही सर्व पार्श्वभूमी होती.

१९३१ मध्ये महाराष्ट्रात बोलपटांचे आगमन झाले. तोपर्यंत मराठी नाटक लोकप्रियतेच्या शिखरावर होते, पण मुका चित्रपट जसा बोलायला लागला, तशी लोकांना नाटकापेक्षा त्याचीच गोडी जास्त वाटू लागली, नाटकघरांचे रूपांतर चित्रपटगृहांमध्ये झाले आणि मराठी नाटकाच्या लोकप्रियतेला ओहोटी लागली, परंतु एकशे ऐशी वर्षांची ही परंपरा आजही टिकून आहे आणि काही रंगकर्मी ते टिकवून ठेवण्याचे प्रयत्न करत आहेत हे विशेष. महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर जगातील एकमेव राज्य महाराष्ट्र असे आहे की, जे राज्य राज्य नाट्य स्पर्धेच्या माध्यमातून मराठी नाटकाच्या संस्कृतीला प्रोत्साहन देते. अन्य कोठेही सरकारकडून असे उपक्रम राबवले जात नाहीत. कोरोनाच्या काळात या स्पर्धा झाल्या नाहीत, पण त्याचे आता पुनरुज्जीवन होणे गरजेचे आहे.
– प्रफुल्ल फडके/ तिसरी घंटा

9152448055

About Editor

अवश्य वाचा

सुख म्हणजे नक्की काय असते

खरे म्हटले, तर सुखासाठी सर्वांचीच धडपड चालू असते. सुख नको असे म्हणणारा माणूस या जगात …