मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने!

मराठी भाषा दिन किंवा अन्य काही निमित्ताने आपल्या मनात मराठी भाषेबद्दल प्रेम जागे होते, ते समाजमाध्यमांवर उधळपणे वाहते, मात्र आपल्याच राज्यात राज्याची भाषा सर्व शाळांमध्ये शिकण्याची सक्ती करण्यासाठी कायदा करावा लागतो आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या हस्तेदेखील राष्ट्रपती महोदयांना तब्बल ४ हजार पोस्ट कार्ड पाठवण्यात येतात. खरेच ही सर्वांसाठीच लाजिरवाणी गोष्ट म्हणावी लागेल.

पण मग कायदा केला, तरी खाजगी शाळा त्याची अंमलबजावणी करतील की नाही, याची शाश्वती नाही. म्हणून त्यांच्यावर पुन्हा दंडात्मक कारवार्इंची तरतूद करावी लागेल, ही तर त्याहूनही अधिक लाजिरवाणी गोष्ट म्हणावी लागेल.
बघा ना, काही वर्षांपूर्वी अकराव्या शतकात हिंदुस्थानावर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने इथे आलेला बाबर व त्यानंतर त्याच्या पिढ्यांनी तब्बल ५ शतके यावनी सत्ता, संस्कृती इथल्या मातीवर लादली होती, इथल्या मातीतल्या लोकांच्या अस्मिताही या आक्रमणाखाली दाबल्या गेल्या होत्या.

मात्र अशा काळात मराठी साहित्याने, मराठी भाषेने महाराष्ट्रातील संस्कृती आणि परंपरा जपण्याचे प्रचंड प्रमाणात मोलाचे कार्य केले आणि आद्यकवी मुकुंदराज, संत ज्ञानेश्वर या संतकवींच्या मदतीने इथल्या काव्याला आकार देत मराठी साहित्‍याला, मराठी भाषेला एका अत्युच्च उंचीवर नेऊन ठेवले, मराठी भाषेची प्रतिष्ठा वाढवली.
‘इये मºहाठीचीये नगरी! ब्रम्हविद्येच्या सुकाळू करी! देणे घेणे सुखची वरी! होऊ दे या जगा!!’ अशी विनवणी आपल्या गुरूंकडे करत संत ज्ञानेश्वरांनी सुद्धा या मराठी भाषेला प्रचंड प्रमाणात समृद्धता आणली.

खरेतर, या साºयांचा खºया अर्थाने कळस चढविला तो ज्ञानेश्वरीतल्या ‘पसायदानाने.’ जगाच्या सुखासाठी दान मागण्याच्या श्रेष्ठ परंपरेचा पायंडा ज्ञानेश्वरांनी घातला. हे मराठी साहित्य, मराठी भाषा केवळ ज्ञान, शब्दांनीच परिपूर्ण नव्हते तर त्यात ‘अखिल मानवतेसाठी’ असणारी तळमळसुद्धा दिसून येत होती. मग मात्र ज्ञानेश्वरांच्या या प्रतिभेचाच वारसा पुढे चालून वारकरी संप्रदायातील संतांनी सक्षमपणे चालविला आणि लाखो अभंग, भारुडे, कथा, गीते, नाटक, ग्रंथ यांच्या माध्यमातून यांनी मराठी साहित्यला, मराठी भाषेला अधिक प्रमाणात नटवले.
‘उष:काळ होता होता काळ रात्र झाली! अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली’ या ज्वलंत मराठी भाषेतीलच कवितेची दाहकता प्रत्येकाच्या बालवयातले रक्त जिवंत ठेवण्यास पुरेशी होती.

मराठी भाषेच्या सागरातील मोती प्रत्येकाला लाभले यात काडीमात्र संशय नाही, मात्र माणूस म्हणून जेव्हा आपण जन्माला येतो, तेव्हा त्याबरोबर एक संस्कृतीचेही नेतृत्व, आचरण करण्याची जबाबदारी देखील आपल्यावर येत असते आणि याच संस्कृतीची ओळख बालवयापासूनच करून द्यायचे महत्त्वाचे काम या मराठी भाषेतील कवितांनी सुद्धा केले.
एक एक कविता म्हणजे बस्स, समुद्रमंथनातून निघालेल्या रत्नांपेक्षाही मौल्यवान आणि परिसासमान. ज्या लोखंडास स्पर्श करून त्याचेही सोने व्हावे अशा उंचीच्या त्या मराठी भाषेच्या कविता.

खरेतर सर्वांना आपले सारे बालपण स्वप्नात वावरल्यागत वाटायचे, पण या स्वप्नांना अजून मजेशीर, गोड बनविले ते अंगणवाडीतल्या मराठी भाषेच्या बडबडगीतांनीच.
खिशात दमडी नसतानासुद्धा बुद्धी मात्र मराठी साहित्याने, संस्काराने श्रीमंत होत गेली. प्रत्येक विचार या मराठी भाषेच्या कवितेगणिक समृद्ध होत गेले.

सर्वात जास्त बलवान काळ. मात्र काळाहून बलवान ते मराठी भाषेचे शब्द होते. ‘आम्ही घरी धन शब्दांचीच रत्ने ेशब्दांचीच शस्त्रे यत्न करू’, असे तुकोबांनी म्हटले ते उगाच नाही. अशा कित्येक शब्दांनी प्रत्येकाच्या तारुण्याला सावारले, न्यूनगंडाच्या परिस्थितीतून बाहेर काढले, वैचारिक गुलामीची पूर्णपणे साखळदंडे तोडली.
सिमेंटची जंगले फारशी फोफावली नव्हती, म्हणूनच तर अंगणातली गाय अन् घरातली माय काळजाच्या कशा जवळ असायच्या. याच काळात जन्मलेल्या कवीने ‘हंबरुनी वासराले चाटती जवा गाय! तवा मले तिच्यामंदी दिसती माझी माय’, असे म्हटले ते उगाच का? प्रत्येक कवीच्या लिखाणाला वास्तवाचा स्पर्श होता म्हणून त्या मराठी भाषेतील कविता अधिक जवळच्या वाटत गेल्या.

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात जनसामान्यात राष्ट्रविषयक भावना निर्माण करताना आणि विचारांनी परिपूर्ण असा एक वैभवशाली समाज उभा करताना या मराठी साहित्याने, मराठी भाषेने आपली भूमिका किती महत्त्वाची? हेसुद्धा वेळोवेळी दाखवून दिले. पदोपदी राष्ट्रप्रेम, स्वाभिमान जिवंत ठेवण्याचे काम खºया अर्थाने या मराठी साहित्याने, मराठी भाषेनेच केले. राजधर्माबरोबरच ‘खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे’, असे म्हणत साने गुरुजींनी ‘मानवता धर्म’देखील शिकवला आणि हे सारे शिकलेले ‘देणाºयाने देत जावे, ेघेणाºयाने घेत जावे,े घेता घेता एक दिवस देणाºयाचे हात घ्यावे.’ या काव्यपंक्तीने सुद्धा इतरांना देण्याचा उपदेश केला.
गझल असो वा कविता, कथा असो वा कांदबरी, प्रवास वर्णन असो वा नाटक या सा‍ºयांची नाळ इथल्या मातीशी, व्यवस्थेची जोडली गेलेली होती म्हणून प्रत्येकाने मराठी साहित्याबरोबर, मराठी भाषेला कागदासोबत काळजातही उतरवले. तिच्यावर प्रेम केले, त्यातून प्रेम वाटले, पसायदान मागितले, ‘शुभंकरोती’ म्हणून समृद्धतेच जीवनही मागितले. सारे कसे ‘मानव सृष्टीला साजेसे, तुळशीला रोज पाणी घालून तिला वाढविताना घरातल्या उद्याच्या पिढीवरचे संस्कारही मग आपसूकच वाढवले, जात्यावरच्या ओव्यांनी घर कसे पवित्र केले. किती-किती अमाप प्रेम त्या एका एका ओवीत होते. प्रेमाचा कल्लोळात होते!

सारे कसे पहाटेच्या साखरझोपेत स्वप्नासारखे जगणे होते, पण काळासारखा सखा दुसरा तरी कोणता अन् निष्ठूरही कोणता?’
तो चालत राहिला पण हे सारे कसे मागे पडत गेले आणि शेवटी आमच्याच ‘मायमराठी’साठी आम्हाला झगडावे लागले!

शेवटी, किमान आता तरी सरकारने २७ फेब्रुवारीला मायमराठी भाषेला ‘अभिजात’ दर्जा द्यावा, एवढीच कळकळीची विनंती.
– आकाश दीपक महालपुरे/7588397772\\

About Editor

अवश्य वाचा

उखाणा

सवाष्णीने आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पारंपरिक शैली ही महाराष्ट्राची ओळख आहे. लग्नात किंवा सण-समारंभात …