ठळक बातम्या

मन

प्रचलित वाक्प्रचार, म्हणी किंवा शब्दजोड (जोडशब्द नाही) हे अनेकदा माणसाला गोंधळात टाकत असतात. केवळ समाज असे शब्द वारंवार उच्चारत असतो, म्हणून ते योग्यच असतील, असा एक बुद्धिहीन तर्क काढून अनेक व्यक्ती स्वत: तर कन्फ्युज होतातच, पण इतरांनाही गोंधळात टाकतात. त्यामुळे एक आणखी उपद्रव वाढतो आणि तो म्हणजे समाजात चुकीच्या ‘धारणा’ आणि ‘मान्यता’ पसरतात.
आज, मनाशी निगडित काही शब्दजोड, की जे आपल्याला गोंधळात टाकतात. ते समजून घेण्याचा प्रयत्न करू. ‘माझ्या गोंधळलेल्या मनात अनेक विचार येत होते’ किंवा ‘माझे अशांत मन, शांत करण्याचा, मी खूप प्रयत्न केला, पण व्यर्थ!’ आता, ही दोन वाक्ये, दोन चुकीचे शब्दजोड पसरवतात. एक म्हणजे, ‘गोंधळलेले मन’ आणि दुसरा, ‘अशांत मन’! कारण, मन म्हणजेच गोंधळ, अराजकता आणि अशांत हे तर मनाचे दुसरे नाव. हे तर असे झाले की, ‘गाईचे गोमूत्र’ किंवा ‘पिवळा पितांबर!’

समजा, सागरात तुफान आले आणि काही वेळाने ते हळूहळू निघून गेले. हे सारे पाहून जर कोणी म्हणाले की, ‘बापरे किती मोठे ‘अशांत तुफान’ आले होते!’ आणि ते निघून गेल्यावर मग असे म्हणणार का की, ‘आता शांत तुफान चालले आहे?’ नाही. ‘आता तुफान नाही’, इतकेच. अशांती जेव्हा नाहीशी होते, तेव्हा मन शांत होत नाही, तर मन राहातच नाही (माइंड गोज). मन आणि शांती कधीच एकत्र नांदत नाही (पीस अँड माइंड नेव्हर गो हॅड इन हॅड!). जसे, अंधार आणि प्रकाश एकाच वेळी एकाच ठिकाणी असू शकत नाही. एक तर मन असते, नाही तर शांती असते, पण असे चुकीचे शब्दजोड माणसाला चुकीच्या मार्गावर नेतात आणि मग आपण मन शांत करण्याचा प्रयत्न करू लागतो आणि ते ही मनाला सांभाळून, गोंजारून त्याला जपून. कसे जमणार? मनाची टोटल अनुपस्थिती म्हणजेच शांती. शांती कधीच बाहेरून येत नसते, तर ती मनाच्या गैरहजेरीत दडलेली असते, पण आपल्या शब्द जोडीच्या फंड्यामुळे (अशांत मन, गोंधळलेले मन वगैरे) मनाचाही थांग लागत नाही, शांतीचा मार्ग ही सापडत नाही आणि अंतरीची वाट ही गवसत नाही. परिणामत: परिघा वरच आपण गोलगोल फिरत राहतो, एखाद्या घाण्याच्या बैलासारखे, फिरतो, चालतो, फिरतच राहतो, पण पोहचत कुठेच नाही.
चंद्रशेखर खेर/९१३७४६४२९३\\

About Editor

अवश्य वाचा

शिक्षक भरती घोटाळा

इंग्रजी माध्यमाच्या शाळेत विद्यार्थ्यांचे प्रवेश वाढायला लागल्यानंतर पालकांनी मराठी व इतर भाषिक शाळांकडे पाठ फिरवली. …