मनाचे श्लोक ३९

जया वर्णिती वेदशास्त्रेपुराणे।

जयाचे नि योगे समाधान बाणे॥
तयालागी हे सर्व चांचल्य दीजे।

मना सज्जना राघवी वस्ति कीजे॥३९॥
श्लोकार्थ : वेदशास्त्रेपुराणे हे सारे अध्यात्मवाङ्मय अनंत भगवंतांचेच वर्णन करतात. त्या भगवंताशी संबंध होऊन त्याच्या जवळ गेले की, माणसाला समाधानाचा अनुभव येतो. मना! अशा त्या भगवंताला आपला सारा चंचलपणा अर्पण करून टाक. तू त्याच्यापाशीच कायमचा निवास कर.

विवेचन : सर्व समाजाला मार्गदर्शक ठरतील, असे जे काही प्राचीन ग्रंथ आहेत. त्यात वेद, शास्त्रे आणि पुराणे यांचा प्रामुख्याने समावेश करता आहे. प्रमुख वेद चार आहेत. ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद. सहा शास्त्रे सांगितलेली आहेत. पूर्वमिमांसा, उत्तरमिमांसा, न्याय, वैशेषिक, सांख्य आणि योग. आपल्याकडे अठरा पुराणे आहेत. अठरा पुराणे पुढील प्रमाणे… ब्रम्ह, पद्म, विष्णू, वायू, भागवत, भविष्य, नारद, मार्कंडेय, अग्नी, ब्रह्मवैवर्त, लिंग, वराह, स्कंद, वामन, कूर्म, मत्स्य, गरुड व ब्रह्मांड. इतके सारे ग्रंथ एका भगवंतांचे वर्णन करतात. इतके सारे असूनही ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ या न्यायाने प्रत्येकाचा देवाकडे जाण्याचा मार्ग भिन्न असू शकतो किंवा तो असतोच असतो. परमेश्वर म्हणजे अमुकअमुक रंग, अमुक आकार असे काही नाही तर आपापल्या भावानुसार भगवंतांचे रूप, रंग, आकार बदलत असतात आणि स्वाभाविक आहे. वेद जिथे भगवंतांचे वर्णन करताना ‘नेति नेति’ (वर्णन करू शकत नाही किंवा ज्याचे कितीही वर्णन केले, तरी ते पूर्ण आहे असे वाटत नाही, असा कोण असेल तर तो एकमेव भगवंत!) म्हणाले. भगवंतांचे कितीही वर्णन केले, तरी ते अपुरेच! प्रत्येक साधकाला त्याचा वेगवेगळा अनुभव येत असतो. त्यामुळे वेद, शास्त्र, पुराणे यांचे स्वरूप विश्वासक पण अथांग असल्याने अनुभवांच्या वाचनाने, अभ्यासाने, साधकाचा निश्चय पक्का होत असतो, त्याचे मन शांत, सांत होत असते आणि त्याची देवावरील विश्वास दृढ होत असतो. प्रत्येकाच्या अंतरंगात आत्माराम आहेच, फक्त त्याची ओळख करून घेणे हे प्रत्येक साधकाचे परमकर्तव्य! थोडक्यात परमेश्वराशी तादात्म्य पावणे जमले पाहिजे. आपण त्यास ‘वृत्तींची निवृत्ती’ म्हणू शकतो. काही क्षण जरी मनुष्याला ‘निरवृत्त’ होता आले, तरी ‘त्या’ क्षणातून मिळणारे समाधान अलौकिक असते, असा संतांचा अनुभव आहे. हळूहळू या क्षणांची आवर्तन वाढवत जाणे म्हणजे अनंताच्या मार्गात अग्रेसर होणे.
मन चंचल आहेच. याचा आपण नेहमीच बरावाइट अनुभव घेतो. मन नको त्या ठिकाणी पटकन चिकटतं आणि मग त्याचे होणारे बरेवाइट परिणाम शरीराला भोगावे लागतात. आपल लहान मूल असच खोड्याळ, हट्टी, न ऐकणारं असतं. त्याला आपण एकदम वाइट म्हणत नाही किंवा ओरडत नाही. त्याला प्रेमानी, ओंजारून-गोंजारून सांगतो. माझा बाळ गुणी आहे, तो छान वागणार, तो आई-बाबांचे ऐकणार, असेच म्हणतो. सामान्य माणूस अणि ‘समाजमन’ सारखेच वागतात, म्हणून समर्थ थेट कोणालाही थेट खोड्याळ न संबोधता मनाला ‘सज्जन’ म्हणतात. आणिक इथे एक सांगावसं वाटतं की, आपण शहाण्या माणसाला कधी ही ‘वेडा’ म्हणू शकतो पण ‘खºया वेड्या’शी बोलताना तो शहाणा आहे, असं समजूनच बोलावे लागते. त्याला आपण कधीच ‘वेडा’ म्हणू शकत नाही. म्हणून सारासार विचार करून भगवंतांच्या अनुसंधानात कसे राहता येईल याचा प्रयत्न करूया. त्यासाठी कल्पकतेने नवनवीन मार्ग शोधूया, आपण प्रयत्न करूया.

‘प्रयत्नांती परमेश्वर!’
संदीप रामचंद्र सुंकले/८३८००१९६७६\\

About Editor

अवश्य वाचा

उखाणा

सवाष्णीने आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पारंपरिक शैली ही महाराष्ट्राची ओळख आहे. लग्नात किंवा सण-समारंभात …