मनाचे श्लोक ३७

सदा चक्रवाकासि मार्तंड जैसा।

उडी घालितो संकटी स्वामी तैसा॥
हरीभक्तिचा घाव गाजे निशाणी।

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३७॥
श्लोकार्थ : चक्रवाक पक्ष्याचे जोडपे विरहाच्या संकटात असता सूर्य त्यांच्या मुक्ततेसाठी धावून येतो. त्याचप्रमाणे भक्त संकटात असता भक्तप्रेमी भगवंत त्यास संकटातून सोडविण्यासाठी धावून येतो. जीवनाच्या नगाºयावर भगवंताच्या भक्तीचा प्रहार गर्जुन जगजाहीर करीत आहे की, दासाभिमानी भगवंत आपल्या दासाची उपेक्षा कधीही करीत नाही.

विवेचन : श्रीसमर्थ उदाहरणे सुद्धा एकदम चपखल देतात. सामान्य मनुष्याला एकवेळ तत्वज्ञान समजायला कठीण जाईल पण त्याला प्रेम मात्र नक्की समजते. म्हणून समर्थ आपल्याला चक्रवाक पक्षांच्या जोडप्याचे उदाहरण देऊन भक्त आणि भगवंत यातील नाते समजावून सांगत आहेत. चक्रवाक पक्षी दिवसभर एकत्र विहार करतात पण रात्रीच्या अंधारात ते वाट चुकतात. सूर्योदय झाल्यावर स्वाभाविकपणे त्यांची भेट होते, मिलन होते. त्यांच्यावर आलेले विरहाचे संकट (दु:ख) भगवान सूर्यनारायण दूर करतात. समर्थ म्हणतात की भक्ताला संकटात पाहिले की सुर्याप्रमाणे भगवंत देखील स्वत:हून भक्ताला संकटातून सोडवतात.
आपल्या मनातील ‘आत्माराम’ आपल्याला वेळोवेळी योग्य सल्ला देत असतो, योग्य मार्ग सांगत असतो परंतु आपण मात्र षड्रिपुंच्या आहारी जाऊन आपण आपलेच खरे करण्याचा प्रयत्न करीत राहतो आणि इथेच आपल्या दु:खाची पायाभरणी होते. सामान्य मनुष्याला पुढच्या क्षणाला काय घडणार आहे याची पुसटशी कल्पनाही नसते. घडणारी कोणतीही घटना क्षणांत घडते आणि ‘होत्याचे नव्हते’ करून टाकते. एका अर्थाने मनुष्यासमोर कायम अंधारच असतो. या अंधारातून बाहेर काढण्याचे सामर्थ्य फक्त भगवंताकडेच आहे. त्याला मनापासून हाक मारली की तो येतोच, असे श्रीसमर्थ सांगतात. आपली हाक तोकडी पडते यात त्याचा काय दोष!

मनुष्य जन्माला येतो तेव्हा तो ‘निवृत्तीरुप’ असतो आणि जेव्हा तो मोठा होत जातो तेव्हा तो ‘प्रवृत्तीरुप’ होऊ लागतो. हे भोग आपल्या शरीराचा वापर त्यांच्या स्वार्थासाठी करतात आणि आपण त्यांना तो करु देतो. त्याक्षणी जर आपण विवेक केला तर या दुष्टचक्रातून सुटका होण्याची शक्यता असते. मनुष्याला हे सर्व कळते पण वळत नाही. मनुष्याची बुद्धी आणि बोध यामध्ये रस्सीखेच चालू असते. बुध्दी मनुष्याला जडत्वाकडे नेते तर बोध मनुष्याला भक्तिमार्गाकडे, चैतन्याकडे नेणारा असतो. बुध्दीचा कल इंद्रियांच्या विषयभोगाकडे असतो. बुद्धी दुराग्रही व तर्काच्या स्वाधीन असते. तर बोध हा अविचल, सरळ मार्ग आहे. केवळ अव्यभिचारी निष्ठा आणि निष्काम भक्ती यांच्या सहाय्याने बोधाच्या मार्गावर चैतन्यप्राप्ती होऊ शकते असे सर्व संत सांगतात. मात्र यात भाव शुद्ध असणे अत्यन्त गरजेचे आहे.
आज जवळजवळ प्रत्येक मनुष्यासमोर एकच ध्येय आहे पैसे कमविणे. मग कोणत्याही मार्गाने, कोणतीही किंमत देऊन का असेना, ज्याच्या जवळ जास्त धन, समाजाच्या दृष्टीने त्याचा अंगात इतर सर्व गुण आपसूक येतात, किमान असे समज करुन दिला जातो किंवा घेतला जातो. समाजातल्या ‘मधमाशा धनाच्या पोवळ्याभोवती रुंजी घालत असतात. पोवळ्यातील राणीमाशी नोटांच्या जोरावर सर्वांना राबवते आहे. संशय, अत्याचार, लबाडी, भ्रष्टाचाराच्या माशा जिकडेतिकडे घोंघावत आहेत. सध्या अशाच नायकांचा दांडोरा पिटला जात आहे. त्यामुळे साºया समाजापुढे कमीअधिक प्रमाणात त्या चक्रवाक पक्षाप्रमाणे अंधार भरुन राहिला आहे.

आज स्वत:च सूर्य होण्याची गरज आहे असे जाणवते. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात अनितीचा अंधकार आहे. हा अंधकार दूर करण्याची सुरुवात आपण स्वत:पासून करणे गरजेचे आहे. भगवंतांचे अधिष्ठान असेल तर कोणतेही कार्य नक्कीच सिद्धीस जाते. ‘देव सांभाळतो’ ही एकदा पक्की खात्री पटली की मनुष्याला ‘राघवाच्या घरी’ वस्ती करणे सुलभ जाईल. ते आता पुढील श्लोकांत आपण बघणार आहोत.
– संदीप रामचंद्र सुंकले/८३८००१९६७६

 

About Editor

अवश्य वाचा

उखाणा

सवाष्णीने आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पारंपरिक शैली ही महाराष्ट्राची ओळख आहे. लग्नात किंवा सण-समारंभात …