मनाचे श्लोक ३५

 

असे हो जया अंतरी भाव जैसा।
वसे हो तया अंतरी देव तैसा॥

अनन्यास रक्षीतसे चापपाणी।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३५॥

श्लोकार्थ :-
माणसाच्या अंत:करणात ज्या प्रमाणात ईश्वराबद्दल अस्तित्व भावना जागृत असते, त्या प्रमाणात ईश्वरी सत्ता त्याच्या अंत:करणातही प्रगटपणे अनुभवास येते. जो भगवंताहून वेगळेपणाने उरत नाही. त्याला भगवंत सदैव सांभाळतो. दासाभिमानी भगवंत आपल्या दासाची कधीही उपेक्षा करीत नाही.

विवेचन :-
देवाची भक्ती म्हणजे नक्की काय हे सांगणारा हा महत्त्वाचा श्लोक आहे. अर्थात मनाचे सर्व म्हणजे २०५ श्लोक चांगले आहेतच, तरीही हा श्लोक मूलभूत सिद्धांत सांगणारा आहे. आतापर्यंत प्राथमिक स्वरुपाचे, परमार्थ मार्गाबद्दल आकर्षण निर्माण होईल, असे काही पुराणांतील दाखले समर्थांनी या आधीच्या काही श्लोकात दिले आहेत, पण आता मात्र त्यांनी भक्तीचे मर्म सांगितले आहे. हे ‘मर्म’ सामान्य मनुष्याच्या पटकन पचनी पडेलच असे नाही.

मनुष्य आणि इतर जीव यांमध्ये मूलभूत फरक आहे. इतर सर्व जीव निसर्गक्रमाने जगतात. जे सुख-दु:ख वाट्याला येईल ते आनंदाने भोगतात. मनुष्य मात्र प्रारब्धाने आलेले भोग आनंदाने स्वीकारत नाही. तो त्यामध्ये आपले मन घुसडतो आणि देहबुद्धीमुळे अधिक दु:खी होतो. खरेतर मनुष्याला परमेश्वराने विचार करण्याची आणि ते प्रगट करण्याची बुद्धी दिली असल्यामुळे मनुष्याने त्याचा उपयोग करून आत्मारामाची ओळख करून घेण्याचा प्रयत्न करायला हवा, परंतु मनुष्य मात्र अमर्याद भौतिक सुख प्राप्त करण्याचा प्रयत्न करताना दिसतो. आत्माराम प्राप्त करण्यासाठी अंतरंग शुद्ध पाहिजे. अंतरंग शुद्ध करण्यासाठी आपल्याकडे बरेच उपाय सांगितलेले आहेत. त्यातील मुख्य आणि सामान्य मनुष्याला आचरणात आणता येईल, असा साधा सोपा मार्ग म्हणजे सगुणभक्ती!
सामान्य माणसांची भक्ती साधारणपणे पहिल्या तीन प्रकारांतील असते. ते नवस बोलतात, देवाला साकडे घालतात, देवाकडे सारखे काहीतरी मागत असतात. देवालाही ‘लाच’ द्यायला असे भक्त मागेपुढे पाहत नाहीत. संसारिक अडीअडचणींमुळे ते बेजार झालेले असतात. देवसुद्धा त्यांची योग्यता पाहूनच फळ देत असतो.

भाव शुद्ध होणे म्हणजे भगवंताचा अभाव नष्ट होणे. संतांना भगवंत चराचरात जाणवतो, तर सामान्य मनुष्याला मात्र भगवंताचा अभावच जाणवतो. भाव शुद्ध झाला की, मीरेसाठी विषाचे देखील अमृत होते, प्रल्हादासाठी उकळते तेलदेखील शीतल होते, कबीराचे शेले आपसूक विणले जातात. थोडक्यात ‘राम हमारा जप करे, हम बैठे आराम’ अशी भक्ताची स्थिती होते. आपल्याकडे ‘भक्ती तितकी प्राप्ती’ अशी म्हणं आहे. जो परमेश्वर अख्खे जग चालवितो त्याला आपण काय देणार? पंचोपचार, षोडशोपचार पूजा पद्धती ही एक व्यवस्था म्हणून आवश्यक असेलही, पण देवाला त्याची गरज असण्याची काय गरज आहे? त्याला फक्त शुद्ध ‘भाव’ हवा असतो. देव कायम उपलब्ध आहेच. त्याच्या अनुसंधानात राहणे अत्यावश्यक. आपल्याला नेमून दिलेले काम किंवा प्रारब्धाने आलेली सुख-दु:ख देवाची तशीच इच्छा आहे असे समजून कोणतीही ‘प्रतिक्रिया’ न देता ‘प्रतिसाद’ देऊन आनंदाने स्वीकारतो, असा भक्त देवाला आवडतो.
सर्वसाधारणपणे आपल्या प्रत्येकाच्या घरी देवघर असते. त्यात विविध प्रकारचे देव, देवी असतात. आपण त्यांची यथाशक्ती, मनोभावे पूजाअर्चाही करतो. आज बºयाच घरात देव भिंतीवर लटकताना आपण पाहतो. काही घरात तर देवाला बिलकुल जागा नसते. बरीच लोक एखादे दैनंदिन काम यांत्रिक पद्धतीने उरकावे इतक्या निर्जीवपणे पूजा करतात आणि देवानी आपली कायम काळजी घ्यावी, अशी अपेक्षा करतात. अशा यांत्रिक पद्धतीने कोणी आपली ‘पूजा’ केली तर आपण तरी प्रसन्न होऊ का? बरे, देव घरात आहेत म्हणून आपल्या वागण्यात, बोलण्यात काही फरक पडतो का? तर तसेही नाही. आपण जिथे काम करतो तेथील अधिकाºयांच्या कक्षात गेलो तर आपण किती अदबीने, नम्रपणे बोलतो. पण घरात? आपल्या घरात ‘देवघर’ आहे असे न वाटता आपण ‘देवाच्या घरात’ राहतो अशी आपली खात्री पटेल, तेव्हा आपण खरे (अनन्य) भक्त होऊ. तोच आपल्या आयुष्यातील सुदिन! मग आपला ‘आत्माराम’ आपल्याला नक्कीच सांभाळेल.

संदीप रामचंद्र सुंकले\\

About Editor

अवश्य वाचा

उखाणा

सवाष्णीने आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पारंपरिक शैली ही महाराष्ट्राची ओळख आहे. लग्नात किंवा सण-समारंभात …