मनाचे श्लोक ३२

अहल्या शिळा राघवे मुक्त केली।

पदी लागता दिव्य होऊनि गेली।।
जया वर्णिता शीणली वेदवाणी।

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी।। ३२।।
श्लोकार्थ : भगवान रामचंद्राने दगड होऊन पडलेल्या अहल्येला मुक्त केले. त्याचा पदस्पर्श होताच ती दिव्य गतीला गेली. भगवंताचे वर्णन करताना प्रत्यक्ष वेददेखील थकून गेले. दासाभिमानी भगवंत दासाची कधीही उपेक्षा करीत नाही.

विवेचन :

गौतम ऋषींची भार्या अहिल्या. इंद्राला तिच्याशी विवाह करायची इच्छा होती. म्हणून एकदा संधी साधून इंद्राने कपट करून तिला फसविले. गौतम ऋषींनी अहल्येला शाप दिला. नंतर श्रीरामानी तिचा उद्धार केला. ही कथा आपल्याला माहीत आहे. परिस्थितीनुरूप मनुष्याला नाईलाजाने पापाचरण करणे भाग पडू शकते. इंद्रियांच्या अधीन जाऊन (देहबुद्धीमुळे) मनुष्य कसाही वागतो आणि त्याचे दुष्परिणाम संपूर्ण शरीरास भोगावे लागतात. कालांतराने मनुष्य पश्चाताप होऊन रामाला शरण गेला, तर राम त्याचा खात्रीने उद्धार करतो असा त्याचा एक अर्थ आहे.
‘अहल्या’ म्हणजे न नांगरलेली जमीन अर्थात ओसाड जमीन. (शेती करण्यास अयोग्य). आपले मन म्हणजे न नांगरलेल्या जमिनीसारखेच म्हणजे ओसाड असते. ओसाड जमिनीत वाईट विचार अलगद रुजतात. मात्र चांगले पीक घ्यायच असेल, तर मात्र आधी जमीन नांगरतात. शेत आहे, म्हणून कोणतेही बी पेरा, असे चालत नाही. तर जमिनीचा पोत पाहावा लागतो, जमिनीची योग्य पद्धतीने मशागत करावी लागते, ती उत्तमरीत्या नांगरून घ्यावी लागते. ती बियाणे पेरण्यालायक तयार करावी लागते. मन नांगरणे म्हणजे नवीन गोष्टी आत्मसात करण्यासाठी तयार असणे. जर मनात रामाची प्रतिष्ठापना करायची असेल, आपल्याला मनाची किती मशागत करावी लागेल?

साधारणपणे मनुष्य आपले दुर्गुण झाकून ठेवतो आणि सद्गुण जगासमोर यावेत असा प्रयत्न करीत असतो. अर्थात, हा मनुष्य स्वभाव आहे. दुर्गुण आपल्या मनात अंश रूपाने म्हणजे परमाणू रूपात असतात असे म्हटले तर वावगे होणार नाही. मनुष्याचे मन जेव्हा इंद्रियाधीन होते अर्थात ‘इंद्रा’चे ऐकून कृती करते, तेव्हा त्याचा हमखास घात होतो. तेव्हा त्याचे बरे-वाईट परिणाम शरीराला भोगावे लागतात. ‘शिळा’ स्वरूप प्राप्त होणे हे प्रतिकात्मक असावे असे वाटते. शिळा होऊन राहणे याचा व्यावहारीक अर्थ पुढीलप्रमाणे घेता येईल. कधी लोकापवाद घडला असेल, घर, गाव, नोकरी तर देश सोडावा लागला असेल. तर कधी मनुष्य लोकांच्या नजरेतून उतरत असेल तर कधी स्वत:च्या नजरेतून. आजच्या जाहिरातीच्या काळात एखादा मनुष्य ‘सज्जन’ दिसण्यासाठी एखादा ‘मुखवटा’ पांघरू शकतो, परंतु अंतरंगात परिस्थिती ‘अहल्ये’पेक्षा वेगळी नसते. आजच्या काळात या श्लोकाचा विचार करायचा झाल्यास मनुष्याकडून जाणता अजाणता वाईट गोष्ट घडली. पण कालांतराने जर त्या मनुष्यास पश्चाताप झाला तर त्यास त्यातून मुक्ती मिळू शकेल. तसा प्रयत्न मात्र मनुष्याने करणे गरजेचे आहे.
‘रामचरण सुखदायी।
भज मन रामचरण सुखदायी।’

वाल्मिकी ऋषींनी रामायण लिहिले आणि त्यानंतर रामाने जन्म घेऊन त्याप्रमाणे जगून दाखविले. जगाच्या इतिहासात असे एकमेव उदाहरण असेल की, ज्याचा महिमा जन्माच्या आधी आणि नंतरही अनेक युगे गायिला जात आहे आणि यापुढेही गायिला जाईल. श्रीरामाचा महिमा कितीही सांगितला तरी सांगून संपत नाही, त्या रामाच्या नामात जर आपल्याला राहता आले तर आपली मनरूपी जमीन नुसती नांगरून होणार नाही तर त्यात अखंड समाधानाचे भरघोस पीकही येईल. कारण प्रभू श्रीराम आपल्या भक्तांची कधीही उपेक्षा करीत नाहीत.
– संदीप रामचंद्र सुंकले/ ८३८००१०६७६\\

About Editor

अवश्य वाचा

उखाणा

सवाष्णीने आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पारंपरिक शैली ही महाराष्ट्राची ओळख आहे. लग्नात किंवा सण-समारंभात …